मदनमोहन अष्टकम् | - १ येथे वाचा
कृष्णाचे रूप, गुण वर्णन करताना स्तोत्रकर्ता मोठी रोचक विशेषणे वापरतो . त्यापैकी ‘मदनमोहन’ हे महत्त्वाचे विशेषण आहे . कृष्णाला ‘मदनमोहन’ असे का म्हटले जाते याची दोन कारणे सापडली . एक म्हणजे साक्षात मदनाला (कामदेवाला )देखील मोहित करू शकेल असा मोहक , ज्याचे तेज एकाच वेळी १०० सूर्य तळपत असावे असे आहे . दुसरे कारण असे की, जेव्हा कृष्ण आपल्या हृदयात विराजमान असतो तेव्हा वासनात्मक विचार आपोआप पराजित होतात . कृष्णाची भक्ती कामना, वासना यापासून आपल्याला मुक्त करून मोक्षाकडे नेणारी ठरते ..
मदनमोहन या देवतेच्या उत्पतीविषयी असे सांगितले जाते की कृष्णाचा प्रपौत्र (पणतू ) वज्रनाभ याने तीन मूर्ती तयार करून घेतल्या . या तीनही मूर्ती कृष्णाच्या होत्या . त्याने प्रत्यक्ष कृष्णदर्शन घेतले नव्हते . त्यामुळे परीक्षित माता उत्तरा हिने केलेल्या वर्णनानुसार (काही ठिकाणी उषा म्हणजे वज्रनाभाची आई हिने केलेल्या वर्णनानुसार ) या मूर्ती तयार केल्या गेल्या असे उल्लेख सापडतात . तीन मूर्ती तयार करून तर घेतल्या पण एकही अचूक नव्हती . श्री गोविंद मूर्तीचे मुखारविंद मिळते जुळते होते तर श्री मदनमोहन मूर्तीचे नाभीपासून चरणकमल आणि श्री गोपीनाथ मूर्तीचे धड म्हणजे गळ्यापासून नाभीपर्यंत भाग मिळता जुळता होता.
चैतन्य चारितामृत( आदिलीला) या ग्रंथात सांगितले आहे की कृष्णभक्तीच्या तीन पायऱ्या आहेत . संबंध , अभिधेय आणि प्रयोजन . मदनमोहन , गोविंद आणि गोपीनाथ या तीन देवतांची काही वैशिष्ट्ये आहेत. मदनमोहन या देवतेची भक्ती करीत असताना ईश्वरी तत्त्वाशी जोडलेली आणि आता विस्मृतीत गेलेली आपली नाळ पुन्हा जुळविणे घडते . अर्थात संबंध पुन : नवे होतात . सांप्रत काळात ईश्वरी तत्त्वाशी आपले नाते जणू विस्मृतीत गेले आहे . या बाबतीत पूर्ण अज्ञान आहे. त्यामुळे त्या ईश्वरी तत्त्वाला शरण जाणे हिताचे आहे . भक्तिमार्गाचे अनुसरण करीत असताना सुरुवातीला श्री मदनमोहन रूपाचे चिंतन , भजन पूजन करावे . तो आपल्याला आकर्षित करेल आणि ऐहिक सुखांकडचा आपला ओढा थोडा कमी होईल . त्यानंतर गोविंद आणि गोपीनाथ किंवा गोपीजन वल्लभ या रुपाची भक्ती करावी . पद्म पुराणात सांगितले आहे की तीनही देवतांचे एका दिवसात दर्शन घ्यावे त्याने कृष्ण दर्शनाचे पूर्ण पुण्य लाभते .
आता श्री गोविंद आणि गोपीनाथ मूर्ती जयपूर येथे आहेत आणि श्री मदनमोहन मूर्ती करोली, राजस्थान येथे आहे .
थोडे शोधल्यावर या दोन्ही मंदिरांविषयी माहिती मिळाली ती अशी -
श्री राधा मदन मोहन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश येथे आहे . या प्राचीन मंदिरात मदन मोहन कृष्णाची मूर्ती ललिता गोपी आणि राधा यांच्यासमवेत आहे . हे मंदिर यमुना नदीवर असून नागर स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे. कालिया घाटावर ५० फुट उंचीवर बांधलेले आहे . ‘गोस्वामी तीर्थस्थान’ या नावाने हे ठिकाण ओळखले जाते . राधा मदनमोहन मंदिर ५००० वर्षे जुने आहे . कृष्णाचा पणतू ‘वज्रनाभ’ याने ते बांधले . काळाच्या ओघात मूर्ती गहाळ झाल्या . कालांतराने ‘अद्वैत आचार्य’ याना त्या मूर्ती एका जुन्या वटवृक्षाखाली वृंदावन येथे सापडल्या . आपला शिष्य पुरुषोत्तम चौबे याला त्यानी त्या सांभाळण्यास सांगितल्या. पुढे त्याने त्या सनातन गोस्वामी यांना दिल्या .
असे म्हणतात की इसवीसन १५८० मध्ये मुलतानी व्यापारी कपूर रामदास याने सनातन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर पुन्हा बांधले . इसवीसन १६७० मध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांनी मथुरा आणि वृंदावन यावर स्वारी केल्यामुळे मूळ मूर्ती गुप्तपणे राजे जयसिंग यांनी रातोरात जयपूरला नेली . राजा गोपाल सिंह यांनी करौली राजस्थान येथे ही मूर्ती नेली . वृंदावन येथील मंदिरात आता मूर्तीची प्रतिकृती आहे तर मूळ मूर्ती करौली राजस्थान येथे आहे .
दुसरे मदन मोहन मंदिर करौली , जयपूर येथे आहे जे आपल्या सांस्कृतिक वारश्याचे अभिन्न अंग आहे . यांचे खास ऐतिहासिक महत्त्व आहे . भगवान श्रीकृष्ण मंदिर राजस्थानची राजधानी जयपूर पासून १८२ किलो मीटर दक्षिण पूर्व करोली जिल्हा येथे आहे . असे म्हणतात की करोली येथील मदन मोहन मंदिरात असलेली प्रतिमा वृंदावन मधील कालीदहच्या जवळ द्वादशादित्य टेकडीजवळ मिळाली . औरंगजेब आक्रमण प्रसंगी मूळ मंदिर शिखर पूर्ण नष्ट करण्यात आले त्यावेळी मुगल आक्रमणापासून मूर्ती वाचाव्यात म्हणून सुरक्षा दृष्टीने मूर्ती जयपूर येथे आणल्या गेल्या .
दोन्ही मंदिरांबाबत ऐतिहासिक माहिती वाचल्यावर भाष्य टाळावे असे म्हटले तरीही ही वस्तुस्थिती गप्प बसू देत नाही . मुघलांच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी आणि आपल्या देवतांची विटंबना होऊ नये म्हणून वेळोवेळी मूर्ती हलविल्या गेल्या कधी पाण्यात, कधी तळघरात ठेवल्या गेल्या हा इतिहास लपणारा नाही .
कितीही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी पुनरुज्जीवित होते अशी आपली हिंदू संस्कृती आहे. हिंदू जनाना तो कृष्ण प्रिय इतका प्रिय आहे की. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' असा मंत्र जपताना माणूस स्वतः ला विसरतो. 'जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम' ज्याच्या जोरावर विकत घेतला श्याम असे म्हणावेसे वाटते. ‘केनु संग खेलू होली, पिया त्यज गये है अकेली’ अशी मीराबाईची विराणी ऐकू येते. तर कधी 'सर्वदेवनामस्कारो केशवं प्रति गच्छति' असे सुभाषित वाचनात येते .
आणि शंकरचार्यांचा हा विचार पूर्णत: पटतो, संसार पार करण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही .
भजगोविन्दं भजगोविन्दं, गोविन्दं भजमूढमते।
नामस्मरणादन्यमुपायं, नहि पश्यामो भवतरणे॥
© श्रेया श्रीधर महाजन 29 Aug 2023



No comments:
Post a Comment