Friday, 25 July 2025

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजेयुगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे||
केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा||
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी
जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
कधी हासऱ्या, कधी लाजऱ्या, आल्या श्रावणसरी.
-शांता शेळके
द्यावा पृथिवी म्हणजे स्वर्ग आणि धरती हे दैवी जोडपे अगदी ऋग्वेद काळापासून रूढ आहे. हा द्युलोक आपले प्रेम पर्जन्याच्या रूपाने पृथ्वीवर धाडतो . पृथ्वी न्हाऊन प्रसन्न होते आणि तिच्या गर्भातून बीज अंकुरते. एखादा बैल हंबारव करीत यावा तसा आवाज करत पर्जन्य आपल्या आगमनाची वार्ता कळवतो. आणि आपली पखाल या पृथ्वीवर रिती करतो. हे वर्णन ऋग्वेदातील पर्जन्य सूक्तात येते. हा सृजनाचा उत्सव असतो. निसर्गात आढळणारा. पहिल्या ओळीत शांताबाई याच नैसर्गिक आविष्काराविषयी सांगत आहेत . या प्रसव वेदनांतून निर्माण होणारी आहे ती अक्षर अशी आशा.
न क्षरति क्षीयते इति अक्षरम् ! अशी अक्षर शब्दाची व्युत्पत्ती यास्काचार्यांनी दिली आहे. जे कधीच कमी होत नाही , नष्ट होत नाही चिरंतन आहे ते अक्षर. निसर्ग असाच अव्याहतपणे उत्पत्ती, स्थिती, लय या तीन अवस्थांतून जात असतो. जे निसर्गाच तेच माणसाचं.
आशा नाम मनुष्याणां काचित आश्चर्य शृंखला|
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तस्तिष्ठांति पंगुवत ||
सनातन असा हा आशेचा बंध आहे. जिने बांधलेला नेहमी धावत असतो आणि तिच्यापासून मुक्त असणारा एखाद्या पांगळ्याप्रमाणे स्थिर असतो.
श्रावणातील हसरी नाचरी सर आणि त्यातून जन्मणारी हिरवळ अन्नधान्याला जन्म देणारी, सजीवांचे भरण पोषण करणारी आहे. सृजनाच्या आशा पल्लवित करणारी आहे.
मनामनाचा गुंता आदिम काळापासून चालत आलेला आहे. तितकेच चिरंतन आहे सृष्टीचे सजणे. अळवाच्या पानावर पडलेला नाजूक थेंब मोत्यासारखा दिसतो. त्याचं असणं अगदी काही क्षणापुरतं. पण ते छोटं आयुष्य तो दिमाखात जगतो, उन्हात चमकतो. श्रावणाच्या सरी न्हाऊन माखून ओलेत्या होऊन येतात. त्यामुळे मनाला अधिक भिडतात. असाच ऊन पावसाचा खेळ माणसाच्या मनात चालू असतो. एखाद्या रहाट गाडग्याप्रमाणे सुख दुःख येत रहातात. चक्रारपङ्क्तिरिव गच्छति भाग्यपङ्क्ति:||
या वाटेवर कधी कोण भेटेल कुणास ठाऊक. पण आपल्या मनातला श्रावण , उत्सवी श्रावण अगदी कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर हसरा, नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. © श्रेया महाजन

Wednesday, 16 July 2025

वेगवेगळी फुले उमलली

 

हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं ऐकलं की मन अजूनही हळुवार होतं. एकमेकांच्या अंगावर फुलांचे झेले उधळण्याचे दिवस सरल्याचा हळवा सूर लागतो.पण कधीतरी ते फुलपंखी दिवस उमललेच असतील ना? त्या दिवसांची जेव्हा केव्हा कल्पना मी करते तेव्हा तेव्हा वाटते,तो मधुमास (चैत्र) असावा, वसन्ताचे आगमन नुकतेच झाले असावे. मनसिज असा कामदेव , तो तर वसंतऋतूचा मित्रच...........मोगऱ्याचा धुंद करणारा गंध असेल, तो आणि ती हरवून गेले असतील एकमेकात.!

 मोगरा , आम्रमंजिरीचा गंध,  गुढीपाडवा अशा अनेक गोष्टी वसंताच्या संदर्भात आठवतात..अगदी लहानपणी 'आला वसंत दारी' म्हणून एवढे काय खूष व्हायचे?" असे वाटायचे. कारण गुढीपाडव्याच्या आगे मागे तोंडी परीक्षा असायच्या. मग लेखी परीक्षा .! फक्त गच्चीवर  किंवा गॅलरीत बसून अभ्यास करताना कोकिळांचे कूजन ऐकू यायचे, अंतर्मनाला  सुखावून जायचे! कैरीचा छुन्दा , साखरंबा आणि पन्हे व्हायचे. उन्हाळा शीतल व्हायचा. आरोग्य संपदा मधे'आला उन्हाळा तब्बेत सांभाळा' असा कार्यक्रम आला की उन्हाळा हे काही तरी तब्बेत सांभाळण्याजोगं भारी प्रकरण आहे अस वाटायचं.

थोडे मोठे झाल्यावर होळी,पाडवा आणि बोर्डाच्या परीक्षा, पेपर तपासणे याची पक्की गाठ बसली, ती काही केल्या सुटता सुटेना.

 अमेरिकेत आल्यावर या स्प्रिंग सीज़न चे महत्त्व पटायला लागले. बर्फाचे पांढरेशुभ्र  डोंगर सुरुवातीला फारच कौतुकाचे होते. आकाशात बसून कुणीतरी मोदकाची पिठी चाळावी तसा बर्फ भुरभुरत असे. माझ्या वाढदिवसाला पहिला स्नो फॉल पाहिला तेव्हा वाटले या परक्या देशात आहे तरीही कुणीतरी आपल्याला आभाळभर  शुभेच्छा देत आहे. नंतर हे शुभेच्छा देणं रोजचच झालं ..

 

मग स्वच्छ ऊन कधी आहे हे पाहण्यासाठी वेदर चॅनेल पहावासा वाटायला लागला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मात्र थोडे तेज:पुंज दिवस यायला लागले. एखाद्या दिवशी तापमान चांगलं  असेल तर जत्रेत असावी तशी बागेत गर्दी दिसायला लागली.  खुरटलेली, सुकलेली झाडं तरारून फुलायला लागली.सृष्टी हिरवाईने नटली. गवतावर नाजूक पिवळी फुलं दिसायला लागली.नितांतसुंदर चेरी ब्लॉसम   पहिला. लाल गुलाबी ट्यूलिप्स दिसायला लागले. असं ऐकिवात आहे की अमस्टरडॅमला लोक या मौसमात केवळ ट्युलिपसच्या बागा पाहायला जातात. लंडनच्या बंकिंगहॅम पॅलेस चा बगीचा देखील या काळात नयनरम्य दिसतो.

असा सालंकृत निसर्ग पाहाताना कालिदासाचे ऋतुसंहार नाही आठवले तरच आश्चर्य! ऋतुमानाचा  सामान्य माणसाच्या मनावर इतका परिणाम होतो मग कामिजनांची हृदये विद्ध नाही का होणार? सृष्टीत एव्हढे नव चैतन्य आल्यावर कात टाकल्यासारखी मोठमोठी जॅकेट्स टाकून बीचवर निघाली मंडळी समुद्र्स्नान घ्यायला, जल क्रीडांचा आनंद लुटायला!

मुलांच्या सायकली निघाल्या, स्कर्टमधे मुली शोभून दियायला लागल्या, मिकी मौसचे रंगीत फ्लोट दिसायला लागले. निळे,हिरवे असे शीत रंगसंगतीचे कपडे जाउन पिवळे,लाल असे फ्लोरोसेंट कलर्स दिसायला लागले. हीटर बंद झाले आणि गाड्यांच्या काचा इतक्या महिन्यानी उघड्या करता आल्या. गरम कॉफी ऐवजी कलिंगडे ,स्ट्रॉबेरी,टरबूजे दिसायला लागली ग्रोसरी स्टोर्स मधे. 

वसंत गेला ,ग्रीष्म संपला ,एके दिवशी झाडावर लाल पिवळी छटा दिसायला लागली.थोडी थंडीची शिरशिरी आली. एकेक पान गळावया लागले.  फॉल सुरू झाला वाटते...........उमलेली फुले गळून गेली.

फुलांचे झेले उधळण्याचे  दिवस संपले! © श्रेया श्रीधर महाजन सप्टेंबर २००८  




वागीश्वरी

 खूप वर्षांपासून एक सुंदर सरस्वती वंदना ऐकण्यात आहे...जय शारदे वागीश्वरी!

आशा भोसल्यांचा स्वर, शांताबाई शेळक्यांचे शब्द, श्रीधर फ़डके यांचे संगीत..एक अपूर्व काव्यानुभव आहे हा!

या संस्थळाचे नाव ‘वागीश्वरी’ का? हा प्रश्न मला अनेक लोकानी विचारला. या प्रश्नाचे उत्तर या कवितेत  आहे.


मी जेव्हा जेव्हा परमपूज्य प्रभु बा यांचे फ़ोटो पहाते, एक दोन वेळाच त्यांचा आवाज ऐकण्याचा योग आला,वारंवार लेखन वाचते, मला पुन्हा पुन्हा ते साक्षात सरस्वतीचे मूर्त रूप वाटते.

‘वागीश्वरी’ म्हणजे ईश्वरी वाणी,  आपल्या गुरुदेवांच्या मुखातून येणारी वाणी ही ईश्वरी आहेच. दुसरा अर्थ देवी सरस्वती…विद्येची देवता ! आपलं “जाड्य” आळस दूर करणारी, आपल्याला कार्यक्षम करणारी!

या संपूर्ण कवितेतलं वर्णन आपल्या गुरु परमपूज्य बांना लागू पडतं… सरस्वती, साक्षात् ब्रह्मदेवाची कन्या, विद्या धारण करणारी देवता ! इतकेच नव्हे तर   ज्योत्स्ना म्हणजे चांदण्यासारखी तुझी कांती आहे. तुझे मुख म्हणजे शारदीय चंद्रमा ! तुझ्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा उजळते ! तुझ्या कृपेचे चांदणे आमच्या शिरी नेहेमीच बरसत राहू दे!

हे देवते, तुझी चतुर , कलामय अंगुली  वीणेवर फ़िरते तेव्हा नवे संगीत जन्माला येते! कल्पतरुवर मोहोर यावा त्याप्रमाणे कल्पनांना नवे नवे अंकुर फ़ुटतात! सृजनशीलता जागृत होते ! जाड्य, बुद्धिमांद्य नष्ट होते!

हे देवते, तुला सर्व विद्या, कला, संस्कृती, शास्त्रे वश आहेत. तुझ्या प्रतिभस्पर्शामुळेच रुचिर कलाकृती जन्माला येतात, तुझ्यामुळेच या विश्वातील अप्रतिम लावण्ययात्रा दृष्टोत्पत्तीस येते…!

अगदी हेच तर आपल्या गुरु आपल्यासाठी करीत आहेत. म्हणूनच जय शारदे ’वागीश्वरी ’ ! © श्रेया महाजन .


पूर्वप्रसिद्धी मे २०११ वागीश्वरी संस्थळ


गरमागरम सूप्स....अहा....!

 

धो-धो पाऊस पडतोय आपण भिजून आलोय, आल्या आल्या  हातात वाफ़ाळणारा सूपचा बाऊल  दिलाय. त्याच्या वासानेच थंडी पळते आणि तोंडाला चव आल्यासारखे वाटते. ’सूप’ हा शब्द संस्कृतातदेखील आढळतो. याचा अर्थ वरण किंवा आमटी असा पातळ पदार्थ. आपण मात्र इंग्रजीत वापरल्या जाणार्‍या अर्थाने सूप हा शब्द वापरतो. पुष्कळदा ’टोमॅटो सूप’ इतकेच आपल्याला अपेक्षित असते.

परदेशात  अनेक प्रकारची सूप्स कॅनमध्ये मिळतात. ती घरी आणून गरम केली आणि साधा ब्रेड भाजून घेतला किंवा गार्लिक ब्रेड भाजून घेतला तर थंडीपावसात रात्रीचे जेवण त्यावर भागवता येते. सुरुवातीला असे तयार कॅन आणले. मग त्यावरील लेबल्स वाचली तर त्यात भयानक सोडियम आहे असे आढळले. मग पुस्तके आणून वाचून घरच्या घरी प्रयोग सुरु झाले.

प्रचंड पाऊस पडला आणि गारवा आला की करायला आणि प्यायला मस्त वाटतात असे दोन तीन प्रकार मी इथे देते आहे. अशा वेळी कोणी पाहुणे येणार असतील तर आवर्जून सूप, जेवण, गोड पदार्थ असे तीन टप्प्यातले जेवण आपण करु शकतो.

वास्तविक, आपण जे टोमॅटो सूप करतो ते ’प्युरीड सूप’ म्हणजे भाज्या वाटून केलेले सूप असते. याची थोडी वेगळी आवृत्ती म्हणून आपण टोमॅटो सोबत गाजर, बीट, कांदे, बटाटे घालून मिक्स्ड व्हेजिटेबल सूप करतो.

परदेशात मात्र मला ’चंकी सूप’ हा देखील प्रसिद्ध प्रकार आहे असे आढळले. म्हणजे थोडे पातळ पाणी त्यात बटाट्याचे वगैरे तुकडे, कडधान्ये इत्यादी. चांगला प्रोटिन व्हिटॅमिन रिच पदार्थ तयार होतो.

यातले लसूण, मिरपूड यांचे प्रमाण आपण हवे तसे कमीजास्त करु शकतो. बेसिल नावाची एक वनस्पती (खरे तर पुदिना/तुळस यांसारखी वाळलेली पाने) हल्ली बर्‍याच मॉल्स मध्ये मिळते. टोमॅटो बेसिल हे एकत्र छान लागते. तसेच ऑरिगॅनो,रोझमेरी पण. या दोन्हींची वाळलेली पाने थोडी हाताने चुरगळून चिमटीभर जरी कोणत्याही सूप वा पास्तामध्ये घातली तरी छान गंध  येतो.

आपण दोन्ही प्रकारच्या सूपच्या रेसिपी पाहू. आणि सोबत गार्लिक ब्रेड कसा करायचा तेही...!

१.   मिनस्ट्रोन सूप/ मिश्र डाळी, कडधान्येआणि पास्ता यांचे सूप.

२.   पम्पकिन सूप/ भोपळ्याचे सूप

३.   लेन्टिल सूप/ मसुरांचे सूप

४.   क्रुटॉन्स

५.   गार्लिक ब्रेड.

 

१.  


मिनस्ट्रोन सूप/ मिश्र डाळी, कडधान्ये आणि पास्ता यांचे सूप

साहित्य: पाव वाटी मिश्र डाळी ( हिरवी चणाडाळ, पिवळी चणाडाळ, मसूर डाळ, आणि चिमटीभर तांदूळ), शिजलेली कडधान्ये (राजमा, पांढरे चवळी, आवडत असतील तर छोले ) सगळे मिळून वाटीभर,अर्धी वाटी पास्ता (शक्यतो एल्बो, मॅक्रोनी, डिटालीनि असा बारीक पास्ता घ्यावा.), कांदा, सेलरी, गाजर, कोबी, बटाटे सगळे पाव वाटी प्रत्येकी, आवडत असेल तर पातीचा कांदा व पात, अगदी एखादी पात व त्याचा कांदा बारीक चिरुन, चार पाच लसणी बारीक वाटून वा चिरुन, मीठ, आपल्याला आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची चिरुन (आपल्या भारतीय आवडीसाठी ), मिरपूड, बेसिल, ऑरिगॅनो पावडर आवडीप्रमाणे चिमटीभर, चार टोमॅटो वाटून.

कृती: प्रथम थोड्याशा बटर वर कांदा व लसूण, मिरची घालावे. थोडे परतल्यावर , बारीक चिरलेला कोबी, सेलरी, क्युबच्या आकारातले बटाटे व गाजर सगळे परतावे. त्यात कच्च्या डाळी घालाव्या. व टोमॅटो प्युरी आणि पाणी, मीठ घालून शिजवावे. मग उकडलेली कडधान्ये व पास्ता घालावा. मंद आचेवर सगळे शिजल्यावर मीठ, मिरपूड, बेसिल घालावे व आवडत असेल तर वरुन किसलेले चीज आणि ऑलिव्ह ऑईल घालावे.

टीप: कच्च्या डाळी आवडत नसतील तर नाही घातल्या तरी चालतात. जर पास्ता घातला नाही तर हेच सूप  ’हार्टी व्हेजिटेबल सूप’ म्हणून सर्व करता येईल. पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक वापरता येईल. नीट विचार केला तर भाजी, उसळ, पास्ता हे वेगवेगळे तीन पदार्थ न करता एकाच वेळी घट्टसर असे सूप जेवणाऐवजी घेतले तरी चालण्यासारखे आहे.


लेन्टिल सूप किंवा मसूरांचे सूप:

साहित्य: चार एक तास भिजलेले पण मोड न आलेले एक वाटी मसूर, चार लसूण पाकळ्या, तीन टोमॅटोंची प्युरी, कांदा, सेलरी, गाजर प्रत्येकी पाव वाटी.

कृती: प्रथम  बटर वर लसूण, कांदा, सेलरी, गाजर परतून घ्यावे, मग भिजलेले मसूर परतावे. त्यात टोमॅटो प्युरी, पाणी, मीठ , मिरपूड घालून मंद आचेवर खूप वेळ शिजवावे. दाट वा पातळ हवे करावे. त्यानुसार पाणी कमी जास्त करता येईल.

३.   भोपळ्याचे सूप/पम्पकिन सूप

साहित्य: चांगला लाल भोपळा पाव किलो चौकोनी तुकडे करुन, एक बटाटा, चौकोनी तुकडे करुन, एक कांदा बारीक चिरलेला, दोन चमचे फ़ेटलेली साय.

कृती: बटरवर कांदा परतावा, शिजल्यावर बटाटे आणि भोपळा घालून , पाणी घालून चांगले शिजवावे. मग मिक्सर मधून काढावे किंवा हँड मिक्सरने घुसळावे. मीठ हवे तर साखर घालावी. आणि पुन्हा शिजवावे. वर फ़ेटलेली साय, आवडत असल्यास मिरपूड घालावी.

४.  

क्रुटॉन्स

साधारणत: प्युरीड सूप क्रुटॉन्स सोबत सर्व  करतात. ब्रेडचे तुकडे करावे. एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल वा पातळ केलेले बटर, मीठ आणि बेसिल पावडर /मिरी पावडर / चाट मसाला / कुठे लसणीची पूड मिळाली तर ती घालावी. त्यात हे तुकडे घालून नीट मिसळावे. मग गॅस ओव्हन मध्ये बेकिंग ट्रे वर ठेऊन कुरकुरीत करावे वा तव्यावर शेकावे. एका हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. टोमॅटो, पालक, गाजर, भोपळा यांची सूप मिक्सरमधून वाटून करतो त्यांच्या सोबत हे देता येतील.

५.  

गार्लिक ब्रेड

अनेकदा पिझा हट मध्ये गेलो की आपण पिझा सोबत गार्लिक ब्रेड घेतो. परंतु गार्लिक ब्रेड ची खरी मजा सूप सोबत येते. शिवाय इतके चीज घातलेला ब्रेड खाताना फ़ारच गिल्टी वाटते. त्याऐवजी घरच्या घरी अगदी तसा नाही पण त्याच्या जवळ जाणारा गार्लिक ब्रेड करता येतो.

दोन तीन चमचे अमूल बटर, घरचे लोणी वा साजूक तूप घ्या. ते कढईत थोडे गरम करुन पाच सहा लसणीचे बारीक काप त्यात घाला व गॅस बंद करा. हे गार्लिक बटर करण्यासाठी थंडीत मिळणारी पातीची लसूण सगळ्यात उत्तम, पात आणि पाकळ्या दोन्ही चिरुन घाला.

मग होल व्हीट ब्रेड, ब्राऊन ब्रेड वा साधा ब्रेड, किंवा आपला लादी पाव घ्यावा. गार्लिक बटर लावून खरपूस भाजावा. कोणत्याही सूप सोबत वा नुसता गरमगरम खावा.

-   © श्रेया महाजन.

पूर्वप्रसिद्धी जून २०१३ या सख्यानो या इ मासिक 

 

 

Tuesday, 15 July 2025

लिलीच लिली


साधारणत: वसंत ऋतू सुरु झाला ना की अमेरिकेतल्या बऱ्याचशा पब्लिक लायब्रऱ्यांमध्ये बागकामाविषयीची  पुस्तकं अगदी दर्शनी भागी काढून ठेवलेली असतात. अशीच  गुलाबी रंगाची आकर्षक फ़ुलं असलेलं कव्हर पाहून एक  पुस्तक मी उचललं आणि स्वत:च्या नावावर घेतलं . घरी  जाऊन वाचते तर काय ते एका फ़ुलांवर संशोधन करणाऱ्या  व्यक्तीचं चरित्र होतं. विषय अगदी नवा, पूर्णत: अपरिचित.  मला खूप आश्चर्य वाटलं ...असाही विचार आला, “ आपल्याकडे  मिळेल का हो असं गव्हाच्या संकरित जाती तयार करणाऱ्या  व्यक्तीचं चरित्र?”  जास्तीत जास्त ‘आमची माती आमची  माणसं ’ मध्ये त्यांची मुलाखत झाली असती. 


मी आधी उत्सुकतेने फ़ोटो पाहिले. चार वेळा उलटपालट

केल्यावर लक्षात आलं पूर्वी यातल्या पिवळ्या, पांढऱ्या, लाल  लिलीचे फ़ोटो आपण काढलेत. पण हा जो गडद गुलाबी रंगाचा  आणि पांढरी किनार असलेला फ़ोटो तो मात्र नवा आहे.  या लिलीचं नाव ‘स्टारगेझर लिली’. ही संकरित जात निर्माण करणारा शास्त्रज्ञ त्याचं नाव लेस्लि वुड्रिफ़. ‘स्टारगेझर लिली  हे अतिशय सुवासिक आणि देखणं फ़ूल. खरेतर बुके वा  गुच्छांमध्ये विकली जाणाऱ्या फ़ुलांत गुलाबाच्या पाठोपाठचा  क्रमांक या फ़ुलाचा लागतो. पूर्ण सूर्यप्रकाशात वा अर्धवट  सावलीत देखील ती वाढतात . ६ ते ८ इंच इतका मोठा व्यास  या फ़ुलांचा आढळतो. या फ़ुलांचं इतकं कौतुक का? तर लिलीच्या काही जाती ह्या टपोऱ्या उमलणाऱ्या, तर काही जाती फ़ुलताना जमिनीच्या दिशेने वळणाऱ्या पण अतिशय सुगंधित असतात, देखण्या असतात. हे तीनही गुणधर्म या एका संकरित जातीत आले  आहेत. हे साधलं कसं त्याचे प्रयोगदेखील वर्णिले आहेत.  एका परीक्षानळीच्या आत काळा रंग लावून हे वुड्रिफ़  महाशय एक फ़ू ल त्यावर आपटत. मग परीक्षानळीत गोळा  झालेले परागकण दुसऱ्या  फुलांच्या   अंतर्भागात एका उंटाच्या के सांच्या ब्रशने लावत. या संकरणामागे केवळ एक सुं दर फ़ूल  निर्माण करणे हे एकमेव ध्येय होते. त्यांनी लिलीच्या अनेक  संकरित जाती निर्माण के ल्या. परंतु ओरिएंटल लिली आणि  एशियाटिक लिली यांच्या संकरणाने निर्माण के लेले हे फ़ू ल  मात्र जन्मत: आकाशाकडे तोड केलेले दिसले म्हणून  याला  ‘स्टारगेझर लिली’ असे नाव त्याने दिले. 
आपल्या रंग, गंध आणि सौदंर्याने जगाला भारुन टाकलेले  फ़ू ल ज्याने निर्माण केले त्याला सलाम. श्रेया महाजन, ठाणे.





आला उन्हाळा तब्बेत सांभाळा

 काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी एक फ़ोटो तयार केला. ब्रेकफ़ास्ट टाइम नावाचा! त्यावर ताजे केलेले ब्लु बेरी मफ़िन्स, बेरीज, इतर फ़ळं, दुधाचा ग्लास, सगळे फ़ोटो एखादे कोलाज करावे तसे लावले. आणि अर्थात शोभेला फ़ुलांचे फ़ोटो पण! सवयीने खरे तर! "हा फ़ोटो छान दिसतोय पण यावर गुलाब कशाला?" इति अहो. आता खवचट प्रश्नाला खवचट उत्तर. असा विंचू काय गप्प बसतो का?  मी म्हटलं,"प्रेमाचा गुलकंद घालायचाय!"

 


उत्तर तर दिलं....! आणि माझ्या डोळ्यांसमोर खरंच गुलकंदाची बाटली तरळली. ’आला उन्हाळा तब्बेत सांभाळा’ म्हणणार्‍या वसुंधरा पेंडसे नाईक आठवल्या. अगदी प्रवाळयुक्त गुलकंद,  घातलेल पाणी, कैलास जीवन मधले म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे तळवे चोळणार्‍या आजी...! पूर्वी आमचा एक मामा नेहमी सांगायचा ...झोपताना आयोडेक्स, कैलास जीवन आणि अमृतांजन या तीन बाटल्यांमध्ये तीन बोटं बुडव आणि डोक्याला लाव, भस्माचे पट्टॆ काढल्यासारखी....सगळे रोग दूर होतील. एकूण कफ़, पित्त आणि वात या तिघांचा समतोल राखणं म्हणजे स्वस्थ असणं असं आयुर्वेद सांगतो. त्या दृष्टीने वापरली जाणारी ही औषधे जवळ जवळ आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होऊन गेली आहेत.

 

परदेशात जेव्हा ही औषधे अगदी हाताशी नसतात तेव्हा तर आजीबाईंचा बटवा आणि घरगुती खाद्यपदार्थांचे औषधी गुणधर्म माहीत असणं खूप कामी येतं. याच उन्हाळ्यातली ही गोष्ट आहे. अचानक गरम व्हायला लागलं आणि आमच्या लेकाचे डोळे फ़ार लाल दिसायला लागले. मला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी  नाटकातला संवाद आठवला, "डोळ्याला आली लाली, चष्म्याला औषधं लावली." :-) मुलगा आजारी आणि मातोश्रींना विनोद सुचतायत. पुष्कळ औषधं पोटात दिली, डोळ्यात घातली, फ़रक पडेना. मग टी. व्ही. बंद, संगणक बंद. तरीही फ़रक नाही.  एकदा सहज विचार केला पूर्वी आमची आजी  सावरीचं पान साजूक तूप लावून तिच्या  टाळूवर ठेवायची. उष्णता कमी होते म्हणे अंगातली.  काशाच्या वाटीनं तूप लावून पाय चोळून द्यायचे हा पण चांगला उपाय . हा उपाय सहज जमेल असं वाटलं. ते मात्र खरंच कामी आलं, योग्य गुण आला.

 

स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ, मसाले यांचे औषधी गुणधर्म  आयुर्वेदात सांगितले आहेत. मला आठवतंय सर्दी झाली की धने उकळून त्याचे पाणी(काढा), पित्त झाले तर धने आणि खडीसाखर रात्रभर एक ग्लासभर पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी प्यायचे. आराम मिळत असे बुवा त्याने! लहानपणी एकदा आत्याकडे गेले होते पुण्याला तर ती म्हणाली शतधौती तूप करूया घरी! एका तांब्याच्या ताम्हनात तूप घ्यायचे आणि पळी पळीने शंभर वेळा पाणी घालायचे, प्रत्येक वेळी काशाच्या वाटीने थोडे घोटायचे. हवे तर थोडा कापूर घालायचा. हे तयार मिश्रण डब्यात भरून ठेवायचे. टाचा फ़ुटल्या असतील तर त्यासाठी, उन्हाळ्यात तळव्यांना लावण्यासाठी उत्तम! बाकी जेष्ठीमध, सितोपलादी चूर्ण असली आयुर्वेदिक औषधे तर साध्या साध्या आजाराना अगदी गुणकारी ठरतात.

 

मागे एकदा एक मैत्रीण सांगत होती. नवर्‍याबरोबर औषधाच्या दुकानात गेली, आणि अहो आग्रह करायला लागले त्रिफ़ळा चूर्णाची मोठी बाटली घे, तुला लागतंच ना! तिची हसून हसून पुरेवाट! बाहेर पडल्यावर झापलंच नवर्‍याला.....अरे त्या दुकानदाराला काय वाटेल, बाईंना त्रिफ़ळाशिवाय अगदीच चालत नाही वाटतं...! त्रिफ़ळा चूर्ण हे आयुर्वेदात सौम्य रेचक म्हणून वापरावे असे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त डोळ्याच्या विकारासाठी त्रिफ़ळा, तूप, मध 1:1:1 या प्रमाणात देतात. वजन कमी करण्यासाठी त्रिफ़ळाचा काढा सकाळी अंशपोटी घ्यावा असे सांगितले जाते. असेच आणखी एक औषध आमच्या लहानपणी प्रसिद्ध होते, कुटजारिष्ट. अत्यंत कडवट चवीचे हे औषध पोट बिघडले की प्यावे लागत असे, आणि बद्धकोष्ठ झाले तर गरम पाण्यात साजूक तूप घालून प्यावे लागत असे. 

परंपरेने आजीबाईचा बटवा एका पिढीकडून. दुसऱ्या पिढीकडे आला. यातलं खरंच आयुर्वेदात काय आहे जाऊन कधी बघितल नाही पण पूर्ण विश्वासाने करत होतो तर लागू पडत असे.

आता आलाच आहे उन्हाळा, सगळ्या सोशल मीडियावर अशा रेसिपी दुथडी भरून वाहू लागतील आणि पुन्हा प्रयोग करायला उत्साह येईल. © श्रेया श्रीधर महाजन.


एका पुनर्जन्माची कथा


 तरुण वयात आपल्याला कोणी हात पाहून भविष्य  सांगितलं की लवकरच तुझ्या नशिबात गंडांतर योग संभवतो तर आपला विश्वास बसणार नाही . किंवा दुसरी प्रतिक्रिया आपण खूप घाबरून जाऊ की मला काय होणार ? आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक कोणते संकट येऊ घातले आहे ? 


एकूणच एखादा व्यवसाय वा नोकरी करीत असताना आणि त्यात स्थिर- स्थावर होत असताना आपण प्रचंड कामात असतो . घराकडे, नातेवाईक, मित्र यांच्याकडे पाहायला फुरसत नसते . एखादा छंद असेल तर त्यासाठी वेळ काढायचा प्रयत्न करतो माणूस . एकूण उमेदीची वर्ष ही फार धावपळीची असतात . या वेळी आजारी पडणे परवडणारे नसते खरे तर . 


त्यातून आजारपण आलेच तर सुरुवातीला ते नाकारण्याचा प्रयत्न होतो, लक्षणे अगदी नजरेआड होत नसतील तर हळूहळू स्वीकार, मग उपाय योजना यांचा विचार होतो. अगदी कागदावर आजाराच स्वरूप साधारण कसं आहे हे आपल्याला माहीत असले तरीदेखील प्रत्येक दिवस हा नव्या हिमतीने जगावा लागतो . नवनवी आह्वाने रोज समोर उभी असतात . आजार बळावत असतो नि रुग्ण जवळ जवळ निराश होत चाललेला असतो . हा रोग माझा बळी घेऊनच थांबेल का असा प्रश्न येतो . अशा वेळी तुमचं आवडतं काम तुम्ही चालू ठेवू शकलात तर मन रमतं . किंबहुना आजाराचा विसर पडतो. अशा वेळी नातेवाईक मित्र सहचर यांची भूमिका खूप महत्त्वाची असते . 


सध्या एक  पुस्तक वाचते आहे. ‘एका पुनर्जन्माची कथा - डॉ. मनोज भाटवडेकर’  बऱ्याच वर्षांनी अस झालं की दिवसभरात जवळ जवळ पुस्तकं वाचून पूर्ण होत आलं. अजिबात सोडवत नाहीये.

डॉ मनोज भाटवडेकर स्वतः एक मानसोपचार तज्ञ! पत्नी बालरोगतज्ञ. तरुण दंपतीच आयुष्य छान चालू होतं. दोघांचा प्रॅक्टिस मध्ये चांगला जम बसत होता अशा वेळी डॉ . मनोज यांना Rheumatic Arthritis या आजाराची सुरुवात झाली, अतिशय थोड्या कालावधीत दुखणे विकोपाला जाऊ लागले. त्यात देखील स्वत:ची जमेल तितकी काळजी घेऊन काम देखील चालू ठेवले. स्वतः डॉकटर असल्याने चटकन मदत मात्र मिळत होती. यशवंत देव यांच्याकडे गाणे देखील शिकत होते. त्यांच्याबरोबर एका ध्यान शिबिराला जाण्याचा योग आला आणि त्याने त्यांच्या दुखण्याची दिशा आणि पर्यायाने आयुष्याची दिशा बदलली . हे सगळे मुळातून वाचण्यासारखे आहे.

सुरुवातीला पुस्तकं वाचताना घडणाऱ्या घटना एखाद्या रोलर कोस्टर राईड सारख्या वेगाने घडतात. त्यात कोणीही माणूस ढेपाळला असता. अफाट सहन शकती असावी या माणसाकडे. त्याशिवाय हे शक्य नव्हते. आपल्याच डॉकटर मित्रांनी कधी कधी आजाराचे स्वरूप स्पष्ट करताना इतके कोरडे रिमार्क मारले की मन देखील दुखावले. पण यातून हे जोडपे बाहेर पडले आणि आज अनेक पेशंट ना आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करीत आहेत. जरूर वाचावे असे पुस्तक © श्रेया श्रीधर महाजन. ऑक्टोबर २०२३ 


ऋतुराज आज वनि आला….

 परवा एका मैत्रिणीने लिहिलं होतं दसरा आणि गुढीपाडव्याला  पुऱ्या तळायला लागलं की मला कसंसच व्हायला लागतं.  म्हणजे यानंतर आपल्याला परीक्षेची तयारी करायचीय असं  काहीसं वाटायला लागतं. किती अचूक पकडलंय ना....!  आपल्याकडे दोन्ही सणांच्या आसपास परीक्षा असतातच.  आणि युनिवर्सिटीच्या परीक्षा तर अगदी ऐन उन्हाळ्यात. मी  पण अशाच मनोवृत्तीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे एप्रिल- मे हा  एक तर अभ्यासाचा, नाही तर फ़ावल्या वेळात काही तरी  शिकण्याचा, थोडा पॉकेटमनी कमावण्यासाठी ‘व्हेकेशन बॅच’ घेण्याचा काळ असं माझं मत होतं.

लहानपणी आई वडिलांबरोबर कधी बाहेरगावी गेली असेन एक दोन वेळा तेवढेच. पण कुठेही गेलं तरी लाईट- पाण्याचा  त्रास पाहून आम्ही मुलांनी घरात डिक्लेअर केलं होतं...सुटी  इथेच काढायचीये आम्हाला. जास्तीत जास्तं पुणा नाहीतर  नगर. यापलीकडे जायचं नाही.

कालांतराने लग्न झालं नि वर्षा- दोन वर्षात अहो युरोपात  गेले दौऱ्यावर. दुनियाभरचे नखरे करत मी त्याला जॉइन झाले चारेक महिन्यानी. या वर्षीची सुटी कल्पनेने पण छान वाटत होती. कॉलेजला सुटी लागायच्या आतच पळाले  तिकडे. पहिला परदेशप्रवास, तोपण सार्स आणि कसले  कसले तमाम साथीचे आजार असताना. फ़्लाइट मध्ये ‘हिट’ मारावं तसले औषधी फ़वारे मारले गेले. खरं तर  प्रवास खूप सोपा होता, कुठे फ़्लाईट बदलायचं नाही की काही नाही. एकदा घरच्यांनी इथे विमानात बसवलं की तिकडे नवरा घ्यायला येणार. पण माझा स्वभाव पडला  वेंधळा. त्यात मला कुठेही बसल्या बसल्या झोप लागू  शकते. मध्यरात्री फ़्लाइट. गेले कित्येक दिवस तयारीसाठी  धावपळ चाललेली. खूप प्रयत्नांनी जागी राहिले. तिकडे  गेल्यावर वाचायला दोन तीन मराठी पुस्तकं घेतली होती,  त्यातलं एक विमानाची वाट पहाता पहाता संपलं पण.  आणि...पोहोचले बुवा एकदाची हिथ्रो विमानतळावर.

त्याकाळी हाताशी इतके सहज मोबाइल नसायचे.  नवऱ्याचा पत्ता, फ़ोन नं घेतला होता. पण तो दिसल्यावर  जाम बरं वाटलं . रस्त्यात मात्र काट्या कुट्यांनी, काटक्यांनी  बनलेली, थिजलेली झाडं पाहिली आणि वाईट वाटलं . दिवसा  पण प्रचं ड थंडी वाजत होती एप्रिल महिन्यात. हळूहळू कळलं  ही बरी परिस्थिती आहे. स्नो ओसरलाय. 

तिथल्या घरी तर पोहोचलो. ब्रह्मचाऱ्याची मठी असते, तसे  काहीसे घर होते. हरकत नाही. नवऱ्याच्या ताब्यात बेसन लाडू , बाकरवड्या आणि शेंगदाणा भजी ठेवल्यावर त्याचा  चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागला. ‘चहा करु’ असा  विचार केला तर कसचं काय? घरात दूध नाही. संस्कृतातल्या रागाची (अनुराग) जागा मराठीतल्या रागाने घेतली. बाहेर  पडून आणावं तर पुणेकरांच्या वरताण मं डळी. तिथे  दुकानं दुपारी चार वाजता बंद होत शनिवारी, रविवारी . इतर  दिवशी पाच आणि फ़क्त गुरुवारी सं ध्याकाळी ७ वाजता.  माझा विश्वास बसेना. सुदैवाने तो दिवस कसाबसा काढला  आणि दुसऱ्या दिवशी टेस्को, एसडा असली दुकानं पालथी घातली. सगळी खरेदी चालत जाऊन करायची. प्रचंड वजन झालं तर कॅब म्हणजे टॅक्सी. दधाचे तांबे उचलून आणायचे  आणि सगळ्यात कहर दररोज ताजं दूध आणायचं नाही.  हे भयंकर वाईट्ट. शिळ्या दधाचा चहा प्यायला तरी पुन्हा ताज्या दधाचा चहा करून पिणाऱ्या अट्टल चहाबाजाला  अशीच शिक्षा हवी...हाहाहा....!  

सुदैवाने त्या दिवशी एका मॅनेजरच्या घरी जेवायला आमंत्रण होतं त्यामुळे स्वयंपाक टळला. मग लक्षात आलं हे प्रकार  आपल्याला पण करायला हवे. हे कठीण आहे. म्हणजे  जेवायला काय घालू? पण तिकडे एक छान गोष्टं कळली.  पुढच्या महिन्यात ते कु टुंब एमस्टरडॅमला चालले होते.  त्ट्युलिप्सच्या बागा बघायला. तमाम मंडळीनी मला  फ़क्त  सिलसिला चित्रपटात तिथलं शूटिग घेतलंय असं सांगितलं .  एक दोन आठवडे गेले एप्रिलचे. चालत फ़िरत हिडता येईल एवढं पिटरबरो ओळखीचं झालं होतं आणि लायब्ररी कार्ड ताब्यात आलं होतं. तिथल्या लायब्ररीत कॅलिग्राफ़ीवरची  जेवढी पुस्तकं पाहिली, वाचली तेवढी कधीच नाही मिळाली.  

मला आईने अशाच एका सुटीत जबरदस्ती शिवण शिकायला  पाठवलं होतं. त्यातली क्रियेटिविटी कळल्यावर मला खूप  आवडायला लागलं . इथल्या लायब्ररीत ड्रेस डिझाइनिंग   आणि स्मॉकिंगवरची पुस्तकं मिळाली. आता मन खरोखर  रमायला लागलं होतं. शिवाय फ़ावल्या वेळात फ़्री इंटरनेट मिळायचं वापरायला. मग थोडं नेट सर्फ़िंग आणि घरी मेल  टाकायचं काम सहज व्हायचं . 

आणखीन एक मजेदार गोष्ट सापडली त्या घरात. दर  बुधवारी; गुरुवारच्या ऑफ़र्स सांगणारी पत्रकं (फ़्लायर्स)  घरी येऊन पडायचे. त्यात खऱ्या खोट्या दागिन्यांचे  कॅटलॉग्ज असायचे. ज्वेलरी डिझाइनिग आणि त्यांचे इतके  उत्तमोत्तम नमुने मी आयुष्यात पहिल्यांदा पहात होते. दागिने  विकत घ्यावे असा मोह नव्हता, पण त्या नक्षीची नजाकत  खूप वेगळी होती. पारंपारिक भारतीय दागिन्यांपेक्षा फ़ारच  वेगळी. 

विकान्ताला मात्र भटकायचं तर असायचं पण आम्ही निघेपर्यंत दुकानं बंद व्हायला यायची शनिवारची. जेऊन खाऊन आरामात बाहेर पडू असलं नाही. बहुधा कोणाकडे  तरी गेट टुगेदर असायचं . अगदी रविवारी सकाळी पण फ़ोन यायचा, दहा जणांपुरतं काही तरी करुन घेउन ये.  द.....हा...! दोघांचं करताना मारामारी. 

मे महिन्यात थंडी कमी, दिवस मोठा व्हायला लागला.  चालत फ़िरल्याने अगदी गल्ली बोळं पण माहित होतात.  हाच अनभुव पुढे कॅलिफ़ोर्नियात देखील कामी आला.  मग आमचा किंग्ज क्रॉसला दौरा ठरला. थोडंफ़ार व्हीटी  स्टेशनसारखंच वाटत होतं ते स्टेशन. इथे घराघरांवर  गुलाबच गुलाब फ़ु ललेले दिसायला लागले होते. सेंट जेम्स  पार्क,बकिंगहॅम पॅलेस इथे तर काय विचारुच नका. सगळा  रंगगंधाचा उत्सव होता. नजर पोहोचेल तिथपर्यंत रंगीबेरंगी  ट्युलिप्स फ़ुललेले होते. वसंत ऋतूचं कौतुक पहावं तर  इथे. कुठे त्या महिनाभरापूर्वीच्या काटक्या आणि कुठे हा  बहर....! आयुष्यात पहिल्यांदा वाटलं “मला एक डिजिटल  कॅमेरा नितांत गरजेचा आहे.” सोबत फ़िल्म कॅमेरा होता,  पण त्याने म्हणजे अचूक काढायला हवा फ़ोटो. त्यामानाने  नायगारा फ़ॉल्सला गेलो साधारण पाचेक वर्षांनी तेव्हा डिजिटल कॅ मेरे अगदी सर्रास लोकांकडे दिसायला लागले  होते. कॅ मेऱ्याचा क्लिकक्लिकाट असा नवीन शब्द रुजू  करावा इतके जास्त.

दुसऱ्या ट्रिपला ‘टॉवर ऑफ़ लं डन’ला गेलो.अंतू बर्वा आठवला. तो कोहिनूर पहायचाच होता आम्हाला या जन्मी तो पाहिला एकत्र. तो पाहून वॅक्स म्युझियम , लंडन ब्रिज  सगळे फ़िरलो. एक हॉरर शो पाहिला . ती मेकअप करुन भयंकर दिसणारी माणसं ...! जाम घाबरले होते.  इतकं सगळं होतंय तोपर्यंत संपली ना सुट्टी...! भारतात  परतल्यावर घरी पोचेस्तोवर घामाच्या धारा लागल्या.  मायदेशी परतलोय याची पूर्ण खात्री पटली. ©श्रेया महाजन. ठाणे.

पूर्वप्रसिद्धी या सख्यानो या वसंत ऋतू विशेषांक मे २०१३












Monday, 14 July 2025

आधी प्रपंच करावा नेटका

 प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार माणसाचे आयुर्मान शंभर वर्षांचे आहे असे मानले जाते. ज्याचे चार आश्रमांत विभाजन केले आहे-ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास. यांपैकी 'गृहस्थधर्म' हा अतिशय महत्त्वाचा , चार आश्रमांपैकी तिघांना आधारभूत ठरणारा आहे असे मानले जाते.

एक सुंदर चरित्र वाचत असताना  'धन्यो गृहस्थाश्रम:|'  ही उक्ती किती सार्थ आहे याची जाणीव झाली. 'फ्रैंक गिल्ब्रेथ ज्युनियर' आणि 'अर्नेस्टीन गिल्ब्रेथ कॅरी' या बहीण-भावंडांनी लिहिलेले त्यांच्या मातापित्यांचे चरित्र हाती आले. 'चीपर बाय द डझन' या नावाने १९४८ साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.  हे पुस्तक आणि यावर आधारित चलच्चित्रपट दोन्ही रसिकांच्या पसंतीस उतरले असे कळले.


जगाच्या दृष्टीने या लेखकद्वयीचे  वडिल 'फ्रँक बी. गिलब्रेथ' म्हणजे 'वेळ आणि हालचाली यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास' करणारे संशोधक.किमान हालचालीत वा श्रमात कमाल काम कसे करता येईल, त्याद्वारे कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल या विषयावर (टाईम अ‍ॅन्ड मोशन स्टडीज) त्यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. आई 'लिलियन' ही मुळात मानसशास्त्राची पदवीधर. परंतु विवाहानंतर तिनेही या संशोधनासाठी संपूर्ण योगदान दिले. अशा अनुरूप जोडप्याचा संसार काही वेगळाच असेल असा विचार आपल्या मनात येतो.चरित्राच्या शीर्षकात 'डझनाच्या भावाने स्वस्त' असा उल्लेख केला आहे, ती त्यांची स्वतःची १२ मुले, हे कळल्यावर संसाराचे वेगळेपण चांगलेच लक्षात येते. अगदी अचूक सांगायचे तर मुलांची अतिशय आवड असल्याने या जोडप्याने जन्माला घातलेले ६ मुलगे आणि तितक्याच मुली...! स्वतःचे संशोधनाचे काम, त्यासंदर्भात द्यायची व्याख्याने आणि इतर कामे सांभाळून हा संसारशकट या दंपतीने किती कार्यक्षमतेने चालविला याचे चित्रमय शैलीतील वर्णन म्हणजे हे चरित्र.

स्वतः गिल्ब्रेथ महाशय वेळेची बचत करण्यासाठी अनेक युक्त्या करत. उदाहरणार्थ दाढी करणे हे रोजचे काम...यातला वेळ वाचावा यासाठी ते दोन ब्रश वापरत म्हणजे साबण लावण्याचा वेळ १७ सेकंदांनी कमी होत असे. कपड्यांची बटणे खालून वर लावत गेले तर ४ सेकंद कमी लागत. अशा अनेक छोट्या गोष्टींमधे वेळेची बचत करत. हल्लीच न्यूरोबिक्स नावाच्या नवीन व्यायामप्रकाराबद्दल वाचले. एखादी दैनंदिन क्रिया अगदी वेगळ्या प्रकारे केली उदाहरणार्थ जिथे उजवा हात वापरायचा ते काम डाव्या हाताने केले तर मेंदूतील काही वेगळ्या पेशी उत्तेजित होतात आणि मेंदूला उत्तम व्यायाम मि़ळतो. कदाचित अजाणता याचा सराव गिलब्रेथ महाशयांकडून झाला असावा. अर्थात यातून काही अपघातही होत, जे ते स्वतः मोकळ्या मनाने, आपल्या विनोदी शैलीत मुलांना कथन करत. एकदा दोन वस्तर्‍यांनी दाढी करून वेळ वाचवावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. मग तसा प्रयोग करून झाल्यावर त्यांनी मुलांना सांगितले-- "यात माझे ४४ सेकंद वाचले पण दाढी करताना मानेला जी दुखापत झाली , त्याला मलमपट्टी करण्यात दोन मिनिटे फुकट गेली."  आयुष्यातला क्षण न् क्षण अर्थपूर्ण जगावा असे वाटणारी ही व्यक्ती असली पाहिजे.

संपूर्ण घरावर त्यांची हुकुमत जबरदस्त असावी. ते एक विशिष्ट प्रकारची शिट्टी वाजवत,जी ऐकल्यावर त्यांची मुले घराच्या कानाकोपर्‍यातून दिवाणखान्यात येत. या शिटीचा अर्थ 'हातात असेल ते काम टाका आणि ताबडतोब या' असा या घरापुरता होता. शिटी वाजवून वडील स्टॉपवॉच लावत. किमान आठ सेकंद ते कमाल चौदा सेकंद एवढ्या वेळात सगळे सदस्य जमा होत. तिथे पोहोचल्यावर या 'समन्स'चा अर्थ समजायचा. वडील परगावाहून आले असतील तर कधी खाऊ वा खेळणी मिळायची. कधी एखाद्या मुलाने कुठे शाई सांडली असेल काही उद्योग केला असेल तर दमही मिळायचा. किंवा वडिलांच्या नव्या कल्पनेचे पहिले वहिले श्रोते म्हणून मुलांना पाचारण केले जाई. या लष्करी शिस्तीचा फायदा या कुटुंबाला जाणवला जेव्हा घराच्या एका भागाला आग लागली. मंडळींनी घर मोजून चौदा सेकंदात रिकामे केले. या पार्श्वभूमीवर आमच्या घरांमधुन असलेली 'एक आणि दोन बाळे' त्यांना मारलेल्या 'चार चार' हाकांना 'ओ' देखील देण्याचे कष्ट घेत नाहीत. या दोन घटनांमधला विरोधाभास चांगलाच जाणवणारा आहे.


अगदी साध्या बोली भाषेतील हे निवेदन आहे. कुठे शब्दांचे फुलोरे नाहीत की अलंकारांची पखरण नाही. आपल्या मनस्वी वडिलांचे आणि त्यांच्या प्रत्येक कामात सहाय्य करणार्‍या  वेळप्रसंगी मुलांची बाजू घेणार्‍या, त्यांची मनस्विता, प्रयोगशीलता जर अतिरेकाकडे झुकत असेल तर त्यांना थांबविणार्‍या आईचे स्वभावचित्रण ठाशीवपणे अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून आरेखिले आहे. या पतिपत्नीचे  नाते 'समुद्र' आणि त्याला मर्यादा घालणारा 'किनारा' यांसारखे आहे. 'किनारा' याला संस्कृत मधे एक सुंदर शब्द आहे 'वेला' ..! हा शब्द स्त्रीलिंगी आहे. समुद्ररूप  पुरुषाच्या  साहसीवृत्तीला  मर्यादा घालायला  'वेला' स्त्रीच हवी. तशाच या सौ. गिलब्रेथ प्रत्येक प्रसंगात पतिसोबत असलेल्या दिसतात. तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये  हरवून  नाही बसलेल्या!   'कान्तासंमित उपदेश'  म्हणजे  पत्नीने हळुवारपणे केलेला उपदेश, जो सर्वात  प्रभावी  ठरतो  असे मानतात..या चरित्रात याची उदाहरणे ठायी ठायी  विखुरलेली दिसतात. सोबतीने भावंडांच्या व्यक्तिरेखाही साकार होतात.  थोडीशी मस्तिखोर, खट्याळ कधीकधी बंडखोर अशी ही भावंडे आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, अंतरंगी नाना कळा पण प्रेमाच्या रेशमी  धाग्यांनी सार्‍या कुटुंबाला घट्ट बांधून ठेवले आहे.

आजच्या काळात सुशिक्षित पालकांना एक मूल नीट वाढवायचे म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे असा अनुभव येतो. मग डझनभर वाढवायची असतील तर? ती मोठी होतील तशी होऊ देणे , फारसे लक्ष न देणे हा सोपा उपाय. जर हा पटत नसेल तर एखाद्या मोठ्या उद्योगसमूहाचे व्यवस्थापन करावे त्याप्रमाणे घराचे व्यवस्थापन करावे लागेल. मुलांच्या स्वच्छतेच्या सवयी, त्यांचे आरोग्य, गृहपाठ यांसारख्या मूलभूत बाबींकडे लक्ष देणे याद्वारे शक्य होईल.एखादा उत्तम प्राचार्य वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नियोजनाचा भाग म्हणून सगळ्या वर्गांची वेळापत्रके आपल्या टेबलवर किंवा नजरेसमोर असतील अशी काळजी घेईल. ज्यामुळे महाविद्यालयातील अध्यापनकार्याचे  नीट व्यवस्थापन होऊ शकेल.  असाच प्रयोग गिलब्रेथ महाशयांनी त्यांच्या घरात केला. घरातील मुलांची संख्या जसजशी वाढू लागली तसा वडिलांनी एक मोठा तक्ता तयार केला. मुलाला स्वतःचे नांव  लिहावयास येते असे लक्षात आले की त्याने त्या तक्त्यावर नोंदी करायच्या. दररोज सकाळचे व्यवहार उरकले की, गृहपाठ झाला की, रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे आवरले की स्वतःचे नांव लिहायचे आणि स्वत:च्या वजनाची नोंद करून आलेखावर बिंदू निर्दिष्ट करायचा.  असा महिनाभराचा तक्ता नजरेखालून घातला तर प्रत्येक मुलाच्या वाढीचा, दैनंदिन नियमिततेचा अंदाज येणे सहज शक्य होईल. जी अगदी छोटी मुले असतील त्या प्रत्येकाच्या नोंदी करायची जबाबदारी एकेका मोठ्या भावंडाने घ्यायची. प्रथम हे वाचल्याक्षणी मनात येते ...."अहो, इकडे मुले रहातात का बालकामगार?"  परंतु थोडा शांतपणे विचार केला तर जाणवते की या घराला शिस्त असणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर सगळ्यांचे करता करता त्या माऊलीचे काय हाल होतील? बरे, दुर्लक्ष करावे, तर एक मूल एखाद्या कारणाने आजारी पडले की बाकीच्यांना संसर्ग होणे सहज शक्य आहे. जुळ्यांच्या आई बाबांना या परिस्थितीची चटकन कल्पना येईल. हे गिलब्रेथ माता-पिता स्वतः उच्चशिक्षित, त्यांना कमी खर्चात, कमी कष्टात, कमी वेळात आपल्या मुलांना सुशिक्षित, सुसंस्कारित करायचे असावे. त्यासाठी पिता गिलब्रेथ यांनी ज्या अनेक क्लृप्त्या अंमलात आणल्या त्यांचे उत्तम वर्णन लेखकद्वयीने केले आहे.

श्रमप्रतिष्ठा हे मूल्य घर, शाळा, समुदाय अशा वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्था (सोशल सिस्टिम्स) कार्यरत ठेवण्यासाठी खूप मोलाचे आहे. काम कोणतेही असो ते हलके वा महत्त्वाचे नसते. ते कोणत्या दर्जाचे केले हे महत्त्वाचे. मला वाटते या मूल्याची रुजवणूक गिलब्रेथ कुटुंबात फार चांगल्या प्रकारे झाली. घरातील प्रत्येक कामात प्रत्येकाने आपला वाटा तर उचलायचाच पण घराचे कुंपण वा सज्जा रंगविणे इत्यादी जास्तीच्या कामांचा लिलाव व्हायचा. कमीत कमी मूल्य घेऊन जो काम करावयास तयार होईल त्याला कंत्राट मिळायचे आणि त्याने ते काम केले की त्याच्या हातखर्चाला त्याला हे जास्तीचे पैसे मिळत. एखादा उद्योगधंदा सुरु करतानाचा उमेदवारीचा कालखंड किंवा प्रशिक्षण कालावधी असावा त्याप्रमाणे या घराचे वातावरण आहे असे वाटते.

अनेक शेजार्‍यापाजार्‍यांना , परिचितांना शंका येत असे की या आई-बापांना स्वतःची मुले तरी ओळखता येतात की नाही कोण जाणे!  यासंदर्भात, गिलब्रेथ महाशय एक प्रसंग रंगवून सांगत--त्यांच्या पत्नी व्याख्यान द्यायला गेल्या असताना सगळी बच्चे कंपनी एकदा त्यांच्या ताब्यात होती. घरी आल्यावर अर्थातच आईने विचारले की मुलांनी वडिलांना त्रास तर नाही ना दिला? त्यावर ते उत्तरले-" बाकी सगळी शिस्तीत होती, एक ऐकत नव्हते, फटके दिल्यावर तेही सरळ झाले." सौ . गिलब्रेथ अवाक् झाल्या. कारण मस्ती करून मार खाणारे मूल शेजार्‍याचे होते. हा प्रसंग खराखुरा घडला की नाही कुणास ठाऊक? पण चौकशा करणार्‍यांचे असे किस्से ऐकून मनोरंजन होत असे. एकदा तर सारखे कपडे घातलेली ही मुले गाडीतून जाताना पाहून एकाने 'गणवेष घातलेली अनाथाश्रमातील असावीत बिचारी' असे उद्गार काढले. छोट्या मुलांची शाळेची सहल असेल तर शिक्षकांना किती काळजी असते एखादे हरविणार तर नाही ना?  मग अख्खे कुटुंब घेऊन कुठे बाहेर पडणे या कुटुंबप्रमुखासाठी किती कठिण असेल? पु. लं.च्या 'असा मी असामी' मधील पार्ल्याच्या मावशीचे घर शोधण्याचा प्रसंग आठवून पहा...अगदी स्पष्ट चित्र डोळ्यासमोर येते आणि सारखे कपडे घातलेली मुले म्हटल्यावर ‘वागळे की दुनिया’ नाही आठवली तरच नवल !

या कुटुंबातील मुलांच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यासाठी एक बाई या घरी नियमित येऊ लागल्या. चाचण्या घेणे राहिले बाजूला, " तुम्ही दररोज अंघोळ करता का? आठवड्यातून किती वेळा करता? आईने फटके दिले तर लागते का? "   इत्यादी अनेक प्रश्न त्या विचारू लागल्या. घरातील शिस्त तुम्हा मुलांना जाचक कशी ठरत नाही असा त्यांचा विचारण्याचा रोख असावा. मुलांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, मग सगळ्या गोष्टी विश्वासाने वडिलांच्या कानावर घातल्या आणि या तथाकथित समुपदेशक बाईंना पळवून लावले. अशा काही प्रसंगांत हे करारी वडिल ठामपणे मुलांच्या  पाठीशी उभे राहिलेले दिसतात. 

'ड्रिल मेथड' किंवा पद्धतशीर सरावपद्धती अवलंबिली तर कोणती कौशल्ये मुले अवगत करू शकतात याची मोठी जंत्री या पुस्तकात सापडेल. मोर्स कोड आणि त्याचे डिकोडिंग, स्पर्श पद्धतीने अचूक टंकलेखन, दोन अंकी संख्याचे तोंडी गुणाकार, वर्ग करण्याच्या पद्धती, फ्रेंच , जर्मन या परकीय भाषांमधे संभाषण करण्याइतके कौशल्य...! अशा अनेक कलांवर या मुलांनी प्रभुत्त्व मिळविले. या प्रसंगांची वर्णने मुळातूनच वाचायला हवी. वडिलांच्या अनेकविध प्रयोगांत मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. मोठ्या मुलांनी ज्या गोष्टी आत्मसात केल्या, त्याबद्द्ल तोंडी प्रश्न वा चर्चा ऐकून धाकटी पातीही तयार होऊ लागली, इतपत की एके दिवशी तीन वर्षे वयाच्या त्यांच्या मुलाने पंधराचा वर्ग किती याचे सहज उत्तर दिले. ८-९ वर्षे वयाची लेक उत्तम टंकलेखन करू लागली. असे सतत नवनवे बौद्धिक खाद्य ज्या घरात मुलांना पुरविले जात असेल ते घर किती चैतन्यमय असेल? मुलांचा वेळ जावा म्हणून सुटीतील शिबिरांना घालायची गरज नाही. शालेय अभ्यासक्रमाबरोबर अनेक विषयांची शिबिरे घरात सतत चाललेली  आणि त्यातला सहभाग अनिवार्य! न जाणो धाकटे भावंड कधी आपल्या पुढे निघून जाईल, पत्ताही नाही लागायचा. 

'मोठी माणसे शालेय शिक्षण संपले की शिकणे सोडून देतात, म्हणून छोट्यात छोट्या मुलाला शिकवावे.  त्याच्याकडून फार चांगला प्रतिसाद मिळतो' असे या गिलब्रेथ महाशयांचे मत होते. स्वतःच्या संशोधनावर, कुटुंबावर एवढे भरभरून आयुष्य उधळणारी, मनस्वीपणे जगणारी माणसे विरळा. अशा कर्मयोग्यांना नेटका प्रपंच करता करता परमार्थ आपोआप साध्य होतो. अशा व्यक्ती 'श्रेयस्' आणि 'प्रेयस्' च्या पारंपरिक कल्पनांना व्यापूनही दशांगुळे उरतात.

श्रेया श्रीधर महाजन. ऑगस्ट २००८ 


श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...