ऋतु हिरवा...ऋतु बरवा’ असा श्रावण अगदी नजिक आला आहे. निरनिराळ्या सण-उत्सवांचा व्रतवैकल्यांचा हा महिना! धरित्रीइतकेच उत्फ़ुल्ल, ताजेतवाने होतो आपण सगळे...!
खरेतर, हे सगळे करता करता भक्तिरसात न्हाऊनही निघतो. श्रावण म्हटले की प्रथम आठवते ती गोकुळाष्टमी. दहीकाल्याच्या गडबडीबरोबर कृष्णसख्याचे प्रेम, भक्ति खरे तर नवरसांनी बहरलेलं त्याचं चरित्रच डोळ्यांसमोर तरळतं.! त्याच्या लीलांनी आणि कवींच्या प्रतिभांनी भारतीय साहित्य समृद्ध झालं आहे. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’… अशा शब्दात सुरेश भटांनी या रासक्रीडेचं वर्णन केलं, ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’..अशा शब्दात अण्णासाहेब किर्लोस्करांनी जयजयकार केला, ‘राधा कृष्णावरी भाळली’ म्हणत पी. सावळारामानी त्यांच्या मीलनाचं वर्णन केलं , असा कृष्ण. त्याचं सारं वर्तन …अवतीभवतीचं विश्वच मधुर ….गोड , सारं मुरलीच्या स्वरांनी नादावलेलं, भक्तीरसाने भारावलेलं आणि त्याच्या मुकुटात खोवलेल्या मोरपिसाइतकं अकृत्रिम..!
या विचारांच्या आवर्तात आठवलं ते ‘मधुराष्टकम्’. श्रीमद् वल्लभाचार्यांची प्रासादिक रचना ज्यात ‘पुष्टिमार्गीय भक्तीचे’ सूर आळवलेले आहेत. त्या कृष्णाच्या वाणीत गोडवा, त्याचं चालणं सुडौल, हसणं लाघवी, वस्त्रप्रावरणं आकर्षक, गळ्यातले हार सुगंधी , त्याने वाजवलेला पावा वेड लावणारा, सुस्वर, रूप मनोहारी, अंगप्रत्यंग लावण्यमयी, त्याचं नृत्य सुंदर, हातातलं लीलाकमळ अप्रतिम, गोपी, यमुनेचा परिसर सारं अतिशय मधुर्….खरं तर त्याचं अस्तित्व सार्या अणुरेणुत भरून राहिलंय ! त्यामुळेच हे सारं मधुर, हवंहवंसं आहे.
मोठं विलक्षण आहे हे स्तोत्र. जग मिथ्या, खोटं असं नाहीच. ती परमेश्वराची निर्मिती आहे. ती सुंदरच असणार आणि खरी देखील! हा विचार किती प्रभावीपणे मांडलाय इथे!
‘वल्लभाचार्य’ हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते. भगवंताची भक्ती हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी आपल्या भाष्यांतून मांडला. ‘बाळकृष्णाची वात्सल्यभावाने भक्ती’ या मार्गात सांगितली आहे. नामजपाला खूप महत्त्व दिले आहे.
सगुण साकार स्वरूपात परमेश्वराची भक्ती केल्यास गोलोक प्राप्त होतो. हीच मुक्ती होय असा विचार त्यांनी मांडला.
गीतेच्या नवव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे पत्र, पुष्प, फळ, तोय जे जमेल ते भक्तिपूर्वक अर्पण करून हा माधुर्यभाव आपल्या मनात रुजवूया.
.....सौ. श्रेया श्रीधर महाजन. सनिव्हेल, ऑगस्ट २०१२ कॅलिफोर्निया

No comments:
Post a Comment