Tuesday, 15 July 2025

एका पुनर्जन्माची कथा


 तरुण वयात आपल्याला कोणी हात पाहून भविष्य  सांगितलं की लवकरच तुझ्या नशिबात गंडांतर योग संभवतो तर आपला विश्वास बसणार नाही . किंवा दुसरी प्रतिक्रिया आपण खूप घाबरून जाऊ की मला काय होणार ? आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक कोणते संकट येऊ घातले आहे ? 


एकूणच एखादा व्यवसाय वा नोकरी करीत असताना आणि त्यात स्थिर- स्थावर होत असताना आपण प्रचंड कामात असतो . घराकडे, नातेवाईक, मित्र यांच्याकडे पाहायला फुरसत नसते . एखादा छंद असेल तर त्यासाठी वेळ काढायचा प्रयत्न करतो माणूस . एकूण उमेदीची वर्ष ही फार धावपळीची असतात . या वेळी आजारी पडणे परवडणारे नसते खरे तर . 


त्यातून आजारपण आलेच तर सुरुवातीला ते नाकारण्याचा प्रयत्न होतो, लक्षणे अगदी नजरेआड होत नसतील तर हळूहळू स्वीकार, मग उपाय योजना यांचा विचार होतो. अगदी कागदावर आजाराच स्वरूप साधारण कसं आहे हे आपल्याला माहीत असले तरीदेखील प्रत्येक दिवस हा नव्या हिमतीने जगावा लागतो . नवनवी आह्वाने रोज समोर उभी असतात . आजार बळावत असतो नि रुग्ण जवळ जवळ निराश होत चाललेला असतो . हा रोग माझा बळी घेऊनच थांबेल का असा प्रश्न येतो . अशा वेळी तुमचं आवडतं काम तुम्ही चालू ठेवू शकलात तर मन रमतं . किंबहुना आजाराचा विसर पडतो. अशा वेळी नातेवाईक मित्र सहचर यांची भूमिका खूप महत्त्वाची असते . 


सध्या एक  पुस्तक वाचते आहे. ‘एका पुनर्जन्माची कथा - डॉ. मनोज भाटवडेकर’  बऱ्याच वर्षांनी अस झालं की दिवसभरात जवळ जवळ पुस्तकं वाचून पूर्ण होत आलं. अजिबात सोडवत नाहीये.

डॉ मनोज भाटवडेकर स्वतः एक मानसोपचार तज्ञ! पत्नी बालरोगतज्ञ. तरुण दंपतीच आयुष्य छान चालू होतं. दोघांचा प्रॅक्टिस मध्ये चांगला जम बसत होता अशा वेळी डॉ . मनोज यांना Rheumatic Arthritis या आजाराची सुरुवात झाली, अतिशय थोड्या कालावधीत दुखणे विकोपाला जाऊ लागले. त्यात देखील स्वत:ची जमेल तितकी काळजी घेऊन काम देखील चालू ठेवले. स्वतः डॉकटर असल्याने चटकन मदत मात्र मिळत होती. यशवंत देव यांच्याकडे गाणे देखील शिकत होते. त्यांच्याबरोबर एका ध्यान शिबिराला जाण्याचा योग आला आणि त्याने त्यांच्या दुखण्याची दिशा आणि पर्यायाने आयुष्याची दिशा बदलली . हे सगळे मुळातून वाचण्यासारखे आहे.

सुरुवातीला पुस्तकं वाचताना घडणाऱ्या घटना एखाद्या रोलर कोस्टर राईड सारख्या वेगाने घडतात. त्यात कोणीही माणूस ढेपाळला असता. अफाट सहन शकती असावी या माणसाकडे. त्याशिवाय हे शक्य नव्हते. आपल्याच डॉकटर मित्रांनी कधी कधी आजाराचे स्वरूप स्पष्ट करताना इतके कोरडे रिमार्क मारले की मन देखील दुखावले. पण यातून हे जोडपे बाहेर पडले आणि आज अनेक पेशंट ना आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करीत आहेत. जरूर वाचावे असे पुस्तक © श्रेया श्रीधर महाजन. ऑक्टोबर २०२३ 


No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...