Thursday, 31 August 2023

मदनमोहन अष्टकम् | - १



कृष्ण चालले वैकुंठाला 
राधा विनवी पकडून बाही|| 
इथे तमाखू खाऊन घे रे| 
तिथे कन्हैया तमाखू नाही|| 


पु लं  च्या पानवालाचा हा शेवट माहीत नाही असा मराठी वाचक विरळा. आपल्या संस्कृतीत कन्हैया, कृष्ण इतका जवळचा वाटतो  की आपल्यासारखाच  तो देखील असावा असं माणसाला वाटतं .किंबहुना त्याने वारंवार अवतार घ्यावा नि सोबत असलेल्या भक्तांच्या मेळयाचा आनंद लुटावा. जनमानसाने मनापासून आणि  प्रेमाने स्वीकारलेला मला वाटते दुसरा कुठलाच  देव नाही . 

त्याचं बाल्य , कौमार्य , प्रौढत्व, अवतारकार्य  आपल्याला अनेक सण, उत्सव प्रसंगी पुन्हा पुन्हा स्मरत असतं . आपलं मूल जन्माला आलं की भारतीय स्त्रीला तो बाळकृष्णच  वाटतो , त्याच्या बाललीलांमध्ये ती हरवून जाते. अगदी बारशाला सुद्धा नाव ठेवायच्या आधी गोपा फिरवताना ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या’ म्हणतात. कधी स्त्री त्याला भावाच्या रूपात पूजते, कधी सखा म्हणून स्मरते, कधी राधा कृष्ण यांच्यातल्या भक्तीभावनेचा  आदर करते . ‘मोक्षदा एकादशी’सारख्या दिवशी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण पूजनीय ठरतो . त्याची नानाविध रूपे आपल्या आयुष्याला व्यापून राहिली आहेत .


मराठी साहित्य असो वा संस्कृत, हिन्दी ! कृष्ण अवतार  नाटककार, लेखक. कवी यांना नेहेमीच भुरळ घालत आलेला आहे. त्याचं निळं- सावळं रूप , मुरली , मोरपीस आणि अवघ्या चराचराला व्यापून दशांगुळे उरलेले व्यक्तिमत्त्व  ! वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कृष्ण हा ‘सखा’ वाटतो . कृष्णाचं असंच विलोभनीय वर्णन एका  सुंदर प्रासादिक स्तोत्रात सापडतं . 



‘श्री  मदनमोहन अष्टकम् ‘ असे त्याचे नाव आहे. अष्टक म्हणजे आठ श्लोक असलेले स्तोत्र . यात विष्णूच्या कृष्ण अवताराचे  स्वरूप वर्णन, गुण वर्णन आणि अवतार कार्याचा उल्लेख आहे . स्तोत्र कोणी रचले हे मात्र खूप शोधून देखील सापडले नाही . स्तोत्राचे माधुर्य पाहता  जगाला ‘पुष्टिमार्ग’ शिकवणाऱ्या   ‘वल्लभाचार्य’ यांच्या ‘मधुराष्टकाची’ आठवण येते. ऐकताना त्या शब्दांची भुरळ पडते आणि अर्थ मनात ध्वनित झाला की त्या कृष्णाच्या चिंतनात आपण हरवून जातो . 


स्तोत्रकर्ता त्याच्या इष्ट देवतेचे वर्णन करताना जणू भक्तीरसात रंगून गेला आहे . या मदनमोहन कृष्णाने  शंख आणि गदा धारण केली आहे , शरीर निळे सावळे आहे.  त्यावर  पिवळे वस्त्र धारण केले आहे. क्षणभर मनात विचार आला. विरोधी रंगसंगती नेहमीच आकर्षक दिसते असे चित्रकलेच्या तासाला शिकत आलो. हे तर त्याचे प्रत्यक्षदर्शन आहे, किती मोहक असेल ते! त्याने भाळी   चंदनविलेपन केले  आहे, कानात कुंडल आणि गळ्यात कौस्तुभ मणी धारण केला आहे.   कमळ फुलासारखे सुंदर नेत्र असलेल्या या रूपाने  ‘मार’ म्हणजे मदनाला देखील मोहित केले आहे . 


 त्याच्या वेणु/ बासरीचा मोह विश्वाला पडतो,  त्याची रासक्रीडा, त्याचा खट्याळ स्वभाव याने तो माणसाला आपल्या खूप जवळचा वाटतो .


 इतकेच नाही तर तो एक धैर्यशाली नेता आहे  , अद्भुत, सुंदर आहे  , देव देखील ज्याची सेवा करतात , साऱ्या  विश्वास त्याचा  मोह पडतो , तो मन आकर्षित करून घेतो , विश्वाच्या स्थितीला कारणीभूत ठरतो , भक्तांना  उदार आश्रय देणारा, नेहेमीच सुखनिधान , परमबंधू  , दुर्जन लोकांना शासन करणारा ,  कालियामर्दन करणारा,  गरीबांवर दया करणारा, चैतन्यपूर्ण  , माधव , धर्मपरायण , राक्षसांचा  संहार करणारा, पाप दूर करणारा, वेद विद्या जाणणाऱ्या लोकांत देखील श्रेष्ठ , गोपवधूू्ंना  प्रिय , वृंदावन धन , सत्य सनातन , दुष्टांचा  नाश करणारा, सज्जन लोकांचे अनुरंजन करणारा आहे .


त्याच्या भक्तांबद्दल त्याला अतिशय प्रेम आहे जणू करुणेचा सागरच ! भक्तांनी ज्या गोष्टीची कामना केली ते सारे काही तो त्यांना देतो . त्याच्या अस्तित्वामुळे धरणी पवित्र झाली आहे. असा हा परमोच्च देव सत्त्व गुणांची खाण  आहे. गोकुळाचे भूषण , कंसवध  करणारा , योग परायण आहे . त्याने भक्तांना इतके मुक्त हस्ते दिले आहे तर त्याच्याकडून ऐहिक लाभाची अपेक्षा का करावी ? त्यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो या दैनंदिन जगाच्या रहाटगाडग्यातून माझी  सुटका कर आणि नित्य  निरंजन अशा ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान मला होवो . ते मोक्षपद प्राप्त होवो . प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘देहि पदम्’ अशी आळवणी केली आहे. प्रासादिक, मधुर भाषेबरोबर आर्त भाव देखील मनाला जाणवतो . © श्रेया श्रीधर महाजन 29 Aug 2023


मूळ स्तोत्र येथे वाचू शकता

स्तोत्र -१ 







                                                                                                                                                        









 

No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...