शाळेत असताना एक श्लोक शिकले होते—
कमले कमला शेते, हरश्शेते हिमालये।
क्षीराब्धौ च हरिश्शेते, मन्ये मत्कुणशङ्कया।।
“लक्ष्मी कमळात निवास करते, शंकर हिमालयात, विष्णू क्षीरसमुद्रात...! का बुवा? बहुधा त्यांना ढेकणांची भीती वाटत असावी.” यातला विनोदाचा भाग सोडून द्या. अहो, साक्षात देवांनाही विश्रांतीसाठी स्वत:चा असा निवांत कोपरा शोधावासा वाटतो. आपण तर माणसं आहोत. आपण आपल्या विश्रांतीसाठी, छंदांसाठी एखादा निवांत कोपरा शोधला तर त्यात आश्चर्य ते काय?
आम्ही देश विदेशात कुठेही राहिलो तरी ते घर 'सुंदर' या सदरात मोडणारं कधीच नसतं. अगदी गरजेपुरतं सामान घ्यायचं. वेळ झाली की विंचवाचं बिर्हाड पाठीवर उचलून निघायला मोकळे. शिवाय सामान कमी असलं, की आवरावं लागत नाही फ़ारसं..! मग आपल्याला आवडणार्या गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो.
घर, गृह, निवासस्थान हा वास्तविक आपला ’कम्फ़र्ट झोन’ असतो. आमच्या घराच्या बाबतीत म्हणाल तर हा कम्फ़र्ट झोन प्रकार इतका जास्त आहे की घरात फ़ार शिस्त वगैरे नाही, वेळापत्रक तर अजिबात नाही. अगदीच कुठे जायचे असेल तर घड्याळाकडे पहायचे. अन्यथा, आपले काम आणि आपण….! सुदैवाने आम्ही तिघेही असेच ’छंदिष्ट’ आहोत.”कोकणस्थ’ या सदरात न बसणारे. आवडतं पुस्तक मिळालं तर पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही. मग अंघोळ-बिंघोळ मारो गोली. लॅपटॉपवर काही शोधायचंय, गेम खेळायचाय, एखादा मुव्ही बनवायचाय, गाणी डाऊनलोड करायचीत, फ़ोटो एडिट करायचेत. जे करत असू ते मनासारखं झाल्याशिवाय कोणी उठणार नाही त्याच्यासमोरुन. आणि एकदा झोपी गेले की मग कुंभकर्णच....! सगळेच असे असले ना की प्रश्न येत नाही.
त्यात कोणी ’नाईट आऊल्स’..रात्री जागणारे घुबड. कोणी ’मॉर्निंग बर्ड’. पहाटे उठणारे पक्षी. पूर्वी एका शेजारणीने विचारलं देखील होतं, तुम्ही रात्री झोपत नाही का? पहाटे पण दिवा दिसतो आणि रात्री पण खूप उशीरापर्यंत दिवे चालू असतात. तिला म्हटलं खाली गुरखा एकटाच असतो बिचारा..त्याला कंपनी देत असतो आम्ही जागे राहून. (काय सांगू तिला..आम्ही नवरा बायको कधीकधी गप्पा मारत पहाटे तीन तीन वाजेपर्यंत जागतो. पुढचा प्रश्न येईल येवढं काय बोलता? )
या सगळ्या दृष्टीने आमचं आत्ताचं कॅलिफ़ोर्नियातलं घर मस्त होतं. भरपूर प्रशस्त…आमचा सगळ्यांचा पसारा सामावून घेईल असं…! कितीही वेळ झोपा कोणी बेल वाजवणार नाही, दिवे जाणार नाहीत की पाणी...! कोणी येणार असा मित्रमैत्रिणींचा फ़ोन आला की सगळे एकदम कामाला लागायचे. हॉलमधलं सामान, ठिकठिकाणी पसरलेली पुस्तकं, मुलाची खेळणी, लेगो पिसेस , माझी पर्स, उचलून एका बेडरुममध्ये टाकायचं आणि खोली बंद करायची. वाळत पडलेली भांडी उचलायची आणि सिंकमधली भांडी डिशवॉशर मध्ये कोंबायची की आम्ही रेडी…!
या घराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला फ़ोटोग्राफ़ी करायला भरपूर स्कोप होता. जवळ तळं, तिकडे ‘कनेडियन गूज’ आले की फ़ोटो काढायचे. कधी चेरी ब्लॉसम, पीच ब्लॉसम आला की ते फ़ोटो. या फ़ुलांचं एक बरं असतं ..आपण म्हणू तितका वेळ पोझ देतात बिचारी. ख्रिसमसच्या वेळी ‘ऑलिव्ह एव्ह’ सजलेली…हवे तितके फ़ोटो काढा. चालत अमेरिकेत फ़िरता येइल असे विभाग फ़ार कमी असतात.
शिवाय एक गल्ली टाकून पुढे गेलात की तिथल्या दुकानात चितळेंच्या बाकरवडीपासून काहीही मिळायचं. ही चक्क चैन आहे. माझ्या ठाण्यातल्या घराजवळ देखील नाही मिळणार इतक्या जवळ चितळ्यांची बाकरवडी. आणि चालत जाता येईल अशा ठिकाणी लायब्ररी, बॉर्डर्स सारखं पुस्तकांचं दुकान जिथे कितीही तास वाचत पुस्तकं चाळत बसलं तरी कोणी हटकणार नाही.
या घराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं मित्रमंडळ. मित्रमैत्रिणींना जमवून गप्पा टप्पा कराव्या असे प्रसंग इथे खूप आले. कोणी येणार आहे असं जर चार दिवस आधी माहित असेल तर मात्र आमच्या घराचं रुपडं अगदी वेगळं असायचं. नेहमी बेंगरुळ रहाणार्या व्यक्तीने एकदम मेकप करुन, परफ़्युम लावून तयार व्हावं तसं…! अशा वेळी मात्र फ़ुलदाणी ठेवून आणि डिनर सेट तयार ठेवून आमचं टेबल सजलेलं असायचं. सिक्रेट हे की ‘मास्टर शेफ़’ एकदम सहा वाजता स्वयंपाकघरात यायचे फ़ोडण्या घालायला. ‘हाऊस कीपिंग डिपार्टमेंट’ चार दिवस आधी खपून घर आवरुन ठेवायचं. (डिव्हिजन ऑफ़ लेबर …अस्सं कामाला येतं. म्हणून मुलगा पहाताना स्वयंपाक येतो का हे मुलीने विचारलं पाहिजे. )
तिथला निवांतपणा मात्र फ़ार मोहक होता. बेडरुममधल्या कम्प्युटर टेबलखाली हीटर लावला आणि तिकडे जाऊन सकाळी नवाला बसले की २ वाजता उठायचे. कधी कधी काम करताना इतकी तंद्री लागायची की हीटरचा चटका बसतोय हे फ़ार उशीरा लक्षात यायचे. जरा पसारा आवरायचा नि दहा मिनिटांत खाली उतरायचे. मेरी बसंती..बाईक उचलायची आणि शाळेकडे हाणायची. मुलाला जेवायला दिलं की परत फ़ेसबुक चालू. पुस्तक असेल तर आपण एक पुस्तक घ्यायचं, दुसरं मुलाला द्यायचं आणि रात्री ८-८.३०लाच जेवणं आटोपून वाचत लोळत पडायचं.. हे सगळं आठवलं की वाटतं...सुखं म्हणजे आणखी काय असतं? काय पुण्य असलं की हे घरबसल्या मिळतं...!

No comments:
Post a Comment