Sunday, 17 September 2023

माय लिटल स्नो फ़्लेक....

 मला हल्लीच कोणीतरी विचारलं- “तनुजा, तू इतका टी.व्ही. कधीपासून पहायला लागलीस?” मी पण विचारच करायला लागले. मला वाटतं मराठी पुस्तकं वाचायला मिळेनाशी झाली तेव्हापासून ऑनलाईन वाचन आणि काही चांगले टी. व्ही. शो पहाणं सुरु झालं. चित्रपट पहाणं मात्र बाहेर जेव्हा खंडीभर स्नो-फ़ॉल होई तेव्हा सगळ्यांना जबरदस्ती घरात बसावं लागे. त्याचवेळी आमच्या घरी देव आनंदच्या कृष्ण-धवल चित्रपटांचं कलेक्शन आलं होतं. मग आठवणीने अशावेळी चित्रपट पाहिले जात. मधेमधे कुठे किती स्नो-फ़ॉल झाला हे टी.व्ही. पर पहायचं असा शिरस्ता होता. दरवर्षी अगदी पुरे पुरे म्हणेपर्यंत स्नो-फ़ॉल झाला तरी पुढच्या वर्षी लोक पुन्हा त्याची वाट पहातातच. मग फ़ेसबुक, ट्विटर, पिकासा, फ़ोटोबकेट सगळ्या फ़ोटो शेअरिंग आणि सोशल साईटस हिमवर्षावाच्या आणि हिमवादळाच्या छायाचित्रांनी ओसंडून वाहू लागतात. आमच्या गावी किती इंच स्नो झाला याची रसभरीत वर्णनं ऐकू येतात, वाचायला मिळतात. इतकंच नाही तर इंग्रजी भाषेत एखाद्या छोट्या गोड मुलीला वा मुलाला उद्देशून  ’माय लिटल स्नो फ़्लेक’ असं नेहमी म्हटलं जातं. अगदी माझ्या सोन्या तो किंवा माझी राणी ती ..यासारखं! मला पूर्वी आश्चर्य वाटायचं, त्या एव्ह्ढ्याश्या हिमकणाचं येवढं काय महत्त्व?

काही दिवसापूर्वी एक लहान मुलांचं पुस्तक वाचनात आलं . त्याचं नाव होतं ’स्नो फ़्लेक बेन्टली’..एका १३ -१४ वर्षांच्या मुलाने कुतुहलाने हिमकणांचे फ़ोटो काढले आणि या गोष्टीचा शोध लावला की प्रत्येक हिमकण हा अत्यंत सुंदर असतो. मात्र त्याची रचना अद्वितीय असते. किंबहुना कोणताही एक हिमकण हा दुसऱ्या  हिमकणासारखा नसतोच. प्रत्येक मूल हे देखील अद्वितीय असतं. ती वैशिष्ट्यपूर्ण रचना दुसऱ्या  मुलात नसेल, त्याचं आणखी काही वेगळेपण असेल. हा निसर्गाचा चमत्कार आहे.


बेन्टली मुळात अमेरिकेत  वर्मोंट मध्ये रहाणारा. (जन्म ९फेब्रुवारी१८६५) भारतात जसा पाऊस आणि चिखल यात कोणाला आश्चर्य वाटत नाही, तसेच या भागात हिमवर्षावाचे कौतुक नाही. ह्या भागात रहाणाऱ्या  या छोट्या  मुलाने काळ्या मखमलीवर हिमकण ठेवून सुरुवातीला हिमकण सूक्ष्म दर्शकाने पाहिले आणि त्यातील वैविध्य जाणवून त्यांची चित्रे काढली. मग कॅमेरा सूक्ष्मदर्शकाला लावून त्याचे फ़ोटो काढले आणि ते देखील १८८५ साली जेव्हा कॅमेरे आता इतके अद्ययावत नव्हते. आपल्या या कलाकृतींची ५००० च्या वर फोटोंची प्रदर्शने भरवली. आणि कोणताही एक हिमकण दुसऱ्या  हिमकणासारखा नसतो, शब्दश:  अद्वितीय असतो याचा शोध लावला. © श्रेया श्रीधर महाजन . १३ फेब्रुवारी २०१३ 

Some wow facts 📝 
1 Wilson Bentley
 was born on February 9, 1865 in the town of Jericho, Vermont.
2. Photomicrography
On January 15, 188 He became the first person to photograph a single snow crystal.  He would go on to photograph well over 5000 snow crystals (never finding two the same), and his documentation of this work advanced the study of meteorology in his time
Because of his wonderful work with snow crystals, he became affectionately known as “Snowflake” Bentley. 
3.The snowflakes were too complex to record before they melted, so he attached a bellows camera to a compound microscope and, after much experimentation, photographed his first snowflake on January 15, 1885.
4.Bentley described snowflakes as "tiny miracles of beauty" and snow crystals as "ice flowers."
 5. Bentley also photographed all forms of ice and natural water formations including clouds and fog. He was the first American to record raindrop sizes, and was one of the first cloud physicists.


Saturday, 9 September 2023

प्रथम तुज पाहता




'प्रथम तुज पाहता , जीव वेडावला'.....मंत्रमुग्ध करून टाकणारा रामदास कामतांचा स्वर, गदिमांचे शब्द! हे गाणं ऐकणं हा एक दिव्य अनुभव असतो. या गाण्याचं विशेषतः या पहिल्या ओळीचं स्मरण झालं, सॅनफ्रान्सिस्कोला फिरताना प्रथम कृष्णकमळाचा वेल आणि फुलं दिसली तेव्हा. 'गोल्डन गेट ब्रिज'जवळ एका ठिकाणी ही फुलं दिसली आणि एकदम ओळखीची खूण पटल्यासारखं वाटलं. फक्त ती इतक्या अडनिड्या ठिकाणी होती की फोटो काढायला धावले नाही. एकतर हिने काढलेल्या फोटोत माणसे सोडून सगळं असतं अशी चेष्टा मित्रमंडळीत होत असते. त्यामुळे त्या टेकाडावर चढण्याचा मोह आवरावा लागला.
कुतुहल काही गप्प बसू देई ना! घरी आल्यावर गुगलून पाहिलं. हम् ! ही कृष्ण्कमळाची एक वेगळी जात आहे. हिला 'ब्ल्यु पॅशन फ्लॉवर' असं म्हणतात.
मग एके दिवशी सनिव्हेलमधे फिरत असताना एका घराच्या बाहेर परत या फुलानी दर्शन दिलं. आता हार नाही... कॅमेरा घेऊन सज्ज झाले आणि मनसोक्त फोटो काढले. घराचा अमेरिकन मालक बाहेर आला. मला वाटलं आता 'सॉरी' म्हणून पळ काढावा लागणार बहुतेक. तो मात्र भलत्याच कुतुहलाने विचारायला लागला,"का बाई फोटो काढतेस?" मग म्हणाला," थोडा प्रयत्न कर, बघ तुझे नशीब असेल तर! यावर खूप भुंगे येतात, हमिंगबर्डस येतात, कोशातून रस पीत असतात. छान फोटो मिळेल." आणि खरंच मिळाला सुद्धा!
फोटो अपलोड करत असताना अगदी सहज आठवली ती 'ऊर्वशी'....चिरयौवना, रूपगर्विता, ऊरुजन्मा.... अप्सरा! अरुणा ढेरे यानी आपल्या 'ऊर्वशी' या लघु कादंबरीत एक सुंदर प्रसंग वर्णिला आहे.त्याचे स्मरण झाले. ' रसेश्वर' नावाचा गंधर्व उत्तम मृदुंगवादन करणारा ! त्याने ऊर्वशीची कामना केली, तिच्याजवळ व्यक्त देखील केली. ऊर्वशीला हवंहवंसं होतं रांगडं पौरुष! त्या नाजूक गंधर्वाला तिने नाही तर म्ह्टलं नाही पण केवळ एक कटाक्ष फेकला. आणि फेकलं तिच्या हातातलं कृष्णकमळीचं फूल, केवळ सख्य दर्शवणारं आणि त्यापुढचं काहीही नाकारणारं!
त्यानंतर त्यानं मृदुंग वाजवला, तिने अफाट नृत्य केलं. त्यानं वाजवलं ते कृष्णकमळाचं फूल...!" हा अरुणाताईंच्या स्वतःच्या प्रतिभेतून आलेला प्रसंग असेल तरीही इथे ते फूल जणू एक पात्र बनून येतं.

निळसर जांभळट रंगाची सहस्त्रदलं , त्यात मधे हिरव्या रंगाचा कोश आणि पिवळ्या रंगाची दले वा पराग, आणि अगदी मध्यभागी श्यामल वर्णीय एक पराग त्याला पुढे तीन फाटे फुटलेले. आपल्याकडे दिसतं ते कृष्णकमळ अशा स्वरूपाचं ! भगवंताने अगदी विशेष लक्ष देऊन या फुलाचं नक्षीकाम केलं असावं असं वाटतं. आपल्याकडे या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे महाभारतातील कौरव -पांडव आणि मध्यभागी कृष्णश्यामल असे त्या माधवाचे रूप असावे अशी कल्पना केली जाते.
थोडं शोधल्यावर कळलं, या फुलाच्या अनेक जाती आहेत. या फुलाला 'पॅशन फ्लॉवर' असं म्हणतात. याची फुलं , पानं आणि फळं औषधी असतात. निद्रानाश, वैफल्य अशा काही आजारांवर याच्या वाळल्या पानांचा काढा हा उपाय आहे.
मात्र यातल्या 'पॅशन' या शब्दावर मी पुन्हा पुन्हा अडखळत होते. मग कळलं ...यातील पॅशन म्हणजे दु:ख. अगदी अचूक शब्दात सांगायचं तर येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यापूर्वीच्या काही तासात त्याने सोसलेले 'अधिभौतिक', 'अधिदैविक' आणि 'आध्यात्मिक' ताप! यातील प्रतिकात्मता उलगडून पाहायचा प्रयत्न केला, या तत्त्वज्ञानाची फारशी बैठक नसल्याने समजणे कठीणच होते. या कमळाची सहस्त्रदळे म्हणजे ख्रिस्ताचा काटेरी मुकुट, वर आणि खाली असणारी पाच पाच दळे मिळून त्याचे दहा शिष्य आणि पराग़, जो तीन भागात विभागलेला असतो, तो म्हणजे त्याला ठोकलेले तीन खिळे असे हे प्रतीक!
वेगवेगळ्या धर्मातील पुराकथा वेगळ्या! पण याच्या रूपसौंदर्याने वेड लागते हे खरे! © श्रेया श्रीधर महाजन . १० सप्टेंबर २०१० 

Tuesday, 5 September 2023

अंतरीचा गंध माझ्या

 

या चेहरापुस्तकावरून (फेसबुक ) कित्येक वर्षानी मित्र - मैत्रिणी भेटणे , आपला लहानपणापासूनचा मित्र इथे अमेरिकेत हाकेच्या अंतरावर राहतो हे  कळल्यावर अतिशय आनंद होणे ही अनुभव सगळ्यांना  येतात. परंतु आपले आवडते शिक्षक अनपेक्षितपणे भेटतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटते . आम्हा विद्यार्थ्याना शोधण्यासाठी आंतरजालावर त्यांचा अमूल्य वेळ खर्च करतात हे लक्षात येते तेव्हा मानतात विचार येतो,’खरंच इतकं भरभरून प्रेम गुरुकडून मिळावं इतकी पात्रता आहे का आपली ? एखाद वर्षापूर्वी आमच्या आवडत्या नाईकबाई मला अशाच फेसबुकवर भेटल्या मला आवाज तरी ऐकायला मिळावा म्हणून फोन केला . तर प्रथम वाक्यच हे  होतं ‘तुम्ही मुली बी एड करता , मग निघून जाता कुठे तरी नोकरीला. मागे काही अडकलं आहे कुठे बंध निर्माण झालेत आठवतही नाही का गं ? आजच तुझी आठवण आली . तू दिलेलं अष्टगंध देवाला लावायला काढलं . बाई काय सांगू ? मी सुद्धा त्या आठवणीत रमले . बी एड चा कोर्स उणापुरा न्यू महिन्याचा असतो . हा कोर्स म्हणजे पुनर्जन्मच असतो विद्यार्थ्यांचा ! शिक्षण प्रशिक्षक खूप प्रेमळ आधार देतात . आत्मविश्वास निर्माण करतात . ज्ञान आणि ज्ञानाचे संक्रमण यातला सेतू कसा बांधायचा याचं तंत्र शिकवतात . तेव्हाच तर साठ  विद्यार्थ्यांसमोर उभं राहायची हिम्मत येते . त्यांना कृतार्थ होऊन काय भेट देणार ? मला प्रश्नच पडला होता बाईना भेटायला जाताना. माझ्या आईने चुटकीसरशी हा प्रश्न सोडवला . त्या  अष्टगंधाचा आणि आठवणींचा सुगंध आज इतक्या वर्षानीही मनात रेंगळतोय .. पुन्हा लहान व्हावंसं वाटतंय .. ते हि नो दिवसा गता: |
 © श्रेया श्रीधर महाजन, कॅलिफोर्निया . पूर्वप्रसिद्धी दिव्य मराठी १८ ऑक्टोबर २०११ 


Monday, 4 September 2023

शिक्षक दिन शुभेच्छा


 श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रान्तिरन्यस्य विशेषयुक्ता ।

यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव ॥ 

काही लोक ज्ञान ग्रहण करण्यात तर काही ज्ञानाचे संक्रमण करण्यात तरबेज असतात. या दोन्ही गोष्टी करण्यात जे पारंगत त्यांना उत्कृष्ट शिक्षक मानावे. कालिदासाच्या या उद्गारांना स्मरून माझ्या गुरुजनांना आणि शिक्षकी पेशातील मित्र मैत्रिणींना 'शिक्षक दिनानिमित्त' शुभेच्छा! ©श्रेया श्रीधर महाजन ५ सप्टेंबर २०१२

 

 


Friday, 1 September 2023

मदनमोहन अष्टकम -२

मदनमोहन अष्टकम् | - १ येथे वाचा 



कृष्णाचे रूप, गुण वर्णन करताना स्तोत्रकर्ता मोठी रोचक विशेषणे वापरतो .
त्यापैकी ‘मदनमोहन’ हे महत्त्वाचे विशेषण आहे . कृष्णाला ‘मदनमोहन’ असे का म्हटले जाते याची दोन कारणे सापडली . एक म्हणजे साक्षात  मदनाला (कामदेवाला )देखील मोहित करू शकेल असा मोहक , ज्याचे तेज एकाच वेळी १०० सूर्य तळपत असावे असे आहे . दुसरे कारण असे की,  जेव्हा कृष्ण आपल्या हृदयात विराजमान असतो तेव्हा  वासनात्मक विचार आपोआप पराजित होतात . कृष्णाची भक्ती कामना, वासना यापासून आपल्याला मुक्त करून मोक्षाकडे नेणारी ठरते .. 


मदनमोहन या देवतेच्या उत्पतीविषयी असे सांगितले जाते की कृष्णाचा प्रपौत्र (पणतू )  वज्रनाभ याने तीन मूर्ती तयार करून घेतल्या . या तीनही मूर्ती कृष्णाच्या होत्या . त्याने प्रत्यक्ष कृष्णदर्शन घेतले नव्हते . त्यामुळे परीक्षित माता उत्तरा हिने केलेल्या वर्णनानुसार (काही ठिकाणी उषा म्हणजे वज्रनाभाची आई हिने केलेल्या वर्णनानुसार ) या मूर्ती तयार केल्या गेल्या असे उल्लेख सापडतात . तीन मूर्ती तयार करून तर घेतल्या  पण एकही अचूक नव्हती .  श्री गोविंद मूर्तीचे मुखारविंद मिळते जुळते होते तर श्री  मदनमोहन मूर्तीचे नाभीपासून चरणकमल आणि श्री गोपीनाथ मूर्तीचे धड म्हणजे गळ्यापासून नाभीपर्यंत भाग मिळता  जुळता होता. 


चैतन्य चारितामृत( आदिलीला) या ग्रंथात सांगितले आहे की कृष्णभक्तीच्या   तीन पायऱ्या  आहेत . संबंध , अभिधेय आणि प्रयोजन .  मदनमोहन , गोविंद आणि गोपीनाथ या तीन देवतांची काही वैशिष्ट्ये आहेत. मदनमोहन या देवतेची भक्ती करीत असताना ईश्वरी तत्त्वाशी जोडलेली आणि आता विस्मृतीत गेलेली आपली नाळ पुन्हा जुळविणे घडते . अर्थात संबंध पुन : नवे  होतात . सांप्रत काळात ईश्वरी तत्त्वाशी आपले नाते जणू विस्मृतीत गेले आहे . या बाबतीत पूर्ण अज्ञान आहे. त्यामुळे त्या ईश्वरी तत्त्वाला शरण जाणे हिताचे आहे .  भक्तिमार्गाचे अनुसरण करीत असताना सुरुवातीला श्री मदनमोहन रूपाचे चिंतन , भजन पूजन करावे . तो आपल्याला आकर्षित करेल आणि ऐहिक सुखांकडचा आपला ओढा थोडा कमी होईल . त्यानंतर गोविंद आणि गोपीनाथ किंवा गोपीजन वल्लभ या रुपाची भक्ती करावी .  पद्म पुराणात सांगितले आहे की तीनही देवतांचे एका दिवसात दर्शन घ्यावे त्याने कृष्ण दर्शनाचे पूर्ण पुण्य लाभते . 


आता श्री गोविंद आणि गोपीनाथ मूर्ती जयपूर येथे आहेत आणि श्री  मदनमोहन मूर्ती करोली, राजस्थान  येथे आहे .


थोडे शोधल्यावर या दोन्ही मंदिरांविषयी माहिती मिळाली  ती अशी -


श्री राधा मदन मोहन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश येथे आहे . या प्राचीन मंदिरात मदन मोहन कृष्णाची मूर्ती  ललिता गोपी आणि  राधा यांच्यासमवेत आहे .  हे मंदिर  यमुना नदीवर असून नागर स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे.  कालिया घाटावर ५० फुट उंचीवर बांधलेले आहे  . ‘गोस्वामी तीर्थस्थान’ या नावाने हे ठिकाण ओळखले जाते  . राधा मदनमोहन मंदिर  ५००० वर्षे जुने आहे . कृष्णाचा पणतू ‘वज्रनाभ’ याने ते बांधले . काळाच्या ओघात मूर्ती गहाळ झाल्या . कालांतराने ‘अद्वैत आचार्य’ याना त्या मूर्ती एका  जुन्या वटवृक्षाखाली वृंदावन येथे सापडल्या . आपला शिष्य पुरुषोत्तम चौबे याला त्यानी त्या सांभाळण्यास सांगितल्या. पुढे त्याने त्या सनातन गोस्वामी यांना दिल्या .

असे म्हणतात की इसवीसन  १५८० मध्ये मुलतानी व्यापारी कपूर रामदास याने सनातन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हे  मंदिर पुन्हा बांधले . इसवीसन १६७० मध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांनी मथुरा आणि वृंदावन यावर  स्वारी  केल्यामुळे मूळ  मूर्ती गुप्तपणे राजे जयसिंग यांनी रातोरात जयपूरला नेली . राजा  गोपाल सिंह यांनी करौली राजस्थान येथे ही मूर्ती नेली  . वृंदावन येथील  मंदिरात आता मूर्तीची प्रतिकृती आहे तर मूळ मूर्ती करौली राजस्थान येथे आहे .



दुसरे  मदन मोहन मंदिर करौली , जयपूर
येथे आहे जे आपल्या सांस्कृतिक वारश्याचे अभिन्न अंग आहे . यांचे खास ऐतिहासिक महत्त्व आहे . भगवान श्रीकृष्ण मंदिर राजस्थानची  राजधानी जयपूर पासून १८२ किलो मीटर दक्षिण पूर्व करोली जिल्हा येथे आहे . असे म्हणतात की करोली येथील मदन मोहन मंदिरात असलेली प्रतिमा वृंदावन मधील कालीदहच्या जवळ द्वादशादित्य टेकडीजवळ मिळाली . औरंगजेब आक्रमण प्रसंगी मूळ मंदिर शिखर पूर्ण नष्ट करण्यात आले त्यावेळी मुगल आक्रमणापासून मूर्ती वाचाव्यात म्हणून सुरक्षा दृष्टीने मूर्ती जयपूर येथे आणल्या गेल्या . 


दोन्ही मंदिरांबाबत ऐतिहासिक माहिती वाचल्यावर  भाष्य टाळावे असे म्हटले तरीही ही वस्तुस्थिती गप्प बसू देत नाही . मुघलांच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी आणि आपल्या देवतांची विटंबना होऊ नये म्हणून वेळोवेळी मूर्ती हलविल्या गेल्या कधी पाण्यात, कधी तळघरात ठेवल्या गेल्या हा इतिहास लपणारा नाही . 


कितीही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी पुनरुज्जीवित होते अशी आपली हिंदू संस्कृती आहे.  हिंदू जनाना तो कृष्ण प्रिय इतका प्रिय आहे की. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' असा मंत्र जपताना माणूस स्वतः ला विसरतो. 'जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम' ज्याच्या जोरावर विकत घेतला श्याम असे म्हणावेसे वाटते. ‘केनु संग खेलू होली, पिया त्यज गये है अकेली’ अशी मीराबाईची  विराणी ऐकू येते. तर कधी 'सर्वदेवनामस्कारो केशवं प्रति गच्छति' असे सुभाषित वाचनात येते .

आणि शंकरचार्यांचा हा विचार पूर्णत: पटतो,  संसार पार करण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही .

  भजगोविन्दं भजगोविन्दं, गोविन्दं भजमूढमते।

 नामस्मरणादन्यमुपायं, नहि पश्यामो भवतरणे॥ 

© श्रेया श्रीधर महाजन 29 Aug 2023




श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...