गेल्या आठवड्यात ‘उंच माझा झोका’ मध्ये रमाबाईंना माधवराव ‘सूपशास्त्र’ नावाचे पुस्तक बक्षीस देतात असा प्रसंग दाखवला होता. खरंच अशी पुस्तके, आता तर ‘व्हिडिओ’ हाताशी असतात म्हणून माझ्यासारख्या लोकांचे निभावते.
लग्नापूर्वी मला ‘मॅगी’ आणि ‘चहा’ हे दोन आणि दोनच पदार्थ अचूक, चविष्ट, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय करता येत होते. लग्नानंतरची काही वर्षं भलतीच प्रयत्न-प्रमाद (ट्रायल ॲन्ड एरर) पद्धतीने स्वयंपाक करण्यात गेली. अमेरिकेत आल्यावर ठरवले आता तरी बरा स्वयंपाक शिकायला हवा. शिवाय आता आपण घरी आहोत तर घरकाम तरी यायला हवे. एक एक पदार्थ करणे मनोरंजक व्हायला लागले. मागे पसारा आवरायला आमच्या अक्का (कामवाल्या बाई) नव्हत्या. कधी कधी वाटायचे तिचा पण व्हिसा बनवून आपल्या सोबत आणायला हवे होते. अशीच अगदी मनापासून आठवण यायची मी ज्या कॉलेजात शिकवत असे तिथल्या चहा देणार्या कर्मचार्यांची. त्यांना सांगितले तर गम्मत वाटेल पण रोज दुपारी तीन वाजता चहा करताना मी नेहमी म्हणत असे---“सुरेश नाही येणारे चहा द्यायला. तुलाच उठून करायला हवा!”
असो, माझ्या स्वयंपाकाच्या उत्साहाचा असा पाउस...! त्यात एकदा आमचे ‘स्वत:’ म्हणाले , ‘चल पिझ्झा करुया घरी’ करुया तर करुया...! त्या पाकीटावर सांगितल्यानुसार आमच्या अहोंनी पीठ भिजवले. पण आमच्या एका पिझ्झा पॅनला इतकी मोठी भोकं होती आणि नवर्याने पीठ इतके फ़्री फ़्लो केले की ते गळायला लागले त्यातून.....:) इकडे (गॅस) ओव्हन का तापत नाहीये इतका वेळ म्हणत त्याने तो उघडला आणि काय सांगावे? ‘न भूतो न भविष्यति’ असा धूर यायला लागला. घरातला ‘कार्बन मोनॉक्साईड अलार्म’ वाजायला लागला. आता बाहेरचा दरवाजा उघडावा तर ‘फ़ायर अलार्म’ वाजायला लागेल आणि अडीचशे बिर्हाडातली मंडळी आग लागली म्हणून थंडीत घराबाहेर पडतील. मग ‘पॅटियो’ (गॅलरी) चा दरवाजा, खिडक्या उघडल्या. बाहेर ‘स्नो-फ़ॉल’ झालेला. आम्ही घरात कापतोय थंडीने...!
बरे ‘यत्र यत्र धूम: तत्र तत्र वह्नि:|’ या न्यायानुसार धूर आहे म्हणजे आग असलीच पाहिजे. ही आग लागली तरी कशाला याचा विचार केल्यावर कळले, भारतातून येताना निगुतीने टपरवेअरचे डबे आणले होते. घरात पेस्ट कंट्रोल झाले तेव्हा अगदी व्यवस्थित रहावे म्हणून ओव्हन मध्ये हे डबे ठेवून दिले, बिचारे ते आता वितळून गेले होते.
मग काय ओव्हन साफ़ करण्याची कारवाई सुरु झाली. रात्री जेवायला दुसरे काय करावे हा विचार तर पिच्छा सोडत नव्हता. आमच्या सासरचे गोत्र ’जमदग्नी’ हे माझ्या नवर्याला पहाताक्षणी कळत होते. पुढचे कित्येक दिवस वितळलेले प्लॅस्टिक स्वच्छ करण्यात गेले. पण हरले तर मी कसली? दुप्पट उत्साहाने, कुठलेही रेडी मिक्स न वापरता पुढच्या वेळी पिझ्झा केला. प्रयोग यशस्वी झाला.
आजवर ज्या मैत्रिणींनी आमच्या घरी पिझ्झा खाल्ला त्या अजूनही सांगतात इतका छान पिझ्झा आम्ही कधीच खाल्ल्ला नाहीये. उद्या मी श्रेया’ज पिझ्झेरिया सुरु केले तर आश्चर्य नाही. माझ्या प्रत्येक यशस्वी पिझ्झ्यामागे तोच तो फ़सलेला पिझ्झा आहे हे नक्की...!


No comments:
Post a Comment