काल भारतीय विद्या भवनाचे माजी प्राचार्य श्री. सुधीर चितळे यांचे देहावसान झाले. मन;पूर्वक श्रद्धांजली !
बातमी ऐकल्यावर खरोखर दु:ख झाले आणि त्याबरोबर कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अकरावी बारावीला गणित विषयाला यांची पुस्तके वापरली होती , चितळे जोशी नावानी प्रसिद्ध पाठ्यपुस्तके ! माझ्या मोठ्या बहिणीकडून या पुस्तकांबद्दल ऐकले होते. गणित विषय फार आवडीचा म्हणून देखील पुस्तके अभ्यासली गेली. मात्र हे पुस्तक लिहिणाऱ्या प्राध्यापकाना आपण कधी भेटू असे बिलकुल वाटले नव्हते.
पुढे यथावकाश नोकरी लागल्यावर कळले हेच ते गणिताचे प्राध्यापक आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. भयंकर आदरयुक्त दरारा होता त्यांच्याबद्दल . पहिली मीटिंग अटेंड केली तेव्हा जाणवलं माणसाचा एक पाय कायम कोर्टात असल्यासारखे वाटते , प्राचार्य आहेत का वकील? पण माणूस अत्यंत हुशार दिसतो आहे.
साधारण २० -२५ वर्षापूर्वीचा तो काळ थोडा वेगळाच होता. खूप प्रायव्हेट कॉलेजेस नव्हती. लांब पडले तरी मुले HSC बोर्डाच्या कॉलेजेस मध्ये प्रवेश घेत होती. आणि खूप जास्त अनुपस्थिती असली की कॉलेजेस परीक्षेला बसू देत नसत. Integrated Courses चा सुळसुळाट नव्हता. मग पालक कोर्टात गेले तर हजेरी पत्रक कोर्टात सादर करावे लागेल. म्हणून नेहमी हजेरी पत्रक कसे भरावे याचे धडे ते वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकांना देत होते. अर्थात काम शिस्तशीर व्हायला हवे हे पहिल्याच दिवशी लक्षात आले.
पण हळूहळू ओळख होत गेली तसतसे या माणसाच्या अंतरंगी नाना कळा आहेत हे देखील जाणवू लागले.
एक चांगला प्राचार्य कसा असतो, कामाला किती वेळ आणि महत्त्व देऊ शकतो आणि काम किती अचूक होईस्तोवर लक्ष देऊ शकतो हे यांच्याकडून शिकावे. त्याबरोबर जुन्या गाण्यांचा अपूर्व संग्रह आणि माहिती यांच्याकडे होती याचा प्रत्यय वारंवार येत असे. अगदी नवा आलेला स्टाफ मेम्बर असो की जुने जाणते सहकारी असोत अतिशय आदरपूर्वक बोलणे आणि बोलता बोलता सहज चेष्टा करणे हे त्यांचे विशेष गुण , मस्त मिस्कील भाव असायचे अशा वेळी चेहऱ्यावर! अनेकदा जर नीट संदर्भ कळला नाही तर मात्र विनोद पार डोक्यावरून जाई, कधी फारच पटकन काळाला तर समोर हसता देखील येत नसे. पण वातावरण नेहमी खेळीमेळीचे असायचे . चांगल्या गोष्टीच फार कौतुक व्हायच पण त्यांनी बोलावलं की जायला लोक घाबरायचे कारण एकच सात्त्विक संताप !
चिडले की मात्र थांबवून विचारावेसे वाटे तुमचे गोत्र जमदग्नी का ? मग समोर कोणीही असो . वक्तशीरपणा हा बहुधा त्यांच्या लेखी सगळ्यात महत्त्वाचा गुण असावा. माणूस वेळेवर हजर हवा , तास फुकट जाऊ नयेत असे वाटणे हे नक्कीच गैर नव्हते. शिक्षकांच्या बाबतीत तर शुद्ध भाषा, विषयावर असलेलं प्रेम हे कधीच लपून रहात नाही, त्यांच्यासारख्या चाणाक्ष आणि अनुभवी नजरेला ते चटकन जाणवत असणार!
अर्थात माणूस आहे कुणी लाडका कुणी दोडका हे नक्की झालं असेल , अधिकारपदी असल्यावर व्यक्तीविषयी उलट सुलट चर्चा, प्रवाद असणारच !
तरीही शिक्षक असोत वा शिक्षकेतर कर्मचारी एक वेगळाच जिह्वाळा या व्यक्तीविषयी सगळ्यांच्या मनात होता.
दर तीन डिसेंबरला सरांचा वाढदिवस या गोष्टीची आठवण येते , पुढे देखील येत राहील.
ॐ शान्ति शान्ति शान्ति © श्रेया श्रीधर महाजन ५ एप्रिल २०२१
