परवा एका मैत्रिणीने लिहिलं होतं दसरा आणि गुढीपाडव्याला पुऱ्या तळायला लागलं की मला कसंसच व्हायला लागतं. म्हणजे यानंतर आपल्याला परीक्षेची तयारी करायचीय असं काहीसं वाटायला लागतं. किती अचूक पकडलंय ना....! आपल्याकडे दोन्ही सणांच्या आसपास परीक्षा असतातच. आणि युनिवर्सिटीच्या परीक्षा तर अगदी ऐन उन्हाळ्यात. मी पण अशाच मनोवृत्तीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे एप्रिल- मे हा एक तर अभ्यासाचा, नाही तर फ़ावल्या वेळात काही तरी शिकण्याचा, थोडा पॉकेटमनी कमावण्यासाठी ‘व्हेकेशन बॅच’ घेण्याचा काळ असं माझं मत होतं.
लहानपणी आई वडिलांबरोबर कधी बाहेरगावी गेली असेन एक दोन वेळा तेवढेच. पण कुठेही गेलं तरी लाईट- पाण्याचा त्रास पाहून आम्ही मुलांनी घरात डिक्लेअर केलं होतं...सुटी इथेच काढायचीये आम्हाला. जास्तीत जास्तं पुणा नाहीतर नगर. यापलीकडे जायचं नाही.
कालांतराने लग्न झालं नि वर्षा- दोन वर्षात अहो युरोपात गेले दौऱ्यावर. दुनियाभरचे नखरे करत मी त्याला जॉइन झाले चारेक महिन्यानी. या वर्षीची सुटी कल्पनेने पण छान वाटत होती. कॉलेजला सुटी लागायच्या आतच पळाले तिकडे. पहिला परदेशप्रवास, तोपण सार्स आणि कसले कसले तमाम साथीचे आजार असताना. फ़्लाइट मध्ये ‘हिट’ मारावं तसले औषधी फ़वारे मारले गेले. खरं तर प्रवास खूप सोपा होता, कुठे फ़्लाईट बदलायचं नाही की काही नाही. एकदा घरच्यांनी इथे विमानात बसवलं की तिकडे नवरा घ्यायला येणार. पण माझा स्वभाव पडला वेंधळा. त्यात मला कुठेही बसल्या बसल्या झोप लागू शकते. मध्यरात्री फ़्लाइट. गेले कित्येक दिवस तयारीसाठी धावपळ चाललेली. खूप प्रयत्नांनी जागी राहिले. तिकडे गेल्यावर वाचायला दोन तीन मराठी पुस्तकं घेतली होती, त्यातलं एक विमानाची वाट पहाता पहाता संपलं पण. आणि...पोहोचले बुवा एकदाची हिथ्रो विमानतळावर.
त्याकाळी हाताशी इतके सहज मोबाइल नसायचे. नवऱ्याचा पत्ता, फ़ोन नं घेतला होता. पण तो दिसल्यावर जाम बरं वाटलं . रस्त्यात मात्र काट्या कुट्यांनी, काटक्यांनी बनलेली, थिजलेली झाडं पाहिली आणि वाईट वाटलं . दिवसा पण प्रचं ड थंडी वाजत होती एप्रिल महिन्यात. हळूहळू कळलं ही बरी परिस्थिती आहे. स्नो ओसरलाय.
तिथल्या घरी तर पोहोचलो. ब्रह्मचाऱ्याची मठी असते, तसे काहीसे घर होते. हरकत नाही. नवऱ्याच्या ताब्यात बेसन लाडू , बाकरवड्या आणि शेंगदाणा भजी ठेवल्यावर त्याचा चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागला. ‘चहा करु’ असा विचार केला तर कसचं काय? घरात दूध नाही. संस्कृतातल्या रागाची (अनुराग) जागा मराठीतल्या रागाने घेतली. बाहेर पडून आणावं तर पुणेकरांच्या वरताण मं डळी. तिथे दुकानं दुपारी चार वाजता बंद होत शनिवारी, रविवारी . इतर दिवशी पाच आणि फ़क्त गुरुवारी सं ध्याकाळी ७ वाजता. माझा विश्वास बसेना. सुदैवाने तो दिवस कसाबसा काढला आणि दुसऱ्या दिवशी टेस्को, एसडा असली दुकानं पालथी घातली. सगळी खरेदी चालत जाऊन करायची. प्रचंड वजन झालं तर कॅब म्हणजे टॅक्सी. दधाचे तांबे उचलून आणायचे आणि सगळ्यात कहर दररोज ताजं दूध आणायचं नाही. हे भयंकर वाईट्ट. शिळ्या दधाचा चहा प्यायला तरी पुन्हा ताज्या दधाचा चहा करून पिणाऱ्या अट्टल चहाबाजाला अशीच शिक्षा हवी...हाहाहा....!
सुदैवाने त्या दिवशी एका मॅनेजरच्या घरी जेवायला आमंत्रण होतं त्यामुळे स्वयंपाक टळला. मग लक्षात आलं हे प्रकार आपल्याला पण करायला हवे. हे कठीण आहे. म्हणजे जेवायला काय घालू? पण तिकडे एक छान गोष्टं कळली. पुढच्या महिन्यात ते कु टुंब एमस्टरडॅमला चालले होते. त्ट्युलिप्सच्या बागा बघायला. तमाम मंडळीनी मला फ़क्त सिलसिला चित्रपटात तिथलं शूटिग घेतलंय असं सांगितलं . एक दोन आठवडे गेले एप्रिलचे. चालत फ़िरत हिडता येईल एवढं पिटरबरो ओळखीचं झालं होतं आणि लायब्ररी कार्ड ताब्यात आलं होतं. तिथल्या लायब्ररीत कॅलिग्राफ़ीवरची जेवढी पुस्तकं पाहिली, वाचली तेवढी कधीच नाही मिळाली.
मला आईने अशाच एका सुटीत जबरदस्ती शिवण शिकायला पाठवलं होतं. त्यातली क्रियेटिविटी कळल्यावर मला खूप आवडायला लागलं . इथल्या लायब्ररीत ड्रेस डिझाइनिंग आणि स्मॉकिंगवरची पुस्तकं मिळाली. आता मन खरोखर रमायला लागलं होतं. शिवाय फ़ावल्या वेळात फ़्री इंटरनेट मिळायचं वापरायला. मग थोडं नेट सर्फ़िंग आणि घरी मेल टाकायचं काम सहज व्हायचं .
आणखीन एक मजेदार गोष्ट सापडली त्या घरात. दर बुधवारी; गुरुवारच्या ऑफ़र्स सांगणारी पत्रकं (फ़्लायर्स) घरी येऊन पडायचे. त्यात खऱ्या खोट्या दागिन्यांचे कॅटलॉग्ज असायचे. ज्वेलरी डिझाइनिग आणि त्यांचे इतके उत्तमोत्तम नमुने मी आयुष्यात पहिल्यांदा पहात होते. दागिने विकत घ्यावे असा मोह नव्हता, पण त्या नक्षीची नजाकत खूप वेगळी होती. पारंपारिक भारतीय दागिन्यांपेक्षा फ़ारच वेगळी.
विकान्ताला मात्र भटकायचं तर असायचं पण आम्ही निघेपर्यंत दुकानं बंद व्हायला यायची शनिवारची. जेऊन खाऊन आरामात बाहेर पडू असलं नाही. बहुधा कोणाकडे तरी गेट टुगेदर असायचं . अगदी रविवारी सकाळी पण फ़ोन यायचा, दहा जणांपुरतं काही तरी करुन घेउन ये. द.....हा...! दोघांचं करताना मारामारी.
मे महिन्यात थंडी कमी, दिवस मोठा व्हायला लागला. चालत फ़िरल्याने अगदी गल्ली बोळं पण माहित होतात. हाच अनभुव पुढे कॅलिफ़ोर्नियात देखील कामी आला. मग आमचा किंग्ज क्रॉसला दौरा ठरला. थोडंफ़ार व्हीटी स्टेशनसारखंच वाटत होतं ते स्टेशन. इथे घराघरांवर गुलाबच गुलाब फ़ु ललेले दिसायला लागले होते. सेंट जेम्स पार्क,बकिंगहॅम पॅलेस इथे तर काय विचारुच नका. सगळा रंगगंधाचा उत्सव होता. नजर पोहोचेल तिथपर्यंत रंगीबेरंगी ट्युलिप्स फ़ुललेले होते. वसंत ऋतूचं कौतुक पहावं तर इथे. कुठे त्या महिनाभरापूर्वीच्या काटक्या आणि कुठे हा बहर....! आयुष्यात पहिल्यांदा वाटलं “मला एक डिजिटल कॅमेरा नितांत गरजेचा आहे.” सोबत फ़िल्म कॅमेरा होता, पण त्याने म्हणजे अचूक काढायला हवा फ़ोटो. त्यामानाने नायगारा फ़ॉल्सला गेलो साधारण पाचेक वर्षांनी तेव्हा डिजिटल कॅ मेरे अगदी सर्रास लोकांकडे दिसायला लागले होते. कॅ मेऱ्याचा क्लिकक्लिकाट असा नवीन शब्द रुजू करावा इतके जास्त.
दुसऱ्या ट्रिपला ‘टॉवर ऑफ़ लं डन’ला गेलो.अंतू बर्वा आठवला. तो कोहिनूर पहायचाच होता आम्हाला या जन्मी तो पाहिला एकत्र. तो पाहून वॅक्स म्युझियम , लंडन ब्रिज सगळे फ़िरलो. एक हॉरर शो पाहिला . ती मेकअप करुन भयंकर दिसणारी माणसं ...! जाम घाबरले होते. इतकं सगळं होतंय तोपर्यंत संपली ना सुट्टी...! भारतात परतल्यावर घरी पोचेस्तोवर घामाच्या धारा लागल्या. मायदेशी परतलोय याची पूर्ण खात्री पटली. ©श्रेया महाजन. ठाणे.
पूर्वप्रसिद्धी या सख्यानो या वसंत ऋतू विशेषांक मे २०१३
No comments:
Post a Comment