Monday, 3 March 2025

ग दि मांच्या पंचवटीतून

 हे पुस्तक वाचून आज पूर्ण झालं. गदिमांच्या स्नुषा शीतल श्रीधर माडगूळकर यांच्या लेखणीतून अनेक प्रसंग जिवंत झाले आहेत. गदिमा, त्यांच्या पत्नी विद्याताई, ज्येष्ठ चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांची व्यक्तिचित्रणे अतिशय स्पष्ट आणि सुरेख आहेत. या व्यक्तींचे मृत्यू देखील जीवाला चटका लावून जातात.

साहित्य, कला, संगीत यांचा समृध्द वारसा, वेळोवेळी केलेले प्रवास, काँग्रेस पक्षाचे काम करत असताना आलेले अनुभव , अनेक थोर व्यक्तींचा सहवास, गदिमांचे सुपुत्र म्हणून श्रीधर याना मिळालेला सन्मान, गदिमांच्या लेखांचे संकलन - प्रकाशन आणि ती सारी प्रक्रिया, विद्याताईंचे आत्मचरित्र आणि निर्मितीप्रक्रिया सारे काही मुळातून वाचण्याजोगे आहे.
आवर्जून वाचावे असे पुस्तक.
© श्रेया श्रीधर महाजन

Saturday, 1 March 2025

आई.. आमची सुपर वुमन



तुमची आई असणं ही एक वेगळीच भावना असते. आजारी असली, लांब असली तरी आहे हे खूप महत्त्वाचं. अशी  सुपर वूमन आपापल्या घरी असतेच.

गोरीपान, घारे पाचूसारखे डोळे अगदी कोकणस्थी सात्त्विक चेहरा,  साधी असली तरी फार व्यवस्थित नीट नेटकी साडी, कुरळ्या केसांची वेणी आणि कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर हास्य ही आमच्या आईची वैशिष्ट्य होती.
 
आम्ही मुलंच नव्हे तर शेजारी पाजारी, ती ज्या शाळेत नोकरी करीत होती तिथले सहकारी , नातेवाईक सगळ्यांनाच तिचं अन्नपूर्णा रूप परिचयाचं होतं, जणू तिच्यावर वरदहस्त होता. पुरणपोळ्या असोत, उंधिया असो वा नारळाच्या वड्या , रव्याचे लाडू. नामांकित पदार्थ तयार होई. अक्षरश : पदार्थ पाहून कळत असे की हे तिने केले. निगुतीने लोणची घालणं, मसाले, भाजण्या करणे असो की वाळवणे घालणं, छुंदा, मोरावळा करणे. रुचिरा मध्ये पाहून नवनवे पदार्थ करणे जसे आवळ्याचा जाम करणे, शिंगाड्याचे पीठ वापरून उपवासाची भजी करणे. खूप सृजनशील मन होतं.

उत्तम शिवण शिवत असे. ट्विनिंग वगैरे या कल्पना अस्तित्वातच नव्हत्या त्या काळात तिने मला आणि माझ्या मैत्रिणीला सारखे फ्रॉक शिवले होते. आम्ही दोघी एकाच वेळी ते घालून मिरवत असू. 

 काम करण्यासाठी आवश्यक चिकट आणि चिवटपणा देखील होता. तिने बऱ्याच उशीरा बालवाडी शिक्षिकेचा कोर्स केला, मग तिथे शिकवता शिकवता योग अभ्यास , मग त्या वर्गाला शिकवणे, ब्रह्मविद्या, पेटी वाजवायला शिकणे अनेक गोष्टी जसा वेळ मिळाला, आमची लग्ने झाली त्यांनंतर शिकली ती. वाचनाची आवड आणि सवय तर तिच्याकडूनच आली माझ्याकडे. चौथी, सातवीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करताना तर मला आश्चर्य वाटायचं इतकी शब्दसंपत्ती हिच्याकडे कशी ? संस्कृतचे उत्तम उच्चार त्यामुळे लहानपणी फार लवकर अनेक स्तोत्रे घरीच शिकवायला सुरुवात केली तिने आम्हाला. बहुतेक वेळा संध्याकाळी ताक करता करता, भाजी निवडता निवडता स्तोत्र पठण, पाढे म्हणून घेणे हा कार्यक्रम चाले, पावकी , निमकी, औटकी, सवयकी हे शब्द देखील आजच्या पिढीला माहीत नसतात. पूर्वीच्या पिढीने मात्र हे सगळं नुसतं पाठ नाही केलं तर त्याचा रोजच्या आयुष्यात उपयोग पण केला. त्यांचं स्वतः च खूप पाठ असायचं त्यामुळे हातात पुस्तक घ्यायची गरज नव्हती. अनेक संस्कृत सुभाषिते, म्हणी यांचा चालता बोलता ज्ञानकोश होता तो.


मुंबई महापालिकेच्या शाळात  काही बालवाड्या उघडलेल्या होत्या ज्यामुळे पहिलीत येणाऱ्या मुलाची एकदम कोरी पाटी नसावी. बालवाडी अंगणवाडी शिक्षिकांचे प्रश्न घेऊन जेव्हा मोर्चा असे तेव्हा अनेक वेळेस तिच्या सहशिक्षिकांना घेऊन ती आझाद मैदानावर जात असे. कोलबाड ला अनुताई वाघ यांचा प्रकल्प , ताराबाई मोडक यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, मॅडम माँटेसरी यांची अध्यापन पद्धत, माधव मनोहर यांच्या पत्नी मालती मनोहर ज्या शिशुविहार इथल्या प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख होत्या त्यांचे अध्यापन कौशल्य, क्रीडन पद्धतीने अध्यापन या सगळ्या विषयांवर खूप माहिती तिच्याकडून मिळत असे. किंबहुना मी बी एड च्या वर्गात शिकायला सुरुवात केली तेव्हा असे वाटले या अनेक विषयावर आपण नववी दहावीत असल्यापासून ऐकत आहोत. 

घरचे संभाळून मुलुंड मध्ये पाच सहा ठिकाणी चालणाऱ्या बालवाड्यांचे प्रमुख पद सांभाळणे, वेळोवेळी कधी मुंबई महापालिकेच्या मुख्य कचेरीत, कधी T ward ऑफिस मध्ये जाऊन परवानग्या घेणे कधी सरकारी कार्यक्रम आयोजित करणे, रात्र अभ्यासिका सांभाळणे , प्रौढ साक्षरता वर्ग सांभाळणे अशी अनेक कामे करता करता अनेक पुरस्कार मिळाले. सुवर्णकार समाजाच्या बालवाडी होत्या त्या संस्थेकडून आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार झाला. पेंडसे समाजकल्याण मंडळाचा 'गुणगौरव सोहळा' असतो त्यात स्वकर्तृत्वावर झेप घेणाऱ्या माहेर वा सासुरवाशिणीचा गौरव करण्यात येतो. या अंतर्गत 'स्वयंसिध्दा पुरस्काराने' गौरवान्वित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाकडून 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देखील मिळाला. 

लोकसंग्रह तर अफाट होता. रोज आम्हाला सोडायला आणायला शाळेत येत असल्यामुळे आमच्या मित्र मैत्रिणींचे पालक ह्यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. अनेक फॅमिली फ्रेंड झाले. ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक नेहमी बाहेर पडले की भेटत. पूर्वी ठाण्यात राहत असतानाचे परिचित तर इतके भेटत की कधी ब्राह्मण सोसायटीत गेले की निघताना दर पाच मिनिटाला एक स्टॉप होई. कदाचित तिचा बोलका स्वभाव, गुणग्राहकता, चांगल्या गोष्टीचे कौतुक करायची तयारी, कुणाच्याही अडचणीला धावत गेलंच पाहिजे ही मानसिकता आणि पटकन काहीही उचलून द्यायची उदारता , कष्टाळू असणे हे तिचे गुण असावे.

आमचा मामा आजारी असताना तिची इतकी धावपळ चाले आणि आजी आजारी होती तेव्हा पटकन जाता आले नाही तर जीव किती खालीवर होत असे हे आम्ही जवळून पाहिले आहे.  वडिलांच्या नंतर सासरच्या मंडळींना देखील तिने घट्ट पकडून ठेवले होते. ती मंडळी देखील प्रत्येक अडीअडचणीला भक्कम आधार देणारी होती.

यथावकाश नोकरी सोडून पुन्हा एकदा पूर्ण वेळ गृहिणीपद स्वीकारले. मुलगा सुन, मुली,जावई , नातवंडे सगळा समृद्ध परिवार होता. अध्यात्माकडे ओढा होताच तो वाढत गेला. आता निवृत्त आयुष्य निवांतपणे जगावे तोवर आजारपण आले विस्मरण होऊ लागले, पायाचे दुखणे होऊन अगदीच बिछान्याला खिळणे आले. जेवायला नाही मिळाले तरी चालेल पण बोलायला कोणी तरी हवे म्हणणारी आमची आई अगदी हवे नको देखील सांगेनशी झाली हे स्वीकारणे अवघड होते. दररोज एक चक्कर बाहेर मारलीच पाहिजे हा तिचा शिरस्ता होता तो देखील मोडला. हळूहळू घरातली माणसे देखील ओळखेना. दुःख वाटते तितकेच सुख. सगळ्या यातना, वेदना संपल्या. जातस्य हि ध्रुवो मृत्यू... शिवोsहम् म्हणत  शिवतत्वात विलीन झाली. ©श्रेया श्रीधर महाजन. 24/2/25









श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...