The Last Girl नावाचं पुस्तक वाचलं. हलवून टाकणारा अनुभव आहे. इराक मध्ये ISIS ने अनेक प्रदेशांचा ताबा घेतल्यावर त्या प्रदेशातल्या लोकांचे, विशेषत: मुलींचे जे हाल केले ते मुळातून जरूर वाचावे आणि खूप लिबरल मते असणाऱ्या आपल्या मुलामुलींना जरूर वाचायला द्यावे असे पुस्तक आहे.
लेखिका 'नादिया मुराद' अशीच एक दुर्भागी मुलगी . कोचो नावाच्या छोट्याशा गावातून आलेली. ISIS ने त्यांचं गाव काबीज केलं आणि याजदी धर्म मानणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांना एका शाळेत बोलावलं. पुरुषांना अक्षरशः एका लायनित उभे करून गोळ्या घातल्या. वृद्ध स्त्रियांना काय केलं हे कळलं नाही. तरुण मुलांना त्यांच्या सैन्यात भरती केलं आणि तरुण मुली त्यांच्यात भारी रस होता या मंडळींना. अक्षरशः एखाद्या खेळण्याशी खेळावं आणि फेकून द्यावं तशी अवस्था केली या मुलींची. काही अरबांना विकल्या. काही दहशतवादी लोकांनी विकत घेतल्या, थोडे दिवस वापरून, शब्दश: वापरून दुसऱ्या कोणाला विकल्या. काही मुलींनी हाताच्या नसा कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. काही मुली या लोकांच्या दहशतीखाली वावरल्या. पळून जायचा प्रयत्न केला तर शिक्षा फार भयंकर, चाबकाचे फटके आणि सामूहिक अत्याचार .
काही श्रीमंत लोकांना मारून किंवा पळवून लावून ती घरे ताब्यात घेतली होती. या आलिशान घरांचा वापर या कामासाठी, मुलींना ठेवण्यासाठी केला जात होता. गावंच्या गावं ओस पडलेली. मुलींना गुलामाची वागणूक, उपासमार, मारहाण, घरातले साफसफाई काम मागे लावणे आणि लैंगिक छळ, वेळी अवेळी मालक हकक सांगत असे, त्याच मन भरलं की विकून टाकायचा. प्रस्तुत लेखिका देखील असा छळ होत मालक बदलत जगत राहिली. एकदा मात्र नजर चुकवून तेथून पळाली, एका सुन्नी घराने तिला आश्रय दिला आणि कुर्दिस्तान मध्ये राहणाऱ्या भावाकडे पोहचवले. अविश्वसनीय अशी सुटका झाली तिची ! नंतर हळूहळू तिच्या काही बहिणी देखील सुटून आल्या. अर्थात या सगळ्यातून गेलेल्या स्त्रियांच्या मनावर पडलेले ओरखडे आणि कुटुंब हरवणे हे पुसून टाकण्यापलीकडचे आहे.
ह्या गोष्टी फार जुन्या नाहीत २०१४ मध्ये जेव्हा सगळीकडे internet, TV सगळे काही आले होते. कुठे होते मानवाधिकार वाली मंडळी?
शांतिदूतानी इलाका काबीज केल्यावर पोरीबाळींच्या अब्रूचे काय लचके तुटतात हे वाचताना काश्मीर मधला नरसंहार आठवतो. तिथून किमान काही लोक पलायन तरी करू शकले. यात राजकारणी गुंतागुंत असेल देखील. पण सामान्य माणूस वाईट पद्धतीने भरडला जातो. त्यांचा दोष काय केवळ ते शिया मुस्लिम नाहीत. त्यांनी त्यांच्या पाळलेल्या जीव लावलेल्या शेळ्या मेंढ्या जनावरे, शेती, घरे सगळे सोडून निघून जावे. सुरक्षित जागी पळून जाण्याचा प्रयत्न करताना मुलं, वृद्ध माणसे गेली तर ते तसेच सोडून जीवावर दगड ठेवून मध्यमवयीन लोकांना आसरा शोधावा लागतो यासारखे दुसरे दुर्दैव कुठले.
Earnest Hemingway यांची Old man at the bridge ही कथा आठवून जाते. जीव जात असला तरी मन आपल्या पाळीव प्राण्यांचे काय होईल याचा विचार करत रहाते आणि शरीर पुढे जायला असमर्थ ! असो युद्धस्य कथा रम्या . जे वाचतात ते होरपळलेल्या मनाने जगत रहातात.© श्रेया महाजन. ८ एप्रिल २०२३
No comments:
Post a Comment