Thursday, 31 August 2023

मदनमोहन अष्टकम् | - १



कृष्ण चालले वैकुंठाला 
राधा विनवी पकडून बाही|| 
इथे तमाखू खाऊन घे रे| 
तिथे कन्हैया तमाखू नाही|| 


पु लं  च्या पानवालाचा हा शेवट माहीत नाही असा मराठी वाचक विरळा. आपल्या संस्कृतीत कन्हैया, कृष्ण इतका जवळचा वाटतो  की आपल्यासारखाच  तो देखील असावा असं माणसाला वाटतं .किंबहुना त्याने वारंवार अवतार घ्यावा नि सोबत असलेल्या भक्तांच्या मेळयाचा आनंद लुटावा. जनमानसाने मनापासून आणि  प्रेमाने स्वीकारलेला मला वाटते दुसरा कुठलाच  देव नाही . 

त्याचं बाल्य , कौमार्य , प्रौढत्व, अवतारकार्य  आपल्याला अनेक सण, उत्सव प्रसंगी पुन्हा पुन्हा स्मरत असतं . आपलं मूल जन्माला आलं की भारतीय स्त्रीला तो बाळकृष्णच  वाटतो , त्याच्या बाललीलांमध्ये ती हरवून जाते. अगदी बारशाला सुद्धा नाव ठेवायच्या आधी गोपा फिरवताना ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या’ म्हणतात. कधी स्त्री त्याला भावाच्या रूपात पूजते, कधी सखा म्हणून स्मरते, कधी राधा कृष्ण यांच्यातल्या भक्तीभावनेचा  आदर करते . ‘मोक्षदा एकादशी’सारख्या दिवशी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण पूजनीय ठरतो . त्याची नानाविध रूपे आपल्या आयुष्याला व्यापून राहिली आहेत .


मराठी साहित्य असो वा संस्कृत, हिन्दी ! कृष्ण अवतार  नाटककार, लेखक. कवी यांना नेहेमीच भुरळ घालत आलेला आहे. त्याचं निळं- सावळं रूप , मुरली , मोरपीस आणि अवघ्या चराचराला व्यापून दशांगुळे उरलेले व्यक्तिमत्त्व  ! वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कृष्ण हा ‘सखा’ वाटतो . कृष्णाचं असंच विलोभनीय वर्णन एका  सुंदर प्रासादिक स्तोत्रात सापडतं . 



‘श्री  मदनमोहन अष्टकम् ‘ असे त्याचे नाव आहे. अष्टक म्हणजे आठ श्लोक असलेले स्तोत्र . यात विष्णूच्या कृष्ण अवताराचे  स्वरूप वर्णन, गुण वर्णन आणि अवतार कार्याचा उल्लेख आहे . स्तोत्र कोणी रचले हे मात्र खूप शोधून देखील सापडले नाही . स्तोत्राचे माधुर्य पाहता  जगाला ‘पुष्टिमार्ग’ शिकवणाऱ्या   ‘वल्लभाचार्य’ यांच्या ‘मधुराष्टकाची’ आठवण येते. ऐकताना त्या शब्दांची भुरळ पडते आणि अर्थ मनात ध्वनित झाला की त्या कृष्णाच्या चिंतनात आपण हरवून जातो . 


स्तोत्रकर्ता त्याच्या इष्ट देवतेचे वर्णन करताना जणू भक्तीरसात रंगून गेला आहे . या मदनमोहन कृष्णाने  शंख आणि गदा धारण केली आहे , शरीर निळे सावळे आहे.  त्यावर  पिवळे वस्त्र धारण केले आहे. क्षणभर मनात विचार आला. विरोधी रंगसंगती नेहमीच आकर्षक दिसते असे चित्रकलेच्या तासाला शिकत आलो. हे तर त्याचे प्रत्यक्षदर्शन आहे, किती मोहक असेल ते! त्याने भाळी   चंदनविलेपन केले  आहे, कानात कुंडल आणि गळ्यात कौस्तुभ मणी धारण केला आहे.   कमळ फुलासारखे सुंदर नेत्र असलेल्या या रूपाने  ‘मार’ म्हणजे मदनाला देखील मोहित केले आहे . 


 त्याच्या वेणु/ बासरीचा मोह विश्वाला पडतो,  त्याची रासक्रीडा, त्याचा खट्याळ स्वभाव याने तो माणसाला आपल्या खूप जवळचा वाटतो .


 इतकेच नाही तर तो एक धैर्यशाली नेता आहे  , अद्भुत, सुंदर आहे  , देव देखील ज्याची सेवा करतात , साऱ्या  विश्वास त्याचा  मोह पडतो , तो मन आकर्षित करून घेतो , विश्वाच्या स्थितीला कारणीभूत ठरतो , भक्तांना  उदार आश्रय देणारा, नेहेमीच सुखनिधान , परमबंधू  , दुर्जन लोकांना शासन करणारा ,  कालियामर्दन करणारा,  गरीबांवर दया करणारा, चैतन्यपूर्ण  , माधव , धर्मपरायण , राक्षसांचा  संहार करणारा, पाप दूर करणारा, वेद विद्या जाणणाऱ्या लोकांत देखील श्रेष्ठ , गोपवधूू्ंना  प्रिय , वृंदावन धन , सत्य सनातन , दुष्टांचा  नाश करणारा, सज्जन लोकांचे अनुरंजन करणारा आहे .


त्याच्या भक्तांबद्दल त्याला अतिशय प्रेम आहे जणू करुणेचा सागरच ! भक्तांनी ज्या गोष्टीची कामना केली ते सारे काही तो त्यांना देतो . त्याच्या अस्तित्वामुळे धरणी पवित्र झाली आहे. असा हा परमोच्च देव सत्त्व गुणांची खाण  आहे. गोकुळाचे भूषण , कंसवध  करणारा , योग परायण आहे . त्याने भक्तांना इतके मुक्त हस्ते दिले आहे तर त्याच्याकडून ऐहिक लाभाची अपेक्षा का करावी ? त्यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो या दैनंदिन जगाच्या रहाटगाडग्यातून माझी  सुटका कर आणि नित्य  निरंजन अशा ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान मला होवो . ते मोक्षपद प्राप्त होवो . प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘देहि पदम्’ अशी आळवणी केली आहे. प्रासादिक, मधुर भाषेबरोबर आर्त भाव देखील मनाला जाणवतो . © श्रेया श्रीधर महाजन 29 Aug 2023


मूळ स्तोत्र येथे वाचू शकता

स्तोत्र -१ 







                                                                                                                                                        









 

Friday, 11 August 2023

साड्याच साड्या

आज सकाळी सहज ’असा मी-असामी’ ऐकत होते. पु.लं नी वर्णन केलेलं गिरगाव-पार्ले आणि सौं. सोबत साडी खरेदी करण्याचा प्रसंग ऐकला. अगदी जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
 


सहज विचार करत होते, आपण कधीपासून व्ही. टी. स्टेशनच्या परिसरात फ़िरायला
लागलो? मला वाटतं ..जे.जे. स्कूल ऑफ़ आर्टस ला अ‍ॅडमिशन घ्यायची इच्छा होती म्हणून पहिल्यांदा गेले त्या भागात. आर्ट स्कूल बाजूला राहिलं, पण आसपास ’खादी भांडार’ शोध, तिकडून कुडत्याचं कापड विकत घे, असले उद्योग सुरु झाले. तिकडे मिळणारे ‘लेमन ज्यूस विथ हनी’ हे खास पेय वाटायला लागले. कॉलेजमध्ये जायला लागल्यावर गुर्जरी प्रिंट्च्या ओढण्या, बांधणीच्या (कापडी) फ़ायली यांचा शोध सुरु झाला. ’चिमणलाल’च्या स्टेशनरीचा पत्ता लागला आणि खेपा वाढतच गेल्या.

गिरगांवातल्या कॉलेजमध्ये नोकरीला लागल्यावर तर काय विचारूच नका. शहाडे आठवले वगैरेचं पु.लं.नी केलेलं वर्णन ऐकताना तर वाटलं ही दुकानं फ़ारशी बदललीच नाहीत.


आता मुंबई पुण्यात परीक्षांचा सीझन सुरु होतोय. मला मात्र बोर्डाची सुपरव्हिजन नसली की एक वाजता मैत्रिणीबरोबर पळून जायचं, कुठे ‘खादी ग्रामोद्योग’ ने एक्सपो लावला असेल तर चक्कर मारायची या गोष्टींची फ़ार आठवण यायला लागलीये. एकतर ’क्रॉस मैदान’ला ‘एक्सपो’ असला की फ़ार जवळ पडायचे. पुढे पुढे इतकी सवय झाली की ‘बान्द्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’ला सुद्धा वाट वाकडी करून जायला काही वाटायचे नाही. जायला त्रास, पण पोहोचले की कसा रंगांचा उत्सव वाटायचा. बाटिक, ब्लॉक प्रिंट्च्या कापडाची, एखाद्या लखनवी सलवार कुर्त्याची उन्हाळा म्हणून खरेदी व्हायची. शांतिनिकेतन लेदरच्या पर्स, लिपस्टिक केस, सुट्टे पैसे ठेवायच्या

छोट्या पर्स घेतल्या जायच्या. अगदी मोठ्या पिशव्या हावरटपणे पाहिल्या जायच्या. ही पहिली फ़ेरी. मग दुसर्‍या फ़ेरीला आईला घेऊन जायचं. एखादी साडी तिला आवडली म्हणून घ्यायची. (अर्थात ती हवी तेव्हा नेसायला आपण मोकळे!!) बाकी चादरी, उशांची कव्हरं यातलं काही आवडलं तर घेतलं जायचं. सगळ्यावर अंबारी मिरवणारे हत्ती, मोर अशी चित्रं...! पारंपारिक आकार, वेलबुट्टी. पांढरे, निळे, लाल असे उठून दिसणारे रंग ...! एखादं वॉल हॅंगिंग, शोपीस, भेटीसाठी काहीबाही घ्यायचे असेल तर ते...! हे सगळं घेता घेता पायाचे तुकडे पडतायत का काय असं वाटायचं. घरी आल्याक्षणी “आई चहा..!” म्हटलं की ती लगेच ओट्याशी उभी राहून चहा ठेवायची आणि कुकर पण लावून चहा घेऊन गप्पा मारत बसायची. ( आता या सगळ्याचं भारी आश्चर्य वाटतं आणि अपूर्वाई पण!)


रात्री झोपल्यावर डोळ्यासमोर यायचं...गुलाबी रंगाची काश्मिरी, अंजिरी रंगाची चंदेरी, आकाशी रंगाची लखनवी, पैठणीवरचा दिमाखदार मोर, महेश्वरी,संबळपुरी, पोचमपल्ली, ढाका, कलकत्ता..कशाचे गडद रंग, रेशमी भरतकाम, कशाचे फ़िकट (पेस्टल) रंग......पुढच्या वर्षी यातली कोणती साडी घ्यायची याचे बेत करत करत झोप कधी लागत असे पत्ता कुणास ठाऊक?

© श्रेया श्रीधर महाजन २२ फेब्रुवारी २०१२ 

Sunday, 6 August 2023

फ़ेरारी की सवारी....!

                          

काल फ़ेसबुकवर एका मित्राने फ़ेरारी सोबत स्वत:चा फ़ोटो लावला होता. माझ्या शेजारी माझा मुलगा बसला होता. त्याला म्हटले, "तुला हवीये का फ़ेरारी? फ़ोटोपुरती देऊ शकेन मी...!" :-) हा खरंच विनोद नाहीये. छायाचित्र संपादनाचं तंत्र दिवसेंदिवस इतकं प्रगत होत चाललंय ...काहीही शक्य आहे.
सुरुवातीला पिकासा वर फ़ोटो संपादित करता यायचे. रंगसंगती, प्रकाशयोजना समायोजित करुन ते छायाचित्र छान दिसेल असा प्रयत्न करता येई. अगदी रंगीत चित्र सेपिया, कृष्णधवल करुन ते फ़ार पुरातन आहे असे दाखवता येई. वरती ’दिवाळी ग्रिटींग’ वगैरे अक्षरे लिहिता येत. एकूण आपणच काढलेल्या फ़ोटोचं ग्रिटिंग कार्ड बनवता येई. फ़ोटो कोलाज हा एक सुंदर प्रकार यात करता येतो. काही फ़ोटो अपलोड करुन आपल्या मित्र मैत्रिणींना सहज पाठवता येईल याची सोय यात होती, आजही आहे.
 मग पिकासाचं पिकनिक नावाचं सॉफ़्टवेअर आलं. यात सगळी गंमत जंमत होती. म्हणजे कुणाला दाढी-मिशा लावायच्या, कुणाच्या हातात वा चित्रावर केक, फ़ुगे दाखवायचे, कॉनफ़टीजचे रंगीत साबुदाणे विखुरलेले दाखवायचे, रंगीत फ़िती फ़डकवायच्या सगळे पॅचेस (ठिगळं) लावता येत होते. शिवाय संत व्हॅलेंटाईनच्या स्मृतीप्रित्यर्थ गुलाबांच्या बॉर्डर्स, गुलाबाच्या फ़ुलांनी बनलेली हृदयं असलं काही बाही सुद्धा एक कळ दाबून तयार करणं सोपं होतं. काही पारदर्शक बॉर्डर्स, रंगीत बॉर्डर्स, चित्र छोटं (रिसाईझ) करणं, हवे तसे कापणे, आकारांची कलाकुसर आणि बाकी नेहमीच्या गोष्टी (बेसिक फ़िक्सेस) या सगळ्या दृष्टीने नवशिक्याला सहज अवगत करता येईल असं तंत्र होतं...!
त्यानंतर माझ्या हाती पब्लिशर लागलं..! (मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िसबरोबर येतं हे) हा चक्क खजिनाच होता. फ़ोटोंना वेगवेगळे आकार देणं, हव्या त्या बॉर्डर्स , शिवाय लिखाण त्यासोबत जोडून अगदी घरच्या घरी मुलांच्या प्रोजेक्टचं काम, आमंत्रण पत्रिका, जाहिराती, फ़्लायर्स काय वाट्टॆल ते बनवणं म्हणजे हातचा मळ वाटावा अशी परिस्थिती झाली. इथे बर्‍याच कल्पना तयार मिळू लागल्या (रेडी टेम्प्लेट) आणि फ़ोटोंना अर्थपूर्ण स्वरूप देता यायला लागलं.
हे सगळं करताना अजून काही तरी हवंय अधिक प्रगत तंत्र गरजेचं आहे असं वाटत होतं. मग एडोबीचं फ़ोटोशॉप हाती गवसलं. हे सॉफ़्टवेअर मात्र बरंच परिपूर्ण आहे असं वाटतंय. यात अगदी सहजगत्या छायाचित्राची पार्श्वभूमी बदलता येते किंवा  पार्श्वभूमीवर हवा तो माणूस, प्राणी उचलून ठेवता येतो. छायाचित्राच्या हव्या तेव्हढ्याच भागात रंगसंगती बदलता येते. पार्श्वभूमी पांढरी ठेवता येते, वा रंगांची उधळण करता येते. त्यासाठी बरेच विकल्प उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त विशिष्ट भाग उठावदार व बाकीचा पुसट ठेवणे, किंवा मूळ चित्रावर अनेक चित्र ठेवत, थर लावून वेगळे अर्थपूर्ण चित्र बनवणे, पार्श्वभूमी वा

अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते.  जाहिराती


अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते.  जाहिराती


अक्षरलेखन (लेटरिंग) याला त्रिमितीचा आभास निर्माण करणे यात सहज शक्य आहे. अगदी खरं सांगायचं तर प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्याऐवजी एखाद्या टॅबलेट वर चित्र काढावे वा अनेक फ़ोटो आणि रंगसंगतीद्वारे अर्थपूर्ण छायाचित्र तयार करता यावे अशा प्रकारचे हे तंत्र आहे. ज्यांना कल्पनाशक्ती आहे पण तितके सुंदर चित्र काही हाताने उतरत नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायला नको. त्यांची हौस आणि कधीकधी तर व्यावसायिक गरज देखील अशा तंत्रानी पूर्ण होऊ शकते.  जाहिराती, व्यंगचित्रे यांच्याबरोबरच काही फ़ार जुनी अगदी आपल्या आजोबा पणजोबांच्या काळातील छायाचित्रांना देखील या नवीन तंत्राने ताजेतवाने करता येईल.

अशी अद्ययावत तंत्र हाताशी असल्यावर माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी कलाकारांची कल्पनाशक्ती देखील भरार्‍या मारु लागते. मग सृजनशील कलाकारांबद्दल काय सांगावे...!  ©श्रेया श्रीधर महाजन. कॅलिफोर्निया . पूर्वप्रसिद्धी _या सख्यानो  या- दिवाळी अंक ११ नोव्हेंबर २०१२ 

 

Saturday, 5 August 2023

मधुराधिपतेरखिलम् मधुरम् |

 


ऋतु हिरवा...ऋतु बरवा’ असा श्रावण अगदी नजिक आला आहे. निरनिराळ्या सण-उत्सवांचा व्रतवैकल्यांचा हा महिना! धरित्रीइतकेच उत्फ़ुल्ल, ताजेतवाने होतो आपण सगळे...!

 

खरेतर, हे सगळे करता करता भक्तिरसात न्हाऊनही निघतो. श्रावण म्हटले की प्रथम आठवते ती गोकुळाष्टमी. दहीकाल्याच्या गडबडीबरोबर कृष्णसख्याचे प्रेम, भक्ति खरे तर नवरसांनी बहरलेलं त्याचं चरित्रच डोळ्यांसमोर तरळतं.! त्याच्या लीलांनी आणि कवींच्या प्रतिभांनी भारतीय साहित्य समृद्ध झालं आहे. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’… अशा शब्दात सुरेश भटांनी या रासक्रीडेचं वर्णन केलं,  ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’..अशा शब्दात अण्णासाहेब किर्लोस्करांनी जयजयकार केला, ‘राधा कृष्णावरी भाळली’ म्हणत पी. सावळारामानी त्यांच्या मीलनाचं वर्णन केलं , असा कृष्ण.  त्याचं सारं वर्तन …अवतीभवतीचं विश्वच मधुर ….गोड , सारं मुरलीच्या स्वरांनी नादावलेलं, भक्तीरसाने भारावलेलं आणि त्याच्या मुकुटात खोवलेल्या मोरपिसाइतकं अकृत्रिम..!

 

या विचारांच्या आवर्तात आठवलं ते ‘मधुराष्टकम्’. श्रीमद् वल्लभाचार्यांची प्रासादिक रचना ज्यात ‘पुष्टिमार्गीय भक्तीचे’ सूर आळवलेले आहेत.  त्या कृष्णाच्या वाणीत गोडवा, त्याचं चालणं सुडौल, हसणं लाघवी, वस्त्रप्रावरणं आकर्षक, गळ्यातले हार सुगंधी , त्याने वाजवलेला पावा वेड लावणारा, सुस्वर, रूप मनोहारी, अंगप्रत्यंग लावण्यमयी, त्याचं नृत्य सुंदर, हातातलं लीलाकमळ अप्रतिम, गोपी, यमुनेचा परिसर सारं अतिशय मधुर्….खरं तर त्याचं अस्तित्व सार्‍या अणुरेणुत भरून राहिलंय ! त्यामुळेच हे सारं मधुर, हवंहवंसं आहे.

 

मोठं विलक्षण आहे हे स्तोत्र. जग मिथ्या, खोटं असं नाहीच. ती परमेश्वराची निर्मिती आहे. ती सुंदरच असणार आणि खरी देखील!  हा विचार किती प्रभावीपणे मांडलाय इथे!

 

‘वल्लभाचार्य’ हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते. भगवंताची भक्ती हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी आपल्या भाष्यांतून मांडला. ‘बाळकृष्णाची वात्सल्यभावाने भक्ती’ या मार्गात सांगितली आहे. नामजपाला खूप महत्त्व दिले आहे.

 

सगुण साकार स्वरूपात परमेश्वराची भक्ती केल्यास गोलोक प्राप्त होतो. हीच मुक्ती होय असा विचार त्यांनी मांडला.

 

गीतेच्या नवव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे पत्र, पुष्प, फळ, तोय जे जमेल ते भक्तिपूर्वक अर्पण करून हा माधुर्यभाव आपल्या मनात रुजवूया.

 



.....सौ. श्रेया श्रीधर महाजन. सनिव्हेल,  ऑगस्ट २०१२ कॅलिफोर्निया




कथा कथेची

आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता…अशी नुसती सुरुवात वाचली तरी हा साहित्यप्रकार कोणता ते आपण सहज ओळखू शकतो. गोष्ट हा “वाङ्मयप्रकार” आहे अशी जाणीव होण्याच्या आधीपासून ती आपल्या अंगवळणी पडलेली असते.

आई  वा आजीने सांगितलेल्या गोष्टी, गंमतगोष्टी, गुजगोष्टी असे वाचत वाचत फ़ास्टर फ़ेणे, चिंगी आणि गोट्या इथपासून म्हैस आणि इतर कथांपर्यंतचा आपला प्रवास झटकन डोळ्यांसमोर येतो. याव्यतिरिक्त कधी काही दंतकथा, पुराकथा कानी पडतात. एखादा किस्सा एखादा गोष्टीवेल्हाळ मनुष्य रंगवून सांगतो तेव्हा ती देखील कथाच असते. शाळेत असताना पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती अशा बोधकथा वाचलेल्या असतात. तर कुणाला “युद्धस्य कथा रम्या” म्हणत युद्धकथा आवडू लागतात. कधीतरी शाळेत असताना आवाज, जत्रा असले दिवाळी अंक हाती पडतात त्यातल्या विनोदाची भलतीच वेगळी जातकुळी जाणवलेली असते तर कधी “स्त्रियांसाठी” विशेष मासिकांतल्या घरगुती हलक्याफ़ुलक्या कथा वाचल्या जातात. थोडी अक्कल आल्यावर जीए आवडू लागलेले असतात.. तर कधी हिमालयातील योगी, तिबेटातील योगी यांच्या चरित्रकथा आवडतात. एकेकाळी संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक हाती लागलं तर अनेक व्रतांच्या कहाण्या “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण” इथपर्यंत वाचून काढल्याचं स्मरतंय..! एकूण गोष्ट/कथा/ कहानी ही आपल्या आयुष्यात चांगलीच सामावून गेलीये.


तिच्या गरजा देखील फ़ार नाहीत. एक वा अनेक नायक, नायिका, आसपासचा परिसर, वस्तु काहीही केंद्रस्थानी असेल तरी कथा रचता येते. ती पूर्णत: कविकल्पित असेल तर तिला “कथा” म्हणावं जर वास्तवाचा अंश असेल तर “आख्यायिका” म्हणावं. कथेचा जीव छोटा असेल एखाद- दोन केंद्रवर्ती पात्रं असतील तर ‘लघुकथा’ म्हणावं. परंतु कथानकाचा पट फ़ार मोठा, गुंतागुंतीचा असेल तर ‘दीर्घकथा वा कादंबरी’ म्हणावं. ‘नॉव्हेल’ या अर्थी आपण कादम्बरी हा शब्द वापरतो. मात्र हे चिरपरिचित आहे की बाणभट्ट नावाच्या कवीने कादंबरी हे गद्यकाव्य रचलं. ते इतकं प्रसिद्ध झालं की ज्यामुळे हाच शब्द प्रचलित झाला. एका पेटीच्या आत दुसरी पेटी , त्यात तिसरी असावी तशी कथानकांची गुंफ़ण यात केली आहे. एखाद्या निबिड जंगलाचं सौंदर्य पहाता त्यात हरवून जावं तसं या कथानकांत हरवून जायला होतं.

कथेतील पात्रं, पार्श्वभूमी, संवाद, व्यक्तिचित्रणे, भाषाशैली या सगळ्या गोष्टी कथेला अलंकृत करीत असतात. मात्र तिचा आत्मा हा तिच्या कर्त्यावर, त्याच्या निरीक्षणशक्तीवर अवलंबून असतो. पल्लेदार वाक्यरचना ते अगदी सुटसुटीत वाक्यरचना इथपर्यंतचा कथेचा प्रवास रोचक आहे. अनेकदा धक्कादायक शेवट करण्यात कथाकारांना विशेष रस असतो. तर कधीकधी शेवट अगदी सहज सांगू शकू असा असतो. शैली बहुतेक वेळा गद्यात्मक असते. प्राचीन काळी मात्र गद्यपद्यात्मक (उदा:पंचतंत्र)तसेच पूर्णत: पद्यात्मक (उदा:कथासरित्सागर) शैलीचा देखील कथावाङ्मयात उपयोग केलेला दिसतो.  ऋग्वेदातील सरमा पणि कथांसारखी संवादसूक्त, उपनिषदे  वा ब्राह्मणांमध्ये विवेचनात येणार्‍या कथा, पुराणे इथपासून सुरुवात झालेल्या या कथावाङ्मयाने मानवी जीवन मोठे समृद्ध केले आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हीच एक आगळीवेगळी, सतत घडणारी कथा आहे...डोळसपणे अनुभवत रहायला हवी....! © श्रेया श्रीधर महाजन . १ जानेवारी २०१४



श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...