कुणास ठाऊक किती वर्षापूर्वी लिहिला होता . एक जुना लेख सापडला . ब्लॉगवर टाकायचा सुद्धा राहिला. वाचताना खूप जुन्या काळाचे वाटते पण प्रिय व्यक्तीच्या आठवणी नेहेमी ताज्या असतात.
मागे एकदा मी बडोद्याला माझ्या एका चुलत सासूबाईंकडे गेले होते. त्या तेजसचे भारी लाड करीत होत्या. आम्हाला दोघाना सांगितलं होतं आजीकडे ‘फ़्री पास’ असतो. काहीही केलं तरी चालतं. कित्ती गोड आहेत त्या! माझ्या मनात नकळत तुलना सुरु झाली. खरंच या ‘मॉडर्न आजी’ म्हणजे मस्त ‘आइस्क्रीमसारख्या’ आहेत.
त्यामानाने आमची आजी म्हणजे कोकणातला फ़णस. एक मागची पिढी. पोटात माया असली तरी कधी ओठावर नाही यायची. तिचं नाव ‘शांताबाई पेंडसे’. आमचा मामा म्हणायचा नावाच्या अगदी विरुद्ध आहेस तू. नाव शांता आणि असतेस एकदम ऍक्टिव. घरी पाहुणे आले, मामीने काही तरी खायला, चहा आणून दिले आणि पाहुण्यांनी खाल्ले प्यायले की शून्य मिनिटात ती भांडी घासून जागेवर गेलेली असायची. ७५ ते ८० वयाच्या बाई इतक्या झपाझप काम करतायत हे पाहून अनोळखी पाहुणे तर अवाक होत. पटापट स्टूलवर चढायचे वरच्या वस्तू काढायच्या, आवराआवर करायची हे वयाच्या मानाने पुष्कळच होते. शक्यतो कोणत्याही कामाला दुसर्याची मदत घ्यायचीच नाही. घरातले, बाहेरचे सगळा कामाचा धडाका एकट्यानेच पार पाडायचा ही सवय अगदी मामाचे लग्नं होईपर्यंत होती. शिवाय नातेवाईकांच्या घरातले शुभकार्य असो वा अशुभ, आठेक दिवस आधी मदतीला जावे तर तिनेच. हक्काने बोलावूनही घेत तिला माझ्या मावश्या , तिची सगळी भावंडे. तिचा कामाचा उरक आणि अचूकता पाहिल्यावर हे साहाजिक होते. घरातली मोठी काकू, सगळ्यात मोठी बहीण म्हणून मानाने सगळे बोलावत नि ती जात असे. आमची पणजी आजी ही वास्तविक तिची सावत्र आई, पण मायलेकींचे पुष्कळ हितगुज चालायचे.
मला लहानपणी खूप आकर्षण होते ते सुटीत तिच्याबरोबर सकाळी ५.३० ला उठून फ़ुलं काढायला अंगणात जायचे. खरं सांगायचं तर इतक्या सकाळी अंगण कसं दिसत असेल असंही वाटायचं. बर्याच आज्या सकाळी खाली उतरायच्या. मी तिला रोज रात्री सांगून झोपत असे की मला उठव, पण मला जाग यायची आठ वाजता, मामा चहा प्यायला बसला की आम्हाला मुलाना उठवायचा. थोडं मोठं झाल्यावर लवकर जाग आली तर स्वयंपाकघरात तिचा रेडिओ चालू असायचा. कुणासाठी कोण जाणे. एकीकडे तिचे काम चालू असायचे. ती काही ऐकतेय असे वाटले नाही. पण त्यातून बहुधा एक लय मिळत असावी कामाला. पण बातम्या ऐकायच्या, नि ऐकता ऐकता स्वयंपाकघर झाडायचे. रांगोळी घालायची, उंबर्यावर, देवासमोर, मग पूजेची तयारी करायची. मला लग्नं झाल्यावर खूप वर्षे वाटायचे की कामाचा हाच क्रम असायला हवा, दूध तापवले, चहा घेतला की थोडी साफ़ सफ़ाई, पूजेची तयारी, आणलेल्या फ़ुलांचे सुरेख हार करायचे आणि मग पारोशाने करायचा स्वयंपाक म्हणजे नाश्त्याची तयारी. बाकी सारी कामे उरकली की अंघोळ, पूजा मग नैवेद्याचा स्वयंपाक. अर्थात एवढी शिस्त मला कधीच झेपली नाही.
तिचा सगळ्यात विशेष गुण म्हणजे तिची क्रियेटिविटी. आमच्या मामाने एक सुंदर शोकेस करुन घेतली होती. मामीच्या लग्नातल्या रुखवतावरच्या काही शोभेच्या वस्तू त्यात होत्या. आणि जोडीला आजीने पोतीपासून तयार केलेले अगदी रिअलिस्टिक दिसणारे उंट, कुत्रा, सायकल असे काही प्राणी , काही वस्तू त्यात होत्या. फ़ुंकण्यापासून तोरणे, मोत्यांच्या महिरापी, तोरणे असं बरंच हाताने तयार केलेलं सामान घराच्या डेकोरेशनसाठी वापरलेलं होतं. ते अधूनमधून बदलायचं आणि धुवून ठेवायचं हा मेन्टेनन्स आजी किंवा मामी करायच्या. विणलेले मोठे रुमाल सोफ़्यावर बॅकरेस्ट सारखे घातले जात, लोकरीची तोरणे घरातल्या दारांना असत. भरतकाम केलेले मोठाले पडदे होते. मी आणि ताई मध्ये लुडबुडायला जात होतो तिथे. आपोआप या गोष्टी शिकलो. एक गोष्ट शिकवायचा बिचारीने फ़ार प्रयत्न केला पण मी कधीच शिकले नाही ते म्हणजे लोकरीचे काम. क्रोशाच्या सुया आणून दिल्या तिने, विणकामाच्या तिच्या सुया पण द्यायची पण हे मी कधीच करु शकले नाही. तिच्या हातात मात्र कायम नातवण्ड , भाचेकम्पनी कोणाचा तरी स्वेटर करायला घातलेला असायचा. आमचं बराच वेळ डिस्कशन चालायचं ते कलर कॉम्बिनेशनवर. बाळंतविड्यावर द्यायचा स्वेटर असेल तर मी म्हणणार बेबी पिंक नाही तर सी ग्रीन घे रंग. तिचं म्हणणं पोरं मळवतात, लाळ गळते जरा डार्क कलरचा घेऊया. तिचा प्रॅक्टिकल अप्रोच आणि मला तो क्युट दिसला पाहिजे असं वाटणं अशी जुगलबंदी चालायची. मग बॉर्डरला काय चांगलं दिसेल यावर चर्चा चालायची. माझं वय असेल ७-८ वर्षं, पण मी चर्चा एकदम मोठ्या माणसासारखी करायचे तिच्याशी. तिला पण मजा वाटत असणार, त्यामुळे अगदी माझं लग्नं झाल्यावर सुद्धा कधी गेलं तर ती आधी मला तिचं विणकाम दाखवणार , मग कसं दिसतंय विचारणार सगळं तसंच चालू होतं. मलाही काही नवीन केले तर आजी, मामीला दाखवायची सवय होती, कविता पाठ केलीय जरा म्हणून घे, भाषण पाठ केलं आहे ते ऐक, स्तोत्रं पाठ केलं आहे स्पर्धा आहे जरा ऐक यासाठी किंबहुना अखंड बडबडीसाठी एकदम हक्काचे श्रोते म्हणजे आजी आणि मामी.
तिच्याच्यानी होत होतं तोपर्यंत तिला कधी रिकामी बसलेली पाहिली नाही आम्ही. विणकाम, भरतकाम, पोतीचे काम, वेळ उरला तर आमच्या घरी शिवणाचं मशीन होतं त्यावर स्वत:ची पोलकी वगैरे शिवायला येऊन बसत असे. नातेवाईकात कोणाकडे बाळंतपण जवळ आले असेल तर झबली, गलोती, दुपटी बेतायची, शिवायची असे काम चालायचे. खरंच रेडीमेड वस्तू देणं आणि शो ऑफ़ करणं यापेक्षा प्रेमाने स्वत: करुन देणं याला खूप महत्त्व होतं. आणखीन एक काम म्हणजे तिच्या मऊ मऊ नऊवार साड्यांची बाळांसाठी गोधडी शिवायची, बाळाच्या आईसाठी पोटपट्टे शिवायचे. आणि कोणी बाळंतीण असेल तर तिला इन्स्ट्रक्शन द्यायच्या हे फ़ार आवड्तं काम. विशेषत: काय खा आणि काय खाऊ नको ह्याचं इत्थंभूत ज्ञान सहजपणे ती देत असे. आणि बाळाला बघायला जाताना डिंकाचे लाडू, कच्चा तुपात भिजवलेला डिंक असा घरगुती खाऊ घेऊन जात असे. किंबहुना सगळ्या आज्यांना असते तशी घरगुती औषधांची , आयुर्वेदिक औषधांची माहिती तिच्याकडे होती आणि वेळोवेळी ती आम्हाला आवश्यक गोष्टी सांगत पण असे.
तिच्या हाताला मोठ्ठा गुण होता, लावलेली झाडे जगत असत. घराच्या गॅलरीत आणि गच्चीवर सुंदर बाग फुलवली होती, आम्हाला भातात घालायला कधी आंबेमोहोराचं पान मिळे, केसात माळायला सोनटकका, गावठी गुलाब तर नेहमीच.
जर रविवारी दुपारी मामा मामी घरी नसले तर कुटिरोद्योग सुरु व्हायचा. वेगवेगळ्या कोरड्या चट्ण्या, मेतकूट, वेस्वार आणि मसाले यांचा दरवळ घरात पसारायचा. मिक्सरच्या आवाजाने डिस्टर्ब होऊ नये म्हणून मामा दुपारी असला तर मिक्सर बंद. कधीकधी एखादा नारळ खोवून नारळाच्या वड्या करायची आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की कडेची तिरकी वडी आम्हाला चव घ्यायला द्यायची. मधल्या चौकोनी वड्या आल्यागेल्या पाहुण्यांसाठी. आम्ही भावंडं इतकी वात्रट की मामीच्या मागे लागून चांगल्या वड्या पण मागून खायचो. तिची सगळी वाळवणं गच्चीत वाळत टाकायला मदत करायची नि त्या बदल्यात आंब्याचा आटवलेला गोळा पदरात पाडून घ्यायचा असे उद्योग करायचे. फ़ार पूर्वी तर पापड चिकवड्या घालणे हा मोठ्ठा प्रोग्राम असायचा. कोणाकडे जायचे तर घरगुती तयार केलेला खाऊ नेलाच पाहिजे असं वाटायचं मला. अजूनही कोणाकडे जाताना किमान घरचा चिवडा तरी घेऊन जावं असं वाटतं.
भरीस भर म्हणजे कोणाच्या लेकीचे, भाचीचे असे एखाद्या मुलीचे लग्नं जवळ आले असेल तर रुखवतावर देण्यासाठी वस्तू, गव्हले-मालत्या करणे, शिवाय लाडू – वड्या तयार करणे, त्यावर वधू वरांची नावे केशराच्या रंगाने लिहिणे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या फ़ॅक्टरीसारख्या चालायच्या.फ़ॅक्टरी म्हणतेय कारण प्रोफ़ेशनल वाटावं इतकी कामात अचूकता आणि सफ़ाई असायची. विशेष म्हणजे कोणीही म्हटलं तरी मी तुम्हाला करंज्या करुन देईन असं ती इतक्या सहज म्हणायची आणि सुरेख करायची ओल्या नारळाच्या करंज्या. मग तिच्या सख्ख्या, चुलत, मावस,आते कोणत्याही भावंडाकडलं लग्नं असो वा सासरच्या नात्यातलं. सगळ्यात भारी म्हणजे संक्रांतीच्या वेळी हाताने तिळाचा हलवा करणं. तिचे हात भाजत कसे नाहीत हे पाहायला माझा खडा पहारा असायचा तिच्यावर. स्टोव जमीनीवर घेऊन तासचे तास ते तिळ भाजायचे, थेंब थेंब साखरेचा पाक करुन सात आठ दिवस तो हलवा अक्षरश: कणाकणाने वाढवायचा हे पहाताना छान वाटायचं. पांढरा आणि शेंदरी हलवा मिसळला की पारिजातकाच्य फ़ुलासारखा दिसायचा.
अजूनही मला भाकरी करताना रोज आजीची आठवण येते. मी स्वत: स्वयंपाक अगदी खूप उशीरा करायला लागले . पण निरीक्षण करायला प्रयोगशाळा सतत उपलब्ध होती. आणि आई घरात ट्युशन्स घेत असे त्यामुळे आम्ही शेजारीच पडीक असत असू. आजीच्या हातची भाकरी विशेषत: दणदणीत मोठी नाचणीची भाकरी, नाचणीची आंबिल हे पदार्थ उन्हाळयात नेहेमी असायचे. दुपारी जेवायला कधी एकटीच असेल तर एक मोठी भाकरी नि कुळथाचं पिठलं, तीळाची चटणी असं जेवण असायचं तिचं. भात केलाच तर रात्री. खूप लवकर मधुमेह झाल्याने आणि तो आनुवंशिक असल्याने तिला एका वैद्याने मोजून जेवायला सांगितले होते. कायम मोजून अर्धी वाटी भात जेवताना आम्ही तिला पाहिलं आहे. जेवण मोजकं, काम मात्र न मोजता येईल इतकं अफ़ाट आणि वेग प्रचंड. त्या काळातल्या बायकांना २५ माणसांचा स्वयंपाक सहज करता येत असे. मंगळागौर, हळदी कुंकू, सत्यनारायण, गणपती, दिवाळी अशा प्रसंगी खरोखर २५ माणसं असायचीच त्यांच्या घरी जेवायला. स्वयंपाकघर ही आवडती टेरिटरी. त्यामुळे भांड्यांमध्ये इतका जीव अडकलेला की विचारु नका. एक वाटी इकडली तिकडे झाली की चौकशी सुरु. अशा सवयी होत्या म्हणूनच घरातल्या वस्तू इकडे तिकडे जात नसत. आणखी एका बाबतीत कायम दक्ष असे. आम्ही कधी भेटायला गेलो तर नवर्याचं, मुलाचं खायचं प्यायचं करुन आले का हा प्रश्न कायम विचारायची. अगदी आता आतापर्यंत. आपण बाहेर पडत असू तर घरच्यांची व्यवस्था लावल्याशिवाय जायचं नाही ही शिस्त तिची होती, तीच आईकडे आलीय आणि आम्हा नातींकडे पण.
तिचा अजून एक आवडता उद्योग म्हणजे जप लिहिणे. खूप बारीक अक्षरात श्रीराम जय राम जय जय राम असा जप ती लिहित बसत असे. तासचे तास हे काम चालायचे. तेदेखील खूप सिस्टेमेटिक अगदी एकाखाली एक. मी कधी कधी सांगायचे तू काम करतेस तर कर. मी थोडं लिहिते. ते पण चार वेळा चेक करणार बरोबर लिहिलं आहे ना. पुढे त्या जप लिहिलेल्या वह्या कोणत्याशा आश्रमात देत असे. वास्तविक हे ऐच्छिक काम, त्यात इतकं व्यवस्थित कशाला करायला हवं असं माझं मत. पण तिच्या कामाचं एक स्टॅन्डर्ड होतं . त्याहून कमी प्रतीचं काम तिला चालायचंच नाही.
एका भजनी मंडळात दर गुरुवारी जात असे आणि एक छान ग्रुप पण होता मैत्रिणींचा. भागवत, दासबोध वाचीत. कधी एकत्र भजन, कधी आवळीभोजन, कधी तुळशीचं लग्नं, कधी महालक्ष्मी उत्सव आणि जागरणं. आमच्यापेक्षा अधिक उत्साही आहे ती असं वाटायचं . त्यातल्या एकेक गळायला लागल्यावर किती वाईट वाटले होते तिला. कोणी घर शिफ़्ट केले, मुलुंडमधून दुसरीकडे गेल्या, कोणी स्वत:चे घर बंद करुन मुलांकडे रहायला गेल्या. मामाने देखील मुलुंडमधून भांडुपला रहायला जायचा निर्णय घेतला तेव्हा मात्र तिचाही नाईलाज झाला. हळूहळू दिसणं आणि ऐकू येणं दोन्ही गोष्टीत अडचणी येऊ लागल्या. अगदी ८० वर्षाची होती तिथपर्यंत एकटी फ़िरणारी आजी हळूहळू फ़क्त अंगणात, मग घरातल्या घरात फ़िरायला लागली. मुंबईत आत्मविश्वासाने एकटं फ़िरणार्या माणसाला असं परावलंबित्व सहन करणं अवघड! आम्ही नातवंडं जवळ होतो तोपर्यंत ती येता जाता करायला काही तरी काम सांगायची.
आजही मी मान्य करेन की तिच्याएवढं डिटेलिंग आणि परफ़ेक्शन आम्हाला जमणे नाही आणि नवे शिकण्याचा उत्साह, प्रयोगशीलता देखील. फ़ारसं शालेय शिक्षण नसताना हे गुण तिने कुठून मिळवले कुणास ठाऊक? तिचा काळ पहाता विधवांना समाजात खूप मान होता असंही नाही. पण संघर्ष करण्याची तयारी, वेळ आली तर तिखट जिभेने अरेला कारे करत स्वत:च्या चार मुलांना उत्तम प्रकारे वाढवलं तिने. नात्यागोत्याच्या मुलीबाळींचं पण केलं. भावंडांची मुलं आपल्याकडे ठेवून देखील घेतली. खरच अशा कर्तुत्ववान बायका नवऱ्यामागे किती कौशल्याने संसार करीत असत . यांना कुठलेही पद्मश्री , पद्मविभूषण दिले तरी कमीच आहे .
तिच्या आठवणी कायम सोबत रहातील, ती सोबत नसली तरी! © श्रेया श्रीधर महाजन.

No comments:
Post a Comment