Sunday, 30 July 2023

चेरी घ्या चेरी! साखरलाडू सस्ते लावले!

 




हा फोटो आणि काही आठवणी....चेरी घ्या चेरी! साखरलाडू सस्ते लावले! असं ओरडावसं वाटलं मला....!

एक दोन दिवसांपूर्वी चेरी पिकिंगला गेलो होतो ब्रेन्टवुडला ! धमाल केली! इकडे फ़ळं पिकण्याचा हंगाम असेल तेव्हा अनेक शेतांवर जाउन हवी तितकी फ़ळं घेऊन खायची मुभा असते! जे पोटातून नेऊ ते फ़ुकट आणि हातातून नेऊ त्याचे फ़क्त पैसे भरावे लागतात. 200-250 झाडं असतील आम्ही गेलो होतो तिथे. प्रत्येक झाडाजवळ जायचं चेरी चाखायच्या, गोड लागल्या तर टोपलीत भरायच्या. असं करत खूप फ़िरतात सगळे जण!
हे मात्र खरोखर परीसासारखं आहे. आपण प्रत्येक चेरी तोंडात घालतो , पुढे जातो. गोड लागली म्हणून मागे वळून त्याच झाडाच्या परत खाव्या तर झाड कोणतं ते ओळखताच येत नाही. मग पुन्हा चवी पहाणं. हे करता करता पोट तुडुंब भरतं आणि करंडी बरीचशी रिकामी रहाते.
एकूणच शेतावर जाणं, हाताने फ़ळं तोडून खाणं हा आजकाल क्वचित मिळणारा अनुभव ....! नाहीतर आमची मुले भविष्यात कॉस्टको ( घाऊक फळांचे दुकान) मधे चेरी पिकतात, खोक्या मधे बसतात आणि घरी आणता येतात असे सांगतील. © श्रेया श्रीधर महाजन १४ जून २०११

Saturday, 29 July 2023

भाकरीचा चंद्र

 

मला आठवतंय मी शाळेत असताना ३० एप्रिल ला रिझल्ट लागला की १ मे ला बाबा, आई , ताई कोणासोबत तरी जाऊन पुढल्या वर्षीची पुस्तकं खरेदी करायची. छान कव्हरं घालून तयार ठेवायची. आणि मग त्यातलं मराठीचं पुस्तक वाचायचं. त्यातल्या त्यात एखादी, चि. वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांची गोष्ट,लेख वगैरे असेल तर फार अपूर्वाईने वाचली जायची. उपदेशपर लिखाण, संतवाणी, कविता फारसे कळायचे नाही नुसते वाचून. मला वाटते दहावी किंवा बारावीच्या पुस्तकात नारायण सुर्वे यांची एक कविता होती.


दोन दिवस ...

दोन दिवस दु:खात गेले, दोन दिवस वाट पहाण्यात गेले 

हिशेब करतो आहे किती राहिलेत उन्हाळे

शेकडो वेळा तारे फुलले, रात्र धुंद झाली 

भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.


त्या वयात ना 'उन्हाळे' शब्दातली प्रतीकात्मकता कळत  असे ना 'रात्र धुंद होणे' म्हणजे काय हे कळत असे. भाकरी मात्र लक्षात राहिली. मराठीच्या बाईनी गिरणी कामगारांच्या व्यथा आणि एका भाकरीला देखील महाग होणं प्रयासाने समजावलं होतं. आपली आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी एवढी वाईट नाही याची चांगली जाणीव तेव्हा झाली. आणि पानात अन्न पडेल त्याला मोल आहे हे जाणवायला लागलं. पुढे कधी तरी भक्ती बर्वेनी सादर केलेली बहिणाई दूरदर्शनवर पाहिली. त्यांच्या कवितेशी झालेली ही पहिली ओळख. तेव्हा देखील लक्षात राहिली ती 'आधी हाताला चटके, मग मिळते भाकर.' खूप वर्षे या संदर्भाचा अर्थ कळत नसे. आमची आजी रोज दुपारची एक भाकरी तिच्यासाठी करायची पण कधी चटका लागतो असं म्हणाली नव्हती. त्यामुळे बहुतेक तव्यावर भाजताना चटका लागत असावा असे वाटत असे. पुष्कळ वर्षांनी एका मैत्रिणीने सांगितले गरम पाण्यात पीठ भिजवावं भाकरीचं. म्हणजे मस्त होतात गं भाकऱ्या. लग्न झाल्यावर सासूबाईनी सोलापूराहून शेंगा चटणी आणली होती. मग संध्याकाळी भाकरी करू रोज असं ठरवलं.


सासूने अगदी बाजूला उभं राहून छान शिकवल्या भाकऱ्या. कालांतराने बंद झालं भाकरी करणं. इथे ठाण्यात अगदी सहज पोळी भाजी केंद्रात भाकऱ्या मिळतात हे त्याचं आणखी एक कारण. परदेशात गेल्यावर आठवण यायला लागली, परत प्रयोग सुरु केले पण जमेनात. भारतात आल्यावर एकदा सोम नावाच्या रेस्तोरांत गेले. तिकडे भाकरी पिठले खाल्लं आणि वाटलं की खूप महत्त्वाचं काही तरी मिस करतोय आयुष्यात! महिना दोन महिने अगदी नियमित दोन भाकऱ्या तरी दररोज करायला सुरुवात केली. बरेच युट्युब व्हिडिओ पाहून स्वत:ची पद्धत तयार केली.  आता खरोखर उत्तम जमायला लागलीय भाकरी. प्रत्येक भाकरी टम्म फुगली पाहिजे. भाकरी फुगली की करणारा खूश नि खाणारा खूश. 


बऱ्यापैकी विचार केल्यावर कळलं भाकरीच्या पिठाचा दर्जा आणि ताजेपणा या दोन गोष्टींवर भाकरी फुलणे आणि तिची चव अवलंबून असते. ताजं पीठ असेल तर भाकरीला विरी जात नाही म्हणजे कडांना फटी पडत नाहीत आणि भाकरी फुलते. पण जरा शिळं झालं पीठ वा त्यात भेसळ असली की फटी पडायला लागतात, भाकरीचे तुकडे पडायला लागतात. इतकी तंत्र पोळी करताना का नाही सांभाळावी लागत? तर गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं त्याने चिकटपणा येतो. पण तांदूळ ग्लुटेन फ्री असतात आणि ज्वारी बाजरीत देखील ग्लुटेन कमी असतं त्यामुळे चिकटपणा कमी असतो. म्हणून ग्लुटेन इंटोलरेन्ट लोकांना तांदूळ वा इतर धान्यापासून केलेली भाकरी, ब्रेड खायला सांगतात.


 भाकरी ही एका धान्यापासून करता येते आणि मल्टीग्रेन पण करता येते. तांदळाच्या भाकऱ्या उकड काढून केल्या तर अधिक अलवार होतात. कर्नाटकात याला अक्की रोटी म्हणतात. त्यात जिरं, मिरची कोथिंबीर घालुन केली की तिची चव निवगऱ्यांसारखी लागते. बाजरीची तीळ लावलेली भाकरी खास भोगीला करतात. ज्वारीची भाकरी उष्णप्रकृतीच्या माणसांनी खावी, उन्हाळ्यात खावी असे म्हणतात, तेच नाचणीच्या भाकरीबाबत.  माळवा प्रांतात म्हणजे मध्यप्रदेशात खांडवा गहू चांगला मिळतो. तिकडे जाड कणकीची थापून भाकरी करतात आणि कोळशाच्या शेगड़ीवर भाजतात. याला गाकर किंवा चांदक्या म्हणतात. तूप गूळासोबत खातात.


व्हिडिओ पाहून थियरी कळली तरी, भाकरी करण्यात मी एकदमच नवशिकी होते. म्हणजे कुणी पीठ तयार करून दिले तर नुसत्या थापायला काही नाही. पण सगळे एकटीने करून न  जाळता भाकरी फुगली पाहिजे असा आग्रह असेल तर त्यासाठी मी स्वत:चे एक प्रमाण तयार केले जे कोणत्याही ऋतूत अपायकारक ठरणार नाही. एक भांडे ज्वारी पीठ असेल तर त्यात दोन चमचे बाजरी आणि दोन चमचे तांदूळाचे पीठ घालायचे. हवे तर थोडे मीठ आणि जरासे तेल वा तूप हाताने कोरड्या पीठात मिसळायचे आणि वरून उकळते पाणी ओतायचे. हाताशी थोडे गार पाणी ठेवायचे. आणि मग गरमागरम पीठ मळायचे. मध्ये हाताला थोडे गार पाणी लावायचे म्हणजे हात भाजत नाही. मग मस्त मळून भाकरी थापायला पोळपाटावर घ्यायची आणि तांदळाच्या पीठावर भाकरी थापायची. मोदक पीठ वा तांदळाच्या पीठाला एक खरखरीतपणा असतो त्याने भाकरी फिरवायला सोपी पडते.कडेने पातळ आणि मध्ये थोडी जाड ठेवायची. तव्यावर घालूताना जो भाग पोळपाटावर होता तो वर येईल अशी घालायची. लागलेले पीठ काढून पाणी लावायचे. पाणी वाळले की उलट करायची गॅस मोठा करायचा आणि जरा डाग पडू द्यायचे. मग परत उलट करून सरळ विस्तवावर टाकायची आणि मस्त फुगु द्यायची. आणि एखाद्या जाळीवर ठेवायची, थंड करून डब्यात ठेवायची किंवा तव्यावरून सरळ पानात ठेवायची. वर तूप वा घरचे लोणी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. ©श्रेया महाजन.




The Last Girl

 The Last Girl नावाचं पुस्तक वाचलं. हलवून टाकणारा अनुभव आहे. इराक मध्ये ISIS ने अनेक प्रदेशांचा ताबा घेतल्यावर त्या प्रदेशातल्या लोकांचे, विशेषत: मुलींचे जे हाल केले ते मुळातून जरूर वाचावे आणि खूप लिबरल मते असणाऱ्या आपल्या मुलामुलींना जरूर वाचायला द्यावे असे पुस्तक आहे.


लेखिका 'नादिया मुराद' अशीच एक दुर्भागी मुलगी . कोचो नावाच्या छोट्याशा गावातून आलेली. ISIS ने त्यांचं गाव काबीज केलं आणि याजदी धर्म मानणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांना एका शाळेत बोलावलं. पुरुषांना अक्षरशः एका लायनित उभे करून गोळ्या घातल्या. वृद्ध स्त्रियांना काय केलं हे कळलं नाही. तरुण मुलांना त्यांच्या सैन्यात भरती केलं आणि तरुण मुली 😪 त्यांच्यात भारी रस होता या मंडळींना. अक्षरशः एखाद्या खेळण्याशी खेळावं आणि फेकून द्यावं तशी अवस्था केली या मुलींची. काही अरबांना विकल्या. काही दहशतवादी लोकांनी विकत घेतल्या, थोडे दिवस वापरून, शब्दश: वापरून दुसऱ्या कोणाला विकल्या. काही मुलींनी हाताच्या नसा कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. काही मुली या लोकांच्या दहशतीखाली वावरल्या. पळून जायचा प्रयत्न केला तर शिक्षा फार भयंकर, चाबकाचे फटके आणि सामूहिक अत्याचार .


काही श्रीमंत लोकांना मारून किंवा पळवून लावून ती घरे ताब्यात घेतली होती. या आलिशान घरांचा वापर या कामासाठी, मुलींना ठेवण्यासाठी केला जात होता. गावंच्या गावं ओस पडलेली. मुलींना गुलामाची वागणूक, उपासमार, मारहाण, घरातले साफसफाई काम मागे लावणे आणि लैंगिक छळ, वेळी अवेळी मालक हकक सांगत असे, त्याच मन भरलं की विकून टाकायचा. प्रस्तुत लेखिका देखील असा छळ होत मालक बदलत जगत राहिली. एकदा मात्र नजर चुकवून तेथून पळाली, एका सुन्नी घराने तिला आश्रय दिला आणि कुर्दिस्तान मध्ये राहणाऱ्या भावाकडे पोहचवले. अविश्वसनीय अशी सुटका झाली तिची ! नंतर हळूहळू तिच्या काही बहिणी देखील सुटून आल्या. अर्थात या सगळ्यातून गेलेल्या स्त्रियांच्या मनावर पडलेले ओरखडे आणि कुटुंब हरवणे हे पुसून टाकण्यापलीकडचे आहे.


ह्या गोष्टी फार जुन्या नाहीत २०१४ मध्ये जेव्हा सगळीकडे internet, TV सगळे काही आले होते. कुठे होते मानवाधिकार वाली मंडळी?


शांतिदूतानी इलाका काबीज केल्यावर पोरीबाळींच्या अब्रूचे काय लचके तुटतात हे वाचताना काश्मीर मधला नरसंहार आठवतो. तिथून किमान काही लोक पलायन तरी करू शकले. यात राजकारणी गुंतागुंत असेल देखील. पण सामान्य माणूस वाईट पद्धतीने भरडला जातो. त्यांचा दोष काय केवळ ते शिया मुस्लिम नाहीत. त्यांनी त्यांच्या पाळलेल्या जीव लावलेल्या शेळ्या मेंढ्या जनावरे, शेती, घरे सगळे सोडून निघून जावे. सुरक्षित जागी पळून जाण्याचा प्रयत्न करताना मुलं, वृद्ध माणसे गेली तर ते तसेच सोडून जीवावर दगड ठेवून मध्यमवयीन लोकांना आसरा शोधावा लागतो यासारखे दुसरे दुर्दैव कुठले.

Earnest Hemingway यांची Old man at the bridge ही कथा आठवून जाते. जीव जात असला तरी मन आपल्या पाळीव प्राण्यांचे काय होईल याचा विचार करत रहाते आणि शरीर पुढे जायला असमर्थ ! असो युद्धस्य कथा रम्या 😪 . जे वाचतात ते होरपळलेल्या मनाने जगत रहातात.© श्रेया महाजन. ८ एप्रिल २०२३ 


"नाचू कशी लाजू कशी कंबर लचकली"

 


(आजारपण आणि त्यातून मी शिकलेल्या गोष्टी- या विषयावर एका एफबी ग्रुप मध्ये शेअर केलेली पोस्ट)

'पडू आजारी मौज हीच वाटे भारी' असं लहानपणी वाटतं . पण आजारपण मोठेपणी काही परवडत नाही. सगळ्यांची गैरसोय होते. कारण एकच स्वयंपाकीण काकू आपल्याकडे असते ती म्हणजे आपण स्वतः!

बारीक सारीक डोके दुखणे वगैरे असतेच. पण मला चांगली लक्षात राहिली ती माझी कंबरदुखी.


आम्ही सनिव्हेलमध्ये होतो तेव्हा आणि अगदी रस्त्यापलीकडच्या दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट होणार होतो. अहो तर कामात बिझी. मीच आधीपासून प्लॅनिंग करून सामान आवरलं. अंगात इतका साटपपणा, तिकडे गेल्यावर रात्री आमटी भात खावासा वाटेल म्हणून आमटी, एक डबा पास्ता, एक डबा पावभाजीची भाजी, थोडे लाडू, चिवडा करून ठेवलं. सामान लागेपर्यंत हाताशी राहील. अगदी रात्री भात करायला लागेल तेवढे तांदूळ एका झिप लॉक बॅग मध्ये पॅक करून ठेवला. आणि शिफ्टींग सुरू केलं.


शुक्रवारी सामान शिफ्ट करून रात्री मी किचन लावल सुद्धा. विंचवाच बिऱ्हाड पाठीवर. किती सामान असणार! आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठता येईना. ओरडू पण शकत नाही, ",काय मी करू काय मी करू कंबर लचकली." जवळ राहणाऱ्या मैत्रिणींनी सांगितलं बईंगे लाव लवकर बरे वाटेल. पण ते लागलं झोंबायला आणि मी लागले नाचायला. चार पाच दिवस उठता बसता आई आई...😭

शेवटी बरी झाले. त्यानंतर कानाला खडा.


आचरटपणा करत बसायचं नाही. एखाद्या वेळी जेवणाखाणाचा गोंधळ झाला तर होऊ द्यायचा. कपडे धुवायचे राहिले तर पुढच्या आठवड्यात एक्स्ट्रा लोड लावू. सगळ लगेच आवरून जागेला गेलंच पाहिजे हा अट्टाहास करायचं नाही. कारण एवढं परफेक्ट प्लॅनिंग करून काय झालं? मी अडकलेला रोबोट बनल्यावर घरच्यांना त्रासच झाला, मुलगा बिचारा टी व्ही बघत बसला, नवरा ऑफिस मध्ये न जाता घरी काम करीत बसला आणि मी ना उठता येत ना बसता येत अशी अंतराळी लटकत राहिले. नवीन घरात येऊन माझा असा दुर्मुखलेला चेहरा पाहणं हे नक्की आनंददायक नाहीये. त्यापेक्षा एखाद वेळी सब वे मधून सँडविच घेऊन आलो असतो, फिरून आल्यावर उरलेली कामे झाली असती.


तेव्हापासून उरका पाडणे प्रकार थोडा कमी केला. तरी अजूनही एखाद वेळी उफाळून येतो स्वभाव. एखाद्या दुपारी एकदम कुटिरोद्योग - चटण्या, मसाले करणे, शेंगदाणे भाजणे, नारळ खरवडणे सुरू होते. पण नेहमी नाही. Let it go...! जमेल तेव्हा जमेल तेवढे..!

© श्रेया श्रीधर महाजन. १०जुलै २०२३


आठवणी दाटतात

 

 

आठवणींच्या हिंदोळ्यावर आपण सारे नेहमीच झुलत असतो. त्यातल्या त्यात एखाद्या वळणावर उभे असलो..काही परिवर्तने येणार असतील आयुष्यात, तर अधिकच हळवे होऊन पहातो आपण भूतकाळाकडे! काही घटना अगदी स्पष्ट, आताच जगल्या सारख्या आठवतात. मनाच्या कप्प्यात साठवलेले तरल, सूक्ष्म अनुभव पुन्हा जिवंत होतात, मनाला ताजेतवाने करून जातात.


अमेरिकेतील वास्तव्य संपवून परत भारतात जाण्यास, आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना भेटण्यास उत्सुक मनाने जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं, किती भरभरून जगलो आपण गेली काही वर्षे! मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून एकदम शांत वातावरणात आलो. ‘जरा विसावू या वळणावर’ असे म्हणून थबकलो. आपल्याला इथे जे सखे सोबती भेटले ते आपलं आयुष्य अधिकच समृद्ध करून गेले. कुणी चिरंतन टिकणारे विचार दिले, तर कुणी स्वत:ला येणारं काही शिकवून गेले.


 इथेच आपल्या जगण्याला अध्यात्माचा परीसस्पर्श लाभला. मंत्रजपातून होणाऱ्या अननुभूत आनंदाचा अनुभव प्रथम मिळाला ते क्षण तर कधीच विसरू शकत नाही. इथल्या देवळाच्या मंडपात मंत्रजप होत होता. सुस्वर गायन, पेटीची साथ, झांजा , तबला, ढोलक सगळ्यां वाद्यांचा मेळ जुळून आला होता.. सारं वातावरण त्या मंत्राने भारलेलं, शब्दश: ‘मंत्रमुग्ध’ झालेलं होतं! ‘आवडी लाठी (जप) मुखासी’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, तो प्रत्यय असाच असेल का असा विचार मनाशी येतो न येतो तोच देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं एक फूल अचानक पडलं. त्याच्या कारणांची मीमांसा करावी असे नाही वाटले. ज्या चैतन्याने आपण हेलावलो  त्या लहरी खरोखर आसमंतात देखील विहरत आहेत या जाणीवेने डोळे पाणावले.


कालांतराने  मंत्रजपातून निर्माण होणाऱ्या अवीट आनंदाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. इथल्या वास्तव्याने दिलेली ही सगळ्यात मोठी शिदोरी! कितीही वाटली तरी न संपणारी, आयुष्यभर पुरेल अशी!


 ©  श्रेया श्रीधर महाजन . 

१६ ऑक्टोबर २०१२ 


 


 

आजी


 
कुणास ठाऊक किती वर्षापूर्वी लिहिला होता . एक जुना लेख सापडला . ब्लॉगवर टाकायचा सुद्धा राहिला. वाचताना खूप जुन्या काळाचे वाटते पण प्रिय व्यक्तीच्या आठवणी नेहेमी ताज्या असतात.


मागे एकदा मी बडोद्याला माझ्या एका चुलत सासूबाईंकडे गेले होते. त्या तेजसचे भारी लाड करीत होत्या. आम्हाला दोघाना सांगितलं होतं आजीकडे ‘फ़्री पास’ असतो. काहीही केलं तरी चालतं. कित्ती गोड आहेत त्या! माझ्या मनात नकळत तुलना सुरु झाली. खरंच या ‘मॉडर्न आजी’ म्हणजे मस्त ‘आइस्क्रीमसारख्या’ आहेत.


त्यामानाने आमची आजी म्हणजे कोकणातला फ़णस. एक मागची पिढी. पोटात माया असली तरी कधी ओठावर नाही यायची. तिचं नाव ‘शांताबाई पेंडसे’. आमचा मामा म्हणायचा नावाच्या अगदी विरुद्ध आहेस तू. नाव शांता आणि असतेस एकदम ऍक्टिव. घरी पाहुणे आले, मामीने काही तरी खायला, चहा आणून दिले आणि पाहुण्यांनी खाल्ले प्यायले की शून्य मिनिटात ती भांडी घासून जागेवर गेलेली असायची. ७५ ते ८० वयाच्या बाई इतक्या झपाझप काम करतायत हे पाहून अनोळखी पाहुणे तर अवाक होत. पटापट स्टूलवर चढायचे वरच्या वस्तू काढायच्या, आवराआवर करायची हे वयाच्या मानाने पुष्कळच होते. शक्यतो कोणत्याही कामाला दुसर्‍याची मदत घ्यायचीच नाही. घरातले, बाहेरचे सगळा कामाचा धडाका एकट्यानेच पार पाडायचा ही सवय अगदी मामाचे लग्नं होईपर्यंत होती. शिवाय नातेवाईकांच्या घरातले शुभकार्य असो वा अशुभ, आठेक दिवस आधी मदतीला जावे तर तिनेच. हक्काने बोलावूनही घेत तिला माझ्या मावश्या , तिची सगळी भावंडे. तिचा कामाचा उरक आणि अचूकता पाहिल्यावर हे साहाजिक होते. घरातली मोठी काकू, सगळ्यात मोठी बहीण म्हणून मानाने सगळे बोलावत नि ती जात असे. आमची पणजी आजी ही वास्तविक तिची सावत्र आई, पण मायलेकींचे पुष्कळ हितगुज चालायचे.


मला लहानपणी खूप आकर्षण होते ते सुटीत तिच्याबरोबर सकाळी ५.३० ला उठून फ़ुलं काढायला अंगणात जायचे. खरं सांगायचं तर इतक्या सकाळी अंगण कसं दिसत असेल असंही वाटायचं. बर्‍याच आज्या सकाळी खाली उतरायच्या. मी तिला रोज रात्री सांगून झोपत असे की मला उठव, पण मला जाग यायची आठ वाजता, मामा चहा प्यायला बसला की आम्हाला मुलाना उठवायचा. थोडं मोठं झाल्यावर लवकर जाग आली तर स्वयंपाकघरात तिचा रेडिओ चालू असायचा. कुणासाठी कोण जाणे. एकीकडे तिचे काम चालू असायचे. ती काही ऐकतेय असे वाटले नाही. पण त्यातून बहुधा एक लय मिळत असावी कामाला. पण बातम्या ऐकायच्या, नि ऐकता ऐकता स्वयंपाकघर झाडायचे. रांगोळी घालायची, उंबर्‍यावर, देवासमोर, मग पूजेची तयारी करायची. मला लग्नं झाल्यावर खूप वर्षे वाटायचे की कामाचा हाच क्रम असायला हवा, दूध तापवले, चहा घेतला की थोडी साफ़ सफ़ाई, पूजेची तयारी, आणलेल्या फ़ुलांचे सुरेख हार करायचे आणि मग पारोशाने करायचा स्वयंपाक म्हणजे नाश्त्याची तयारी. बाकी सारी कामे उरकली की अंघोळ, पूजा मग नैवेद्याचा स्वयंपाक. अर्थात एवढी शिस्त मला कधीच झेपली नाही.


तिचा सगळ्यात विशेष गुण म्हणजे तिची क्रियेटिविटी. आमच्या मामाने एक सुंदर शोकेस करुन घेतली होती. मामीच्या लग्नातल्या रुखवतावरच्या काही शोभेच्या वस्तू त्यात होत्या. आणि जोडीला आजीने पोतीपासून तयार केलेले अगदी रिअलिस्टिक दिसणारे उंट, कुत्रा, सायकल असे काही प्राणी , काही वस्तू त्यात होत्या. फ़ुंकण्यापासून तोरणे, मोत्यांच्या महिरापी, तोरणे असं बरंच हाताने तयार केलेलं सामान घराच्या डेकोरेशनसाठी वापरलेलं होतं. ते अधूनमधून बदलायचं आणि धुवून ठेवायचं हा मेन्टेनन्स आजी किंवा मामी करायच्या. विणलेले मोठे रुमाल सोफ़्यावर बॅकरेस्ट सारखे घातले जात, लोकरीची तोरणे घरातल्या दारांना असत. भरतकाम केलेले मोठाले पडदे होते. मी आणि ताई मध्ये लुडबुडायला जात होतो तिथे. आपोआप या गोष्टी शिकलो. एक गोष्ट शिकवायचा बिचारीने फ़ार प्रयत्न केला पण मी कधीच शिकले नाही ते म्हणजे लोकरीचे काम. क्रोशाच्या सुया आणून दिल्या तिने, विणकामाच्या तिच्या सुया पण द्यायची पण हे मी कधीच करु शकले नाही. तिच्या हातात मात्र कायम नातवण्ड , भाचेकम्पनी कोणाचा तरी स्वेटर करायला घातलेला असायचा. आमचं बराच वेळ डिस्कशन चालायचं ते कलर कॉम्बिनेशनवर. बाळंतविड्यावर द्यायचा स्वेटर असेल तर मी म्हणणार बेबी पिंक नाही तर सी ग्रीन घे रंग. तिचं म्हणणं पोरं मळवतात, लाळ गळते जरा डार्क कलरचा घेऊया. तिचा प्रॅक्टिकल अप्रोच आणि मला तो क्युट दिसला पाहिजे असं वाटणं अशी जुगलबंदी चालायची. मग बॉर्डरला काय चांगलं दिसेल यावर चर्चा चालायची. माझं वय असेल ७-८ वर्षं, पण मी चर्चा एकदम मोठ्या माणसासारखी करायचे तिच्याशी. तिला पण मजा वाटत असणार, त्यामुळे अगदी माझं लग्नं झाल्यावर सुद्धा कधी गेलं तर ती आधी मला तिचं विणकाम दाखवणार , मग कसं दिसतंय विचारणार सगळं तसंच चालू होतं. मलाही काही नवीन केले तर आजी, मामीला दाखवायची सवय होती, कविता पाठ केलीय जरा म्हणून घे, भाषण पाठ केलं आहे ते ऐक, स्तोत्रं पाठ केलं आहे स्पर्धा आहे जरा ऐक यासाठी किंबहुना अखंड बडबडीसाठी एकदम हक्काचे श्रोते म्हणजे आजी आणि मामी.


तिच्याच्यानी होत होतं तोपर्यंत तिला कधी रिकामी बसलेली पाहिली नाही आम्ही. विणकाम, भरतकाम, पोतीचे काम, वेळ उरला तर आमच्या घरी शिवणाचं मशीन होतं त्यावर स्वत:ची पोलकी वगैरे शिवायला येऊन बसत असे. नातेवाईकात कोणाकडे बाळंतपण जवळ आले असेल तर झबली, गलोती, दुपटी बेतायची, शिवायची असे काम चालायचे. खरंच रेडीमेड वस्तू देणं आणि शो ऑफ़ करणं यापेक्षा प्रेमाने स्वत: करुन देणं याला खूप महत्त्व होतं. आणखीन एक काम म्हणजे तिच्या मऊ मऊ नऊवार साड्यांची बाळांसाठी गोधडी शिवायची, बाळाच्या आईसाठी पोटपट्टे शिवायचे. आणि कोणी बाळंतीण असेल तर तिला इन्स्ट्रक्शन द्यायच्या हे फ़ार आवड्तं काम. विशेषत: काय खा आणि काय खाऊ नको ह्याचं इत्थंभूत ज्ञान सहजपणे ती देत असे. आणि बाळाला बघायला जाताना डिंकाचे लाडू, कच्चा तुपात भिजवलेला डिंक असा घरगुती खाऊ घेऊन जात असे. किंबहुना सगळ्या आज्यांना असते तशी घरगुती औषधांची , आयुर्वेदिक औषधांची माहिती तिच्याकडे होती आणि वेळोवेळी ती आम्हाला आवश्यक गोष्टी सांगत पण असे.


तिच्या हाताला मोठ्ठा गुण होता, लावलेली झाडे जगत असत. घराच्या गॅलरीत आणि गच्चीवर सुंदर बाग फुलवली होती, आम्हाला भातात घालायला कधी आंबेमोहोराचं पान मिळे, केसात माळायला सोनटकका, गावठी गुलाब तर नेहमीच.


जर रविवारी दुपारी मामा मामी घरी नसले तर कुटिरोद्योग सुरु व्हायचा. वेगवेगळ्या कोरड्या चट्ण्या, मेतकूट, वेस्वार आणि मसाले यांचा दरवळ घरात पसारायचा. मिक्सरच्या आवाजाने डिस्टर्ब होऊ नये म्हणून मामा दुपारी असला तर मिक्सर बंद. कधीकधी एखादा नारळ खोवून नारळाच्या वड्या करायची आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की कडेची तिरकी वडी आम्हाला चव घ्यायला द्यायची. मधल्या चौकोनी वड्या आल्यागेल्या पाहुण्यांसाठी. आम्ही भावंडं इतकी वात्रट की मामीच्या मागे लागून चांगल्या वड्या पण मागून खायचो. तिची सगळी वाळवणं गच्चीत वाळत टाकायला मदत करायची नि त्या बदल्यात आंब्याचा आटवलेला गोळा पदरात पाडून घ्यायचा असे उद्योग करायचे. फ़ार पूर्वी तर पापड चिकवड्या घालणे हा मोठ्ठा प्रोग्राम असायचा. कोणाकडे जायचे तर घरगुती तयार केलेला खाऊ नेलाच पाहिजे असं वाटायचं मला. अजूनही कोणाकडे जाताना किमान घरचा चिवडा तरी घेऊन जावं असं वाटतं.


भरीस भर म्हणजे कोणाच्या लेकीचे, भाचीचे असे एखाद्या मुलीचे लग्नं जवळ आले असेल तर रुखवतावर देण्यासाठी वस्तू, गव्हले-मालत्या करणे, शिवाय लाडू – वड्या तयार करणे, त्यावर वधू वरांची नावे केशराच्या रंगाने लिहिणे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या फ़ॅक्टरीसारख्या चालायच्या.फ़ॅक्टरी म्हणतेय कारण प्रोफ़ेशनल वाटावं इतकी कामात अचूकता आणि सफ़ाई असायची. विशेष म्हणजे कोणीही म्हटलं तरी मी तुम्हाला करंज्या करुन देईन असं ती इतक्या सहज म्हणायची आणि सुरेख करायची ओल्या नारळाच्या करंज्या. मग तिच्या सख्ख्या, चुलत, मावस,आते कोणत्याही भावंडाकडलं लग्नं असो वा सासरच्या नात्यातलं. सगळ्यात भारी म्हणजे संक्रांतीच्या वेळी हाताने तिळाचा हलवा करणं. तिचे हात भाजत कसे नाहीत हे पाहायला माझा खडा पहारा असायचा तिच्यावर. स्टोव जमीनीवर घेऊन तासचे तास ते तिळ भाजायचे, थेंब थेंब साखरेचा पाक करुन सात आठ दिवस तो हलवा अक्षरश: कणाकणाने वाढवायचा हे पहाताना छान वाटायचं. पांढरा आणि शेंदरी हलवा मिसळला की पारिजातकाच्य फ़ुलासारखा दिसायचा.


अजूनही मला भाकरी करताना रोज आजीची आठवण येते. मी स्वत: स्वयंपाक अगदी खूप उशीरा करायला लागले . पण निरीक्षण करायला प्रयोगशाळा सतत उपलब्ध होती. आणि आई घरात ट्युशन्स घेत असे त्यामुळे आम्ही शेजारीच पडीक असत असू. आजीच्या हातची भाकरी विशेषत: दणदणीत मोठी नाचणीची भाकरी, नाचणीची आंबिल हे पदार्थ उन्हाळयात नेहेमी असायचे. दुपारी जेवायला कधी एकटीच असेल तर एक मोठी भाकरी नि कुळथाचं पिठलं, तीळाची चटणी असं जेवण असायचं तिचं. भात केलाच तर रात्री. खूप लवकर मधुमेह झाल्याने आणि तो आनुवंशिक असल्याने तिला एका वैद्याने मोजून जेवायला सांगितले होते. कायम मोजून अर्धी वाटी भात जेवताना आम्ही तिला पाहिलं आहे. जेवण मोजकं, काम मात्र न मोजता येईल इतकं अफ़ाट आणि वेग प्रचंड. त्या काळातल्या बायकांना २५ माणसांचा स्वयंपाक सहज करता येत असे. मंगळागौर, हळदी कुंकू, सत्यनारायण, गणपती, दिवाळी अशा प्रसंगी खरोखर २५ माणसं असायचीच त्यांच्या घरी जेवायला. स्वयंपाकघर ही आवडती टेरिटरी. त्यामुळे भांड्यांमध्ये इतका जीव अडकलेला की विचारु नका. एक वाटी इकडली तिकडे झाली की चौकशी सुरु. अशा सवयी होत्या म्हणूनच घरातल्या वस्तू इकडे तिकडे जात नसत. आणखी एका बाबतीत कायम दक्ष असे. आम्ही कधी भेटायला गेलो तर नवर्‍याचं, मुलाचं खायचं प्यायचं करुन आले का हा प्रश्न कायम विचारायची. अगदी आता आतापर्यंत. आपण बाहेर पडत असू तर घरच्यांची व्यवस्था लावल्याशिवाय जायचं नाही ही शिस्त तिची होती, तीच आईकडे आलीय आणि आम्हा नातींकडे पण.


तिचा अजून एक आवडता उद्योग म्हणजे जप लिहिणे. खूप बारीक अक्षरात श्रीराम जय राम जय जय राम असा जप ती लिहित बसत असे. तासचे तास हे काम चालायचे. तेदेखील खूप सिस्टेमेटिक अगदी एकाखाली एक. मी कधी कधी सांगायचे तू काम करतेस तर कर. मी थोडं लिहिते. ते पण चार वेळा चेक करणार बरोबर लिहिलं आहे ना. पुढे त्या जप लिहिलेल्या वह्या कोणत्याशा आश्रमात देत असे. वास्तविक हे ऐच्छिक काम, त्यात इतकं व्यवस्थित कशाला करायला हवं असं माझं मत. पण तिच्या कामाचं एक स्टॅन्डर्ड होतं . त्याहून कमी प्रतीचं काम तिला चालायचंच नाही.


एका भजनी मंडळात दर गुरुवारी जात असे आणि एक छान ग्रुप पण होता मैत्रिणींचा. भागवत, दासबोध वाचीत. कधी एकत्र भजन, कधी आवळीभोजन, कधी तुळशीचं लग्नं, कधी महालक्ष्मी उत्सव आणि जागरणं. आमच्यापेक्षा अधिक उत्साही आहे ती असं वाटायचं . त्यातल्या एकेक गळायला लागल्यावर किती वाईट वाटले होते तिला. कोणी घर शिफ़्ट केले, मुलुंडमधून दुसरीकडे गेल्या, कोणी स्वत:चे घर बंद करुन मुलांकडे रहायला गेल्या. मामाने देखील मुलुंडमधून भांडुपला रहायला जायचा निर्णय घेतला तेव्हा मात्र तिचाही नाईलाज झाला. हळूहळू दिसणं आणि ऐकू येणं दोन्ही गोष्टीत अडचणी येऊ लागल्या. अगदी ८० वर्षाची होती तिथपर्यंत एकटी फ़िरणारी आजी हळूहळू फ़क्त अंगणात, मग घरातल्या घरात फ़िरायला लागली. मुंबईत आत्मविश्वासाने एकटं फ़िरणार्‍या माणसाला असं परावलंबित्व सहन करणं अवघड! आम्ही नातवंडं जवळ होतो तोपर्यंत ती येता जाता करायला काही तरी काम सांगायची.


आजही मी मान्य करेन की तिच्याएवढं डिटेलिंग आणि परफ़ेक्शन आम्हाला जमणे नाही आणि नवे शिकण्याचा उत्साह, प्रयोगशीलता देखील. फ़ारसं शालेय शिक्षण नसताना हे गुण तिने कुठून मिळवले कुणास ठाऊक? तिचा काळ पहाता विधवांना समाजात खूप मान होता असंही नाही. पण संघर्ष करण्याची तयारी, वेळ आली तर तिखट जिभेने अरेला कारे करत स्वत:च्या चार मुलांना उत्तम प्रकारे वाढवलं तिने. नात्यागोत्याच्या मुलीबाळींचं पण केलं. भावंडांची मुलं आपल्याकडे ठेवून देखील घेतली. खरच अशा कर्तुत्ववान बायका नवऱ्यामागे किती कौशल्याने संसार करीत असत . यांना कुठलेही पद्मश्री , पद्मविभूषण दिले तरी कमीच आहे .


तिच्या आठवणी कायम सोबत रहातील, ती सोबत नसली तरी! © श्रेया श्रीधर महाजन.


जगले जशी - लालन सारंग



आमच्या लहानपणी लालन सारंग- कमलाकर सारंग , सई परांजपे - अरुण जोगळेकर , सुलभा आणि अरविन्द देशपांडे , पु लं आणि सुनीताबाई, किशोर प्रधान - शोभा प्रधान, नीना व दिलीप कुलकर्णी ही मंडळी नेहमी टी व्ही वर दिसायची . नाटक चित्रपट क्षेत्रात मुक्त संचार करणारी खऱ्या अर्थाने सृजनशील अशी जोडपी होती. गजरा , प्रतिभा- प्रतिमा, मुखवटे आणि चेहरे अशा कार्यक्रमात त्यांनी इतक्या वेळा हसवलं  रडवलं;  काही विचारू नका . पुढे ही यादी अगदी विजय कदम - पद्मश्री जोशी , अशोक सराफ - निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे - रुही बेर्डे यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. या सगळ्या मंडळींनी बालपण आणि तरुण वयात आम्हाला भरभरून निखळ करमणूक दिली. अगदी 'पाणी टंचाई ' वरचा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गजरा अजून आठवतो. मात्र या तारे तारकाना कोणत्या दिव्यातून जावे लागत असेल याची फार कल्पना त्या काळात नव्हती. काही तारका देखील अतिशय प्रकाशमान होत्या. यात नेहमी नाव आठवते त्या सात्विक चेहऱ्याच्या सुहास जोशी, अगदी लाडकी 'ती ' फुलराणी भक्ती बर्वे, आणि बातम्या वाचता वाचता देखणे चित्रपट निर्माण करण्यापर्यंत पोहोचलेली स्मिता तळवलकर! 


 

सध्या सगळीकडे 'बाईपण भारी देवा ' चित्रपट गाजतो आहे. प्रमोशनच्या निमित्ताने वंदना गुप्ते यांना पाहण्याचा ऐकण्याचा योग आला. आणि असं वाटलं बाईने सत्तरीला हे असं इतकं बिनधास्त असावं. नाचावं, गावं. किंबहुना या अश्या मोकळ्या आणि स्पष्टवक्त्या आहेत म्हणूनच नाटक चित्रपट अशा अस्थिर क्षेत्रात टिकू शकल्या. 




अशाच एका अभिनेत्रीचे आत्मचरित्र वाचते आहे ज्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक प्रायोगिक,  व्यावसायिक  नाटकात भूमिका केल्या आणि त्या विवादास्पद ठरल्या तरी न घाबरता दोघे नवरा बायको ठामपणे उभे राहिले. 'लालन सारंग ' हे नाव ऐकल्यावर प्रथम आठवते ते त्यांचे रुपयाएवढे मोठे कुंकू, अगदी शांत पण ठाम स्वर आणि बोलके डोळे. 'जगले जशी ' हे त्यांचं प्रांजळ आत्मकथन फार आवडलं. किंबहुना 'मी आणि माझ्या भूमिका ' नावाचा एकपात्री प्रयोग त्या करीत असत, त्यातील बराचसा भाग वापरून हे पुस्तक केले असे त्या म्हणतात. मात्र पुस्तकाचा ओघ पाहता ह्यात पुष्कळ नवे लिखाण समाविष्ट केले असावे.


खरे तर पुस्तक वाचत असताना धक्क्यावर धक्के बसतात. पूर्वी वर्तमानपत्रात 'जंगली कबूतर ' नावाच्या नाटकाची जाहिरात पाहिली होती. आणि अशा भूमिका करू शकणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून लालन सारंग माहीत होत्या. थोडे मोठे झाल्यावर कळले कॉलगर्लच्या आयुष्यावर आधारित हे नाटक होते. विजय तेंडुलकरांच्या नाटकाचे विषय अगदी वेगळे आणि त्यानिमित्ताने त्यांनी रंगवलेले मनोव्यापार अद्भुत. ते प्रत्यक्ष रंगमंचावर आणणे, श्लील अश्लिलतेच्या मर्यादा सांभाळून स्टेजवर दाखवणे हे खरोखर कौशल्याचे काम. दिग्दर्शक म्हणून कमलाकर सारंग यांचे कसब आणि कलाकारांचे तर आहेतच अभिनय गुण. सखाराम बाईंडर, त्यावर झालेल्या केस हे तर सर्वज्ञात आहे. 



पुस्तक वाचताना कलाकारांच जीवन, विशेषत: गावोगावी नाटकाचे दौरे असताना किती धकाधकीचं होतं हे जाणवतं. अनेकदा कलाकार कार्यक्रमांना उशीरा येतात त्यांचं कारण त्यांचं बिझी शेड्युल ! पण ते किती बिझी याची जाणीव पुस्तक वाचताना येते. पुण्याचा दुपारचा प्रयोग करून संध्याकाळी सातला मुंबईला कार्यक्रम ! मला विचाराने सुद्धा धडकी भरली. शारीरिक, मानसिक क्षमता आणि उर्जा किती अफाट असेल आणि व्यक्तिरेखा रंगविण्याची उर्मी किती जोरदार असेल याची कल्पना येते. 


दौऱ्यावर असताना सहकलाकार आजारी पडणे, मृत पावणे, कधीकधी आपल्याला काम करताना शारीरिक दुखापत होणे, रंगमंच व्यवस्था करताना थोडा जरी हलगर्जीपणा झाला असेल तर ऐनवेळी किती पंचाईत होत असेल आणि सहकलाकार कसे सांभाळून घेतात याचे किस्से तर प्रत्येक रंगमंचीय कलाकाराकडे असावेत. 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ' या उक्तीचा पुन्हा पुन्हा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. 


कलाकार आपल्या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष आयुष्यात जगू लागला तर ते किती त्रासाचे होईल. त्याचा अनुभव लेखिकेने रथचक्र या श्री ना पेंडसे लिखित नाटकाचे प्रयोग करताना घेतला. त्यांना स्वतःला देखील त्यांच्या खऱ्या मुलाच्या भविष्याची खूप काळजी वाटू लागली आणि आपण आपल्या करिअरच्या नादात मुलाला दुरावतो आहोत का अशी भीती वाटू लागली. 


त्यांना असाच विचार करायला भाग पाडले ते ' कमला ' या विजय तेंडुलकर लिखित नाटकाने. आपण गृहिणी असो किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रिया आपण नक्की स्वतंत्र आहोत का हा विचार त्यांच्या मनात यायला लागला तो सगळा भाग मुळातून वाचण्यासारखं आहे. १९९२ ला हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यावेळी त्यांना वाटलेली खंत, आजही आपण तिथेच आहोत असं वाटायला लागलं आहे. फार तर एखाद्या दिवशी जेवण मागवू एवढंच ! बाकी कुटुंबातली आपली भूमिका फार बदललेली नाही. 


काळाच्या मानाने ही माणसं फार पुढचा विचार करणारी होती, मग ते लिहिणारे विजय तेंडुलकर असोत वा प्रत्यक्षात आणणारे कलाकार !


एक वेगळीच जिद्द या बाईंमध्ये दिसते. 'करायचं म्हणजे करायचं ' या जिद्दीने त्यांनी गुजराती भाषा येत नसताना  थोडीफार शिकून गुजराती नाटकाचे देखील प्रयोग केले. रथचक्र ची पुढे दूरदर्शन मालिका झाली . ती पाहिल्याचे चांगले आठवते. त्यात लालन सारंग लक्षात राहिल्या त्याबरोबर सुचित्रा गुढेकर आताची बांदेकर देखील लक्षात राहिली. त्यानिमित्ताने भारतभर ही मराठी कादंबरी पोहोचली.


एक काश्मिरी साडीवाला त्यांच्या घरी नेहमी येत असे त्याबद्दलचा विनोदी किस्सा त्यांनी लिहिला आहे. त्याने सांगितले मी माझ्या आईला दाखवत होतो या ताईंना साड्या विकायला मी त्यांच्या घरी जातो. त्यावर आई म्हणाली, ' इसका मर्द बहुत खराब है अकेली को छोड के चला गया ' . त्याला आईला पटवून द्यायला लागलं नवरा चांगला आहे.  हे नाटक आहे नाटक!


हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले आपण दूरदर्शनवर कायम त्यांनी रंगवलेली चंपा, चंदा पाहत आलो पण खरेखुरे व्यक्तिमत्त्व आपल्याला कळलेच नव्हते.  विजय तेंडुलकर प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे शैलीला एक वेगळाच ओघ, एक सहजता , अकृत्रिम डौल आहे.जरूर वाचावे असे वाचनीय पुस्तक! © श्रेया श्रीधर महाजन. ३० जुलै २०२३




श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...