Saturday, 29 July 2023

जगले जशी - लालन सारंग



आमच्या लहानपणी लालन सारंग- कमलाकर सारंग , सई परांजपे - अरुण जोगळेकर , सुलभा आणि अरविन्द देशपांडे , पु लं आणि सुनीताबाई, किशोर प्रधान - शोभा प्रधान, नीना व दिलीप कुलकर्णी ही मंडळी नेहमी टी व्ही वर दिसायची . नाटक चित्रपट क्षेत्रात मुक्त संचार करणारी खऱ्या अर्थाने सृजनशील अशी जोडपी होती. गजरा , प्रतिभा- प्रतिमा, मुखवटे आणि चेहरे अशा कार्यक्रमात त्यांनी इतक्या वेळा हसवलं  रडवलं;  काही विचारू नका . पुढे ही यादी अगदी विजय कदम - पद्मश्री जोशी , अशोक सराफ - निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे - रुही बेर्डे यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. या सगळ्या मंडळींनी बालपण आणि तरुण वयात आम्हाला भरभरून निखळ करमणूक दिली. अगदी 'पाणी टंचाई ' वरचा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गजरा अजून आठवतो. मात्र या तारे तारकाना कोणत्या दिव्यातून जावे लागत असेल याची फार कल्पना त्या काळात नव्हती. काही तारका देखील अतिशय प्रकाशमान होत्या. यात नेहमी नाव आठवते त्या सात्विक चेहऱ्याच्या सुहास जोशी, अगदी लाडकी 'ती ' फुलराणी भक्ती बर्वे, आणि बातम्या वाचता वाचता देखणे चित्रपट निर्माण करण्यापर्यंत पोहोचलेली स्मिता तळवलकर! 


 

सध्या सगळीकडे 'बाईपण भारी देवा ' चित्रपट गाजतो आहे. प्रमोशनच्या निमित्ताने वंदना गुप्ते यांना पाहण्याचा ऐकण्याचा योग आला. आणि असं वाटलं बाईने सत्तरीला हे असं इतकं बिनधास्त असावं. नाचावं, गावं. किंबहुना या अश्या मोकळ्या आणि स्पष्टवक्त्या आहेत म्हणूनच नाटक चित्रपट अशा अस्थिर क्षेत्रात टिकू शकल्या. 




अशाच एका अभिनेत्रीचे आत्मचरित्र वाचते आहे ज्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक प्रायोगिक,  व्यावसायिक  नाटकात भूमिका केल्या आणि त्या विवादास्पद ठरल्या तरी न घाबरता दोघे नवरा बायको ठामपणे उभे राहिले. 'लालन सारंग ' हे नाव ऐकल्यावर प्रथम आठवते ते त्यांचे रुपयाएवढे मोठे कुंकू, अगदी शांत पण ठाम स्वर आणि बोलके डोळे. 'जगले जशी ' हे त्यांचं प्रांजळ आत्मकथन फार आवडलं. किंबहुना 'मी आणि माझ्या भूमिका ' नावाचा एकपात्री प्रयोग त्या करीत असत, त्यातील बराचसा भाग वापरून हे पुस्तक केले असे त्या म्हणतात. मात्र पुस्तकाचा ओघ पाहता ह्यात पुष्कळ नवे लिखाण समाविष्ट केले असावे.


खरे तर पुस्तक वाचत असताना धक्क्यावर धक्के बसतात. पूर्वी वर्तमानपत्रात 'जंगली कबूतर ' नावाच्या नाटकाची जाहिरात पाहिली होती. आणि अशा भूमिका करू शकणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून लालन सारंग माहीत होत्या. थोडे मोठे झाल्यावर कळले कॉलगर्लच्या आयुष्यावर आधारित हे नाटक होते. विजय तेंडुलकरांच्या नाटकाचे विषय अगदी वेगळे आणि त्यानिमित्ताने त्यांनी रंगवलेले मनोव्यापार अद्भुत. ते प्रत्यक्ष रंगमंचावर आणणे, श्लील अश्लिलतेच्या मर्यादा सांभाळून स्टेजवर दाखवणे हे खरोखर कौशल्याचे काम. दिग्दर्शक म्हणून कमलाकर सारंग यांचे कसब आणि कलाकारांचे तर आहेतच अभिनय गुण. सखाराम बाईंडर, त्यावर झालेल्या केस हे तर सर्वज्ञात आहे. 



पुस्तक वाचताना कलाकारांच जीवन, विशेषत: गावोगावी नाटकाचे दौरे असताना किती धकाधकीचं होतं हे जाणवतं. अनेकदा कलाकार कार्यक्रमांना उशीरा येतात त्यांचं कारण त्यांचं बिझी शेड्युल ! पण ते किती बिझी याची जाणीव पुस्तक वाचताना येते. पुण्याचा दुपारचा प्रयोग करून संध्याकाळी सातला मुंबईला कार्यक्रम ! मला विचाराने सुद्धा धडकी भरली. शारीरिक, मानसिक क्षमता आणि उर्जा किती अफाट असेल आणि व्यक्तिरेखा रंगविण्याची उर्मी किती जोरदार असेल याची कल्पना येते. 


दौऱ्यावर असताना सहकलाकार आजारी पडणे, मृत पावणे, कधीकधी आपल्याला काम करताना शारीरिक दुखापत होणे, रंगमंच व्यवस्था करताना थोडा जरी हलगर्जीपणा झाला असेल तर ऐनवेळी किती पंचाईत होत असेल आणि सहकलाकार कसे सांभाळून घेतात याचे किस्से तर प्रत्येक रंगमंचीय कलाकाराकडे असावेत. 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ' या उक्तीचा पुन्हा पुन्हा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. 


कलाकार आपल्या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष आयुष्यात जगू लागला तर ते किती त्रासाचे होईल. त्याचा अनुभव लेखिकेने रथचक्र या श्री ना पेंडसे लिखित नाटकाचे प्रयोग करताना घेतला. त्यांना स्वतःला देखील त्यांच्या खऱ्या मुलाच्या भविष्याची खूप काळजी वाटू लागली आणि आपण आपल्या करिअरच्या नादात मुलाला दुरावतो आहोत का अशी भीती वाटू लागली. 


त्यांना असाच विचार करायला भाग पाडले ते ' कमला ' या विजय तेंडुलकर लिखित नाटकाने. आपण गृहिणी असो किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रिया आपण नक्की स्वतंत्र आहोत का हा विचार त्यांच्या मनात यायला लागला तो सगळा भाग मुळातून वाचण्यासारखं आहे. १९९२ ला हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यावेळी त्यांना वाटलेली खंत, आजही आपण तिथेच आहोत असं वाटायला लागलं आहे. फार तर एखाद्या दिवशी जेवण मागवू एवढंच ! बाकी कुटुंबातली आपली भूमिका फार बदललेली नाही. 


काळाच्या मानाने ही माणसं फार पुढचा विचार करणारी होती, मग ते लिहिणारे विजय तेंडुलकर असोत वा प्रत्यक्षात आणणारे कलाकार !


एक वेगळीच जिद्द या बाईंमध्ये दिसते. 'करायचं म्हणजे करायचं ' या जिद्दीने त्यांनी गुजराती भाषा येत नसताना  थोडीफार शिकून गुजराती नाटकाचे देखील प्रयोग केले. रथचक्र ची पुढे दूरदर्शन मालिका झाली . ती पाहिल्याचे चांगले आठवते. त्यात लालन सारंग लक्षात राहिल्या त्याबरोबर सुचित्रा गुढेकर आताची बांदेकर देखील लक्षात राहिली. त्यानिमित्ताने भारतभर ही मराठी कादंबरी पोहोचली.


एक काश्मिरी साडीवाला त्यांच्या घरी नेहमी येत असे त्याबद्दलचा विनोदी किस्सा त्यांनी लिहिला आहे. त्याने सांगितले मी माझ्या आईला दाखवत होतो या ताईंना साड्या विकायला मी त्यांच्या घरी जातो. त्यावर आई म्हणाली, ' इसका मर्द बहुत खराब है अकेली को छोड के चला गया ' . त्याला आईला पटवून द्यायला लागलं नवरा चांगला आहे.  हे नाटक आहे नाटक!


हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले आपण दूरदर्शनवर कायम त्यांनी रंगवलेली चंपा, चंदा पाहत आलो पण खरेखुरे व्यक्तिमत्त्व आपल्याला कळलेच नव्हते.  विजय तेंडुलकर प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे शैलीला एक वेगळाच ओघ, एक सहजता , अकृत्रिम डौल आहे.जरूर वाचावे असे वाचनीय पुस्तक! © श्रेया श्रीधर महाजन. ३० जुलै २०२३




No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...