सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे||
केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा||
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी
जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
कधी हासऱ्या, कधी लाजऱ्या, आल्या श्रावणसरी.
-शांता शेळके
द्यावा पृथिवी म्हणजे स्वर्ग आणि धरती हे दैवी जोडपे अगदी ऋग्वेद काळापासून रूढ आहे. हा द्युलोक आपले प्रेम पर्जन्याच्या रूपाने पृथ्वीवर धाडतो . पृथ्वी न्हाऊन प्रसन्न होते आणि तिच्या गर्भातून बीज अंकुरते. एखादा बैल हंबारव करीत यावा तसा आवाज करत पर्जन्य आपल्या आगमनाची वार्ता कळवतो. आणि आपली पखाल या पृथ्वीवर रिती करतो. हे वर्णन ऋग्वेदातील पर्जन्य सूक्तात येते. हा सृजनाचा उत्सव असतो. निसर्गात आढळणारा. पहिल्या ओळीत शांताबाई याच नैसर्गिक आविष्काराविषयी सांगत आहेत . या प्रसव वेदनांतून निर्माण होणारी आहे ती अक्षर अशी आशा.
न क्षरति क्षीयते इति अक्षरम् ! अशी अक्षर शब्दाची व्युत्पत्ती यास्काचार्यांनी दिली आहे. जे कधीच कमी होत नाही , नष्ट होत नाही चिरंतन आहे ते अक्षर. निसर्ग असाच अव्याहतपणे उत्पत्ती, स्थिती, लय या तीन अवस्थांतून जात असतो. जे निसर्गाच तेच माणसाचं.
आशा नाम मनुष्याणां काचित आश्चर्य शृंखला|
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तस्तिष्ठांति पंगुवत ||
सनातन असा हा आशेचा बंध आहे. जिने बांधलेला नेहमी धावत असतो आणि तिच्यापासून मुक्त असणारा एखाद्या पांगळ्याप्रमाणे स्थिर असतो.
श्रावणातील हसरी नाचरी सर आणि त्यातून जन्मणारी हिरवळ अन्नधान्याला जन्म देणारी, सजीवांचे भरण पोषण करणारी आहे. सृजनाच्या आशा पल्लवित करणारी आहे.
मनामनाचा गुंता आदिम काळापासून चालत आलेला आहे. तितकेच चिरंतन आहे सृष्टीचे सजणे. अळवाच्या पानावर पडलेला नाजूक थेंब मोत्यासारखा दिसतो. त्याचं असणं अगदी काही क्षणापुरतं. पण ते छोटं आयुष्य तो दिमाखात जगतो, उन्हात चमकतो. श्रावणाच्या सरी न्हाऊन माखून ओलेत्या होऊन येतात. त्यामुळे मनाला अधिक भिडतात. असाच ऊन पावसाचा खेळ माणसाच्या मनात चालू असतो. एखाद्या रहाट गाडग्याप्रमाणे सुख दुःख येत रहातात. चक्रारपङ्क्तिरिव गच्छति भाग्यपङ्क्ति:||
या वाटेवर कधी कोण भेटेल कुणास ठाऊक. पण आपल्या मनातला श्रावण , उत्सवी श्रावण अगदी कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर हसरा, नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. © श्रेया महाजन
श्रेया
उत्तमोत्तम साहित्याची ओळख , शिक्षण क्षेत्रातील प्रयोग आणि बरेच काही
Friday, 25 July 2025
श्रावणसरी
Wednesday, 16 July 2025
वेगवेगळी फुले उमलली
हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं ऐकलं की मन अजूनही हळुवार होतं. एकमेकांच्या अंगावर फुलांचे झेले उधळण्याचे दिवस सरल्याचा हळवा सूर लागतो.पण कधीतरी ते फुलपंखी दिवस उमललेच असतील ना? त्या दिवसांची जेव्हा केव्हा कल्पना मी करते तेव्हा तेव्हा वाटते,तो मधुमास (चैत्र) असावा, वसन्ताचे आगमन नुकतेच झाले असावे. मनसिज असा कामदेव , तो तर वसंतऋतूचा मित्रच...........मोगऱ्याचा धुंद करणारा गंध असेल, तो आणि ती हरवून गेले असतील एकमेकात.!
मोगरा , आम्रमंजिरीचा गंध, गुढीपाडवा अशा अनेक गोष्टी वसंताच्या संदर्भात आठवतात..अगदी लहानपणी 'आला वसंत दारी' म्हणून एवढे काय खूष व्हायचे?" असे वाटायचे. कारण गुढीपाडव्याच्या आगे मागे तोंडी परीक्षा असायच्या. मग लेखी परीक्षा .! फक्त गच्चीवर किंवा गॅलरीत बसून अभ्यास करताना कोकिळांचे कूजन ऐकू यायचे, अंतर्मनाला सुखावून जायचे! कैरीचा छुन्दा , साखरंबा आणि पन्हे व्हायचे. उन्हाळा शीतल व्हायचा. आरोग्य संपदा मधे'आला उन्हाळा तब्बेत सांभाळा' असा कार्यक्रम आला की उन्हाळा हे काही तरी तब्बेत सांभाळण्याजोगं भारी प्रकरण आहे अस वाटायचं.
थोडे मोठे झाल्यावर होळी,पाडवा आणि बोर्डाच्या परीक्षा, पेपर तपासणे याची पक्की गाठ बसली, ती काही केल्या सुटता सुटेना.
अमेरिकेत आल्यावर या स्प्रिंग सीज़न चे महत्त्व पटायला लागले. बर्फाचे पांढरेशुभ्र डोंगर सुरुवातीला फारच कौतुकाचे होते. आकाशात बसून कुणीतरी मोदकाची पिठी चाळावी तसा बर्फ भुरभुरत असे. माझ्या वाढदिवसाला पहिला स्नो फॉल पाहिला तेव्हा वाटले या परक्या देशात आहे तरीही कुणीतरी आपल्याला आभाळभर शुभेच्छा देत आहे. नंतर हे शुभेच्छा देणं रोजचच झालं ..
मग स्वच्छ ऊन कधी आहे हे पाहण्यासाठी वेदर चॅनेल पहावासा वाटायला लागला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मात्र थोडे तेज:पुंज दिवस यायला लागले. एखाद्या दिवशी तापमान चांगलं असेल तर जत्रेत असावी तशी बागेत गर्दी दिसायला लागली. खुरटलेली, सुकलेली झाडं तरारून फुलायला लागली.सृष्टी हिरवाईने नटली. गवतावर नाजूक पिवळी फुलं दिसायला लागली.नितांतसुंदर चेरी ब्लॉसम पहिला. लाल गुलाबी ट्यूलिप्स दिसायला लागले. असं ऐकिवात आहे की अमस्टरडॅमला लोक या मौसमात केवळ ट्युलिपसच्या बागा पाहायला जातात. लंडनच्या बंकिंगहॅम पॅलेस चा बगीचा देखील या काळात नयनरम्य दिसतो.
असा सालंकृत निसर्ग पाहाताना कालिदासाचे ऋतुसंहार नाही आठवले तरच आश्चर्य! ऋतुमानाचा सामान्य माणसाच्या मनावर इतका परिणाम होतो मग कामिजनांची हृदये विद्ध नाही का होणार? सृष्टीत एव्हढे नव चैतन्य आल्यावर कात टाकल्यासारखी मोठमोठी जॅकेट्स टाकून बीचवर निघाली मंडळी समुद्र्स्नान घ्यायला, जल क्रीडांचा आनंद लुटायला!
मुलांच्या सायकली निघाल्या, स्कर्टमधे मुली शोभून दियायला लागल्या, मिकी मौसचे रंगीत फ्लोट दिसायला लागले. निळे,हिरवे असे शीत रंगसंगतीचे कपडे जाउन पिवळे,लाल असे फ्लोरोसेंट कलर्स दिसायला लागले. हीटर बंद झाले आणि गाड्यांच्या काचा इतक्या महिन्यानी उघड्या करता आल्या. गरम कॉफी ऐवजी कलिंगडे ,स्ट्रॉबेरी,टरबूजे दिसायला लागली ग्रोसरी स्टोर्स मधे.वसंत गेला ,ग्रीष्म संपला ,एके दिवशी झाडावर लाल पिवळी छटा दिसायला लागली.थोडी थंडीची शिरशिरी आली. एकेक पान गळावया लागले. फॉल सुरू झाला वाटते...........उमलेली फुले गळून गेली.
फुलांचे झेले उधळण्याचे दिवस संपले! © श्रेया श्रीधर महाजन सप्टेंबर २००८
वागीश्वरी
खूप वर्षांपासून एक सुंदर सरस्वती वंदना ऐकण्यात आहे...जय शारदे वागीश्वरी!
आशा भोसल्यांचा स्वर, शांताबाई शेळक्यांचे शब्द, श्रीधर फ़डके यांचे संगीत..एक अपूर्व काव्यानुभव आहे हा!
या संस्थळाचे नाव ‘वागीश्वरी’ का? हा प्रश्न मला अनेक लोकानी विचारला. या प्रश्नाचे उत्तर या कवितेत आहे.
मी जेव्हा जेव्हा परमपूज्य प्रभु बा यांचे फ़ोटो पहाते, एक दोन वेळाच त्यांचा आवाज ऐकण्याचा योग आला,वारंवार लेखन वाचते, मला पुन्हा पुन्हा ते साक्षात सरस्वतीचे मूर्त रूप वाटते.
‘वागीश्वरी’ म्हणजे ईश्वरी वाणी, आपल्या गुरुदेवांच्या मुखातून येणारी वाणी ही ईश्वरी आहेच. दुसरा अर्थ देवी सरस्वती…विद्येची देवता ! आपलं “जाड्य” आळस दूर करणारी, आपल्याला कार्यक्षम करणारी!
या संपूर्ण कवितेतलं वर्णन आपल्या गुरु परमपूज्य बांना लागू पडतं… सरस्वती, साक्षात् ब्रह्मदेवाची कन्या, विद्या धारण करणारी देवता ! इतकेच नव्हे तर ज्योत्स्ना म्हणजे चांदण्यासारखी तुझी कांती आहे. तुझे मुख म्हणजे शारदीय चंद्रमा ! तुझ्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा उजळते ! तुझ्या कृपेचे चांदणे आमच्या शिरी नेहेमीच बरसत राहू दे!
हे देवते, तुझी चतुर , कलामय अंगुली वीणेवर फ़िरते तेव्हा नवे संगीत जन्माला येते! कल्पतरुवर मोहोर यावा त्याप्रमाणे कल्पनांना नवे नवे अंकुर फ़ुटतात! सृजनशीलता जागृत होते ! जाड्य, बुद्धिमांद्य नष्ट होते!
हे देवते, तुला सर्व विद्या, कला, संस्कृती, शास्त्रे वश आहेत. तुझ्या प्रतिभस्पर्शामुळेच रुचिर कलाकृती जन्माला येतात, तुझ्यामुळेच या विश्वातील अप्रतिम लावण्ययात्रा दृष्टोत्पत्तीस येते…!
अगदी हेच तर आपल्या गुरु आपल्यासाठी करीत आहेत. म्हणूनच जय शारदे ’वागीश्वरी ’ ! © श्रेया महाजन .
गरमागरम सूप्स....अहा....!
धो-धो पाऊस पडतोय आपण भिजून आलोय, आल्या आल्या हातात वाफ़ाळणारा सूपचा बाऊल दिलाय. त्याच्या वासानेच थंडी पळते आणि तोंडाला चव आल्यासारखे वाटते. ’सूप’ हा शब्द संस्कृतातदेखील आढळतो. याचा अर्थ वरण किंवा आमटी असा पातळ पदार्थ. आपण मात्र इंग्रजीत वापरल्या जाणार्या अर्थाने सूप हा शब्द वापरतो. पुष्कळदा ’टोमॅटो सूप’ इतकेच आपल्याला अपेक्षित असते.
परदेशात अनेक प्रकारची सूप्स कॅनमध्ये मिळतात. ती घरी
आणून गरम केली आणि साधा ब्रेड भाजून घेतला किंवा गार्लिक ब्रेड भाजून घेतला तर
थंडीपावसात रात्रीचे जेवण त्यावर भागवता येते. सुरुवातीला असे तयार कॅन आणले. मग
त्यावरील लेबल्स वाचली तर त्यात भयानक सोडियम आहे असे आढळले. मग पुस्तके आणून
वाचून घरच्या घरी प्रयोग सुरु झाले.
प्रचंड
पाऊस पडला आणि गारवा आला की करायला आणि प्यायला मस्त वाटतात असे दोन तीन प्रकार मी
इथे देते आहे. अशा वेळी कोणी पाहुणे येणार असतील तर आवर्जून सूप, जेवण, गोड पदार्थ
असे तीन टप्प्यातले जेवण आपण करु शकतो.
वास्तविक,
आपण जे टोमॅटो सूप करतो ते ’प्युरीड सूप’ म्हणजे भाज्या वाटून केलेले सूप असते.
याची थोडी वेगळी आवृत्ती म्हणून आपण टोमॅटो सोबत गाजर, बीट, कांदे, बटाटे घालून
मिक्स्ड व्हेजिटेबल सूप करतो.
परदेशात
मात्र मला ’चंकी सूप’ हा देखील प्रसिद्ध प्रकार आहे असे आढळले. म्हणजे थोडे पातळ
पाणी त्यात बटाट्याचे वगैरे तुकडे, कडधान्ये इत्यादी. चांगला प्रोटिन व्हिटॅमिन
रिच पदार्थ तयार होतो.
यातले
लसूण, मिरपूड यांचे प्रमाण आपण हवे तसे कमीजास्त करु शकतो. बेसिल नावाची एक वनस्पती
(खरे तर पुदिना/तुळस यांसारखी वाळलेली पाने) हल्ली बर्याच मॉल्स मध्ये मिळते. टोमॅटो
बेसिल हे एकत्र छान लागते. तसेच ऑरिगॅनो,रोझमेरी पण. या दोन्हींची वाळलेली पाने
थोडी हाताने चुरगळून चिमटीभर जरी कोणत्याही सूप वा पास्तामध्ये घातली तरी छान गंध येतो.
आपण
दोन्ही प्रकारच्या सूपच्या रेसिपी पाहू. आणि सोबत गार्लिक ब्रेड कसा करायचा
तेही...!
१. मिनस्ट्रोन
सूप/ मिश्र डाळी, कडधान्येआणि पास्ता यांचे सूप.
२. पम्पकिन
सूप/ भोपळ्याचे सूप
३. लेन्टिल
सूप/ मसुरांचे सूप
४. क्रुटॉन्स
५. गार्लिक
ब्रेड.
१.
मिनस्ट्रोन सूप/ मिश्र डाळी, कडधान्ये आणि पास्ता यांचे सूप
साहित्य: पाव वाटी मिश्र डाळी ( हिरवी
चणाडाळ, पिवळी चणाडाळ, मसूर डाळ, आणि चिमटीभर तांदूळ), शिजलेली कडधान्ये (राजमा, पांढरे
चवळी, आवडत असतील तर छोले ) सगळे मिळून वाटीभर,अर्धी वाटी पास्ता (शक्यतो एल्बो,
मॅक्रोनी, डिटालीनि असा बारीक पास्ता घ्यावा.), कांदा, सेलरी, गाजर, कोबी, बटाटे
सगळे पाव वाटी प्रत्येकी, आवडत असेल तर पातीचा कांदा व पात, अगदी एखादी पात व
त्याचा कांदा बारीक चिरुन, चार पाच लसणी बारीक वाटून वा चिरुन, मीठ, आपल्याला आवडत
असेल तर एखादी हिरवी मिरची चिरुन (आपल्या भारतीय आवडीसाठी ), मिरपूड, बेसिल,
ऑरिगॅनो पावडर आवडीप्रमाणे चिमटीभर, चार टोमॅटो वाटून.
कृती: प्रथम थोड्याशा बटर वर कांदा व लसूण,
मिरची घालावे. थोडे परतल्यावर , बारीक चिरलेला कोबी, सेलरी, क्युबच्या आकारातले
बटाटे व गाजर सगळे परतावे. त्यात कच्च्या डाळी घालाव्या. व टोमॅटो प्युरी आणि
पाणी, मीठ घालून शिजवावे. मग उकडलेली कडधान्ये व पास्ता घालावा. मंद आचेवर सगळे
शिजल्यावर मीठ, मिरपूड, बेसिल घालावे व आवडत असेल तर वरुन किसलेले चीज आणि ऑलिव्ह
ऑईल घालावे.
टीप: कच्च्या डाळी आवडत नसतील तर नाही
घातल्या तरी चालतात. जर पास्ता घातला नाही तर हेच सूप ’हार्टी व्हेजिटेबल सूप’ म्हणून सर्व करता
येईल. पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक वापरता येईल. नीट विचार केला तर भाजी, उसळ,
पास्ता हे वेगवेगळे तीन पदार्थ न करता एकाच वेळी घट्टसर असे सूप जेवणाऐवजी घेतले
तरी चालण्यासारखे आहे.
२
साहित्य: चार एक तास भिजलेले पण मोड न
आलेले एक वाटी मसूर, चार लसूण पाकळ्या, तीन टोमॅटोंची प्युरी, कांदा, सेलरी, गाजर
प्रत्येकी पाव वाटी.
कृती: प्रथम बटर वर लसूण, कांदा, सेलरी, गाजर परतून घ्यावे,
मग भिजलेले मसूर परतावे. त्यात टोमॅटो प्युरी, पाणी, मीठ , मिरपूड घालून मंद आचेवर
खूप वेळ शिजवावे. दाट वा पातळ हवे करावे. त्यानुसार पाणी कमी जास्त करता येईल.
साहित्य: चांगला लाल भोपळा पाव किलो चौकोनी
तुकडे करुन, एक बटाटा, चौकोनी तुकडे करुन, एक कांदा बारीक चिरलेला, दोन चमचे
फ़ेटलेली साय.
कृती: बटरवर कांदा परतावा, शिजल्यावर बटाटे
आणि भोपळा घालून , पाणी घालून चांगले शिजवावे. मग मिक्सर मधून काढावे किंवा हँड मिक्सरने
घुसळावे. मीठ हवे तर साखर घालावी. आणि पुन्हा शिजवावे. वर फ़ेटलेली साय, आवडत
असल्यास मिरपूड घालावी.
४.
क्रुटॉन्ससाधारणत: प्युरीड सूप क्रुटॉन्स सोबत
सर्व करतात. ब्रेडचे तुकडे करावे. एका
बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल वा पातळ केलेले बटर, मीठ आणि बेसिल पावडर /मिरी पावडर / चाट
मसाला / कुठे लसणीची पूड मिळाली तर ती घालावी. त्यात हे तुकडे घालून नीट मिसळावे.
मग गॅस ओव्हन मध्ये बेकिंग ट्रे वर ठेऊन कुरकुरीत करावे वा तव्यावर शेकावे. एका
हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. टोमॅटो, पालक, गाजर, भोपळा यांची सूप मिक्सरमधून वाटून
करतो त्यांच्या सोबत हे देता येतील.
५.
गार्लिक ब्रेडअनेकदा पिझा हट मध्ये गेलो की आपण पिझा
सोबत गार्लिक ब्रेड घेतो. परंतु गार्लिक ब्रेड ची खरी मजा सूप सोबत येते. शिवाय
इतके चीज घातलेला ब्रेड खाताना फ़ारच गिल्टी वाटते. त्याऐवजी घरच्या घरी अगदी तसा
नाही पण त्याच्या जवळ जाणारा गार्लिक ब्रेड करता येतो.
दोन तीन चमचे अमूल बटर, घरचे लोणी वा साजूक
तूप घ्या. ते कढईत थोडे गरम करुन पाच सहा लसणीचे बारीक काप त्यात घाला व गॅस बंद
करा. हे गार्लिक बटर करण्यासाठी थंडीत मिळणारी पातीची लसूण सगळ्यात उत्तम, पात आणि
पाकळ्या दोन्ही चिरुन घाला.
मग होल व्हीट ब्रेड, ब्राऊन ब्रेड वा साधा
ब्रेड, किंवा आपला लादी पाव घ्यावा. गार्लिक बटर लावून खरपूस भाजावा. कोणत्याही
सूप सोबत वा नुसता गरमगरम खावा.
- © श्रेया महाजन.
पूर्वप्रसिद्धी जून २०१३ या सख्यानो या इ मासिक
Tuesday, 15 July 2025
लिलीच लिली
साधारणत: वसंत ऋतू सुरु झाला ना की अमेरिकेतल्या बऱ्याचशा पब्लिक लायब्रऱ्यांमध्ये बागकामाविषयीची पुस्तकं अगदी दर्शनी भागी काढून ठेवलेली असतात. अशीच गुलाबी रंगाची आकर्षक फ़ुलं असलेलं कव्हर पाहून एक पुस्तक मी उचललं आणि स्वत:च्या नावावर घेतलं . घरी जाऊन वाचते तर काय ते एका फ़ुलांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तीचं चरित्र होतं. विषय अगदी नवा, पूर्णत: अपरिचित. मला खूप आश्चर्य वाटलं ...असाही विचार आला, “ आपल्याकडे मिळेल का हो असं गव्हाच्या संकरित जाती तयार करणाऱ्या व्यक्तीचं चरित्र?” जास्तीत जास्त ‘आमची माती आमची माणसं ’ मध्ये त्यांची मुलाखत झाली असती.
मी आधी उत्सुकतेने फ़ोटो पाहिले. चार वेळा उलटपालट
केल्यावर लक्षात आलं पूर्वी यातल्या पिवळ्या, पांढऱ्या, लाल लिलीचे फ़ोटो आपण काढलेत. पण हा जो गडद गुलाबी रंगाचा आणि पांढरी किनार असलेला फ़ोटो तो मात्र नवा आहे. या लिलीचं नाव ‘स्टारगेझर लिली’. ही संकरित जात निर्माण करणारा शास्त्रज्ञ त्याचं नाव लेस्लि वुड्रिफ़. ‘स्टारगेझर लिली हे अतिशय सुवासिक आणि देखणं फ़ूल. खरेतर बुके वा गुच्छांमध्ये विकली जाणाऱ्या फ़ुलांत गुलाबाच्या पाठोपाठचा क्रमांक या फ़ुलाचा लागतो. पूर्ण सूर्यप्रकाशात वा अर्धवट सावलीत देखील ती वाढतात . ६ ते ८ इंच इतका मोठा व्यास या फ़ुलांचा आढळतो. या फ़ुलांचं इतकं कौतुक का? तर लिलीच्या काही जाती ह्या टपोऱ्या उमलणाऱ्या, तर काही जाती फ़ुलताना जमिनीच्या दिशेने वळणाऱ्या पण अतिशय सुगंधित असतात, देखण्या असतात. हे तीनही गुणधर्म या एका संकरित जातीत आले आहेत. हे साधलं कसं त्याचे प्रयोगदेखील वर्णिले आहेत. एका परीक्षानळीच्या आत काळा रंग लावून हे वुड्रिफ़ महाशय एक फ़ू ल त्यावर आपटत. मग परीक्षानळीत गोळा झालेले परागकण दुसऱ्या फुलांच्या अंतर्भागात एका उंटाच्या के सांच्या ब्रशने लावत. या संकरणामागे केवळ एक सुं दर फ़ूल निर्माण करणे हे एकमेव ध्येय होते. त्यांनी लिलीच्या अनेक संकरित जाती निर्माण के ल्या. परंतु ओरिएंटल लिली आणि एशियाटिक लिली यांच्या संकरणाने निर्माण के लेले हे फ़ू ल मात्र जन्मत: आकाशाकडे तोड केलेले दिसले म्हणून याला ‘स्टारगेझर लिली’ असे नाव त्याने दिले.आपल्या रंग, गंध आणि सौदंर्याने जगाला भारुन टाकलेले फ़ू ल ज्याने निर्माण केले त्याला सलाम. श्रेया महाजन, ठाणे.
आला उन्हाळा तब्बेत सांभाळा
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी एक फ़ोटो तयार केला. ब्रेकफ़ास्ट टाइम नावाचा! त्यावर ताजे केलेले ब्लु बेरी मफ़िन्स, बेरीज, इतर फ़ळं, दुधाचा ग्लास, सगळे फ़ोटो एखादे कोलाज करावे तसे लावले. आणि अर्थात शोभेला फ़ुलांचे फ़ोटो पण! सवयीने खरे तर! "हा फ़ोटो छान दिसतोय पण यावर गुलाब कशाला?" इति अहो. आता खवचट प्रश्नाला खवचट उत्तर. असा विंचू काय गप्प बसतो का? मी म्हटलं,"प्रेमाचा गुलकंद घालायचाय!"
उत्तर तर दिलं....! आणि माझ्या डोळ्यांसमोर खरंच गुलकंदाची बाटली तरळली. ’आला उन्हाळा तब्बेत सांभाळा’ म्हणणार्या वसुंधरा पेंडसे नाईक आठवल्या. अगदी प्रवाळयुक्त गुलकंद, घातलेल पाणी, कैलास जीवन मधले म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे तळवे चोळणार्या आजी...! पूर्वी आमचा एक मामा नेहमी सांगायचा ...झोपताना आयोडेक्स, कैलास जीवन आणि अमृतांजन या तीन बाटल्यांमध्ये तीन बोटं बुडव आणि डोक्याला लाव, भस्माचे पट्टॆ काढल्यासारखी....सगळे रोग दूर होतील. एकूण कफ़, पित्त आणि वात या तिघांचा समतोल राखणं म्हणजे स्वस्थ असणं असं आयुर्वेद सांगतो. त्या दृष्टीने वापरली जाणारी ही औषधे जवळ जवळ आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होऊन गेली आहेत.
परदेशात जेव्हा ही औषधे अगदी हाताशी नसतात तेव्हा तर आजीबाईंचा बटवा आणि घरगुती खाद्यपदार्थांचे औषधी गुणधर्म माहीत असणं खूप कामी येतं. याच उन्हाळ्यातली ही गोष्ट आहे. अचानक गरम व्हायला लागलं आणि आमच्या लेकाचे डोळे फ़ार लाल दिसायला लागले. मला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाटकातला संवाद आठवला, "डोळ्याला आली लाली, चष्म्याला औषधं लावली." :-) मुलगा आजारी आणि मातोश्रींना विनोद सुचतायत. पुष्कळ औषधं पोटात दिली, डोळ्यात घातली, फ़रक पडेना. मग टी. व्ही. बंद, संगणक बंद. तरीही फ़रक नाही. एकदा सहज विचार केला पूर्वी आमची आजी सावरीचं पान साजूक तूप लावून तिच्या टाळूवर ठेवायची. उष्णता कमी होते म्हणे अंगातली. काशाच्या वाटीनं तूप लावून पाय चोळून द्यायचे हा पण चांगला उपाय . हा उपाय सहज जमेल असं वाटलं. ते मात्र खरंच कामी आलं, योग्य गुण आला.
स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ, मसाले यांचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत. मला आठवतंय सर्दी झाली की धने उकळून त्याचे पाणी(काढा), पित्त झाले तर धने आणि खडीसाखर रात्रभर एक ग्लासभर पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी प्यायचे. आराम मिळत असे बुवा त्याने! लहानपणी एकदा आत्याकडे गेले होते पुण्याला तर ती म्हणाली शतधौती तूप करूया घरी! एका तांब्याच्या ताम्हनात तूप घ्यायचे आणि पळी पळीने शंभर वेळा पाणी घालायचे, प्रत्येक वेळी काशाच्या वाटीने थोडे घोटायचे. हवे तर थोडा कापूर घालायचा. हे तयार मिश्रण डब्यात भरून ठेवायचे. टाचा फ़ुटल्या असतील तर त्यासाठी, उन्हाळ्यात तळव्यांना लावण्यासाठी उत्तम! बाकी जेष्ठीमध, सितोपलादी चूर्ण असली आयुर्वेदिक औषधे तर साध्या साध्या आजाराना अगदी गुणकारी ठरतात.
मागे एकदा एक मैत्रीण सांगत होती. नवर्याबरोबर औषधाच्या दुकानात गेली, आणि अहो आग्रह करायला लागले त्रिफ़ळा चूर्णाची मोठी बाटली घे, तुला लागतंच ना! तिची हसून हसून पुरेवाट! बाहेर पडल्यावर झापलंच नवर्याला.....अरे त्या दुकानदाराला काय वाटेल, बाईंना त्रिफ़ळाशिवाय अगदीच चालत नाही वाटतं...! त्रिफ़ळा चूर्ण हे आयुर्वेदात सौम्य रेचक म्हणून वापरावे असे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त डोळ्याच्या विकारासाठी त्रिफ़ळा, तूप, मध 1:1:1 या प्रमाणात देतात. वजन कमी करण्यासाठी त्रिफ़ळाचा काढा सकाळी अंशपोटी घ्यावा असे सांगितले जाते. असेच आणखी एक औषध आमच्या लहानपणी प्रसिद्ध होते, कुटजारिष्ट. अत्यंत कडवट चवीचे हे औषध पोट बिघडले की प्यावे लागत असे, आणि बद्धकोष्ठ झाले तर गरम पाण्यात साजूक तूप घालून प्यावे लागत असे.
परंपरेने आजीबाईचा बटवा एका पिढीकडून. दुसऱ्या पिढीकडे आला. यातलं खरंच आयुर्वेदात काय आहे जाऊन कधी बघितल नाही पण पूर्ण विश्वासाने करत होतो तर लागू पडत असे.
आता आलाच आहे उन्हाळा, सगळ्या सोशल मीडियावर अशा रेसिपी दुथडी भरून वाहू लागतील आणि पुन्हा प्रयोग करायला उत्साह येईल. © श्रेया श्रीधर महाजन.
एका पुनर्जन्माची कथा
तरुण वयात आपल्याला कोणी हात पाहून भविष्य सांगितलं की लवकरच तुझ्या नशिबात गंडांतर योग संभवतो तर आपला विश्वास बसणार नाही . किंवा दुसरी प्रतिक्रिया आपण खूप घाबरून जाऊ की मला काय होणार ? आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक कोणते संकट येऊ घातले आहे ?
एकूणच एखादा व्यवसाय वा नोकरी करीत असताना आणि त्यात स्थिर- स्थावर होत असताना आपण प्रचंड कामात असतो . घराकडे, नातेवाईक, मित्र यांच्याकडे पाहायला फुरसत नसते . एखादा छंद असेल तर त्यासाठी वेळ काढायचा प्रयत्न करतो माणूस . एकूण उमेदीची वर्ष ही फार धावपळीची असतात . या वेळी आजारी पडणे परवडणारे नसते खरे तर .
त्यातून आजारपण आलेच तर सुरुवातीला ते नाकारण्याचा प्रयत्न होतो, लक्षणे अगदी नजरेआड होत नसतील तर हळूहळू स्वीकार, मग उपाय योजना यांचा विचार होतो. अगदी कागदावर आजाराच स्वरूप साधारण कसं आहे हे आपल्याला माहीत असले तरीदेखील प्रत्येक दिवस हा नव्या हिमतीने जगावा लागतो . नवनवी आह्वाने रोज समोर उभी असतात . आजार बळावत असतो नि रुग्ण जवळ जवळ निराश होत चाललेला असतो . हा रोग माझा बळी घेऊनच थांबेल का असा प्रश्न येतो . अशा वेळी तुमचं आवडतं काम तुम्ही चालू ठेवू शकलात तर मन रमतं . किंबहुना आजाराचा विसर पडतो. अशा वेळी नातेवाईक मित्र सहचर यांची भूमिका खूप महत्त्वाची असते .
सध्या एक पुस्तक वाचते आहे. ‘एका पुनर्जन्माची कथा - डॉ. मनोज भाटवडेकर’ बऱ्याच वर्षांनी अस झालं की दिवसभरात जवळ जवळ पुस्तकं वाचून पूर्ण होत आलं. अजिबात सोडवत नाहीये.
डॉ मनोज भाटवडेकर स्वतः एक मानसोपचार तज्ञ! पत्नी बालरोगतज्ञ. तरुण दंपतीच आयुष्य छान चालू होतं. दोघांचा प्रॅक्टिस मध्ये चांगला जम बसत होता अशा वेळी डॉ . मनोज यांना Rheumatic Arthritis या आजाराची सुरुवात झाली, अतिशय थोड्या कालावधीत दुखणे विकोपाला जाऊ लागले. त्यात देखील स्वत:ची जमेल तितकी काळजी घेऊन काम देखील चालू ठेवले. स्वतः डॉकटर असल्याने चटकन मदत मात्र मिळत होती. यशवंत देव यांच्याकडे गाणे देखील शिकत होते. त्यांच्याबरोबर एका ध्यान शिबिराला जाण्याचा योग आला आणि त्याने त्यांच्या दुखण्याची दिशा आणि पर्यायाने आयुष्याची दिशा बदलली . हे सगळे मुळातून वाचण्यासारखे आहे.
सुरुवातीला पुस्तकं वाचताना घडणाऱ्या घटना एखाद्या रोलर कोस्टर राईड सारख्या वेगाने घडतात. त्यात कोणीही माणूस ढेपाळला असता. अफाट सहन शकती असावी या माणसाकडे. त्याशिवाय हे शक्य नव्हते. आपल्याच डॉकटर मित्रांनी कधी कधी आजाराचे स्वरूप स्पष्ट करताना इतके कोरडे रिमार्क मारले की मन देखील दुखावले. पण यातून हे जोडपे बाहेर पडले आणि आज अनेक पेशंट ना आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करीत आहेत. जरूर वाचावे असे पुस्तक © श्रेया श्रीधर महाजन. ऑक्टोबर २०२३
श्रावणसरी
सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...
-
हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं ऐकलं की मन अजूनही हळुवार होतं. एकमेकांच्या अंगावर फुलांचे झेले उधळण्याचे दिवस सरल्याचा हळवा सूर लागतो.पण कधीतर...
-
कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवी पकडून बाही|| इथे तमाखू खाऊन घे रे| तिथे कन्हैया तमाखू नाही|| पु लं च्या पानवालाचा हा शेवट माहीत नाही अ...
-
ऋतु हिरवा...ऋतु बरवा’ असा श्रावण अगदी नजिक आला आहे. निरनिराळ्या सण-उत्सवांचा व्रतवैकल्यांचा हा महिना! धरित्रीइतकेच उत्फ़ुल्ल, ताजेतवाने होत...





