प्रिय सखे,
’आय ड्रीम ऑफ़ जिनी’ तू पाहिली होतीस का गं? किंवा किमान अल्लाउद्दिनने घासलेल्या दिव्यातून बाहेर पडणारा जिनी? किंवा 'कल्पतरु' किंवा 'चिंतामणी' किंवा 'कामधेनू'. मालिकेतल्या सुंदर जिनीव्यतिरिक्त मी तरी काहीच पाहिले नाही. सगळ्या कविकल्पना किंवा मनाचे खेळच. तरीही एखाद्या क्षणी वाटतं, आला किंवा आली अशी जिनी, किंवा चिंतामणी हाती लागला, कल्पवृक्षाखाली वास करायला मिळायला वा कामधेनूच समोर येऊन उभी राहिली तर मला तिच्याकडे काय मागायला आवडेल?
काही करोड रुपये किंवा डॉलर्स? भारत वा परदेशातल्या सफ़री? काही पदव्या? गाड्या? घरे वा मोठमोठे प्रासाद? अगदी आधुनिक पद्धतीचे काही कपडे? एखाददोन चांगले संगणक?
मला असं वाटतं एक गृहिणी, आई, बायको आणि स्वतंत्र माणूस यादृष्टीने आवश्यक पैसा, घर, वस्तू, कपडे हे सगळं पुरेसं आहे. अशा भौतिक बाबी आणखी कितीही मिळाल्या तरीही माझ्या आयुष्यात फ़ारसा फ़रक नाही पडणार.
सखे, मला ना काळाचं चक्र काही तासांसाठी का होईना मागे गेलं तर फ़ार आवडेल. अगदी खरं सांगायचं तर आपले रुईयातले दिवस परत यावेत असं अनेक वेळा वाटतं.
त्या काळी वास्तविक समोरचं चित्रं अगदीच धूसर होतं. खूप छान मार्क्स मिळवून, कोणी कोणी तर मेरिट लिस्ट होल्डर्स पण होते रुईयात आर्ट्सला आलेले. बरेचसे जवळपास रहाणारे, हिंदु कॉलनीतले, दादरमधले, तर काही पार चेंबूर ते अगदी बदलापूरपासून येणारे. पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, भाषांबद्दलचं प्रेम आणि समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तौलनिकदृष्ट्या नवीन विषय समजून घ्यायची तयारी ….! कोणी गायन,वादन, नृत्य हे छंद जोपासत होतं तर कोणाचं गणितावरच प्रचंड प्रेम होतं पण शास्त्र विषय आवडत नाहीत हे सत्य वयाच्या पंधराव्या वर्षी समजण्याइतकी आणि घरच्यांना पटवून सांगण्याइतपत परिपक्वता होती. पुढे नक्की कोणतं व्यवसायक्षेत्र निवडणार याबाबत मात्र खात्री नव्हती.
अशी सगळी समानशील असणारी मंडळी एकत्र आल्यावर काव्यशास्त्रविनोदात वेळ कसा निघून जाई ते कळत नसे. रुईयातल्या वर्गातली व्याख्यानं आणि बाकीच्या सांस्कृतिक घडामोडी दोन्ही तितकंच वेगवान असायचं. ’उडान’, ’उत्सव’ यासारखे संपूर्ण महाविद्यालयातले कार्यक्रम, मराठी वाङ्मय मंडळ, संस्कृत वाङ्मय सेवक सभा यानिमित्ताने अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व (पुष्कळदा ते माजी विद्यार्थीदेखील असायचे) जवळून पहाता आली. त्यांचे अनुभव ऐकता आले. तर अगदी जवळपास आहे म्हणून ग्रंथाली वाचकोत्सव, अनेक पुस्तकप्रदर्शनं, मॅजेस्टिक गप्पा इथे सहज उपस्थित रहाता आलं. न ठरवता आपलं विश्व विस्तारत गेलं. आपल्याला शिकवणारे शिक्षक दिग्गज होतेच, पण त्याबरोबर सहाध्यायी मंडळी ज्यांच्यापैकी आज बरीचशी नाट्य, चित्रपट, चित्रवाहिन्या यात स्थिरावली आहेत त्यांचे सुरुवातीचे प्रयोग पहाणं देखील आनंददायी होतं.
थोडेसे पैसे साठवून मॅजेस्टिकमधून पुस्तकं घेणं, आलेल्या नवीन पुस्तकांकडे आशाळभूतपणे पहाणं, येताना श्रीकृष्णचा बटाटेवडा आणि फ़ुलबाजारात जाऊन घेतलेली खूप सारी फ़ुलं हे सगळं तर विसरुच शकत नाही.
प्रिये, तुझ्याशी बोलता बोलता मी खरंच त्या काळात प्रवास करुन आले. धन्यवाद जिनी….! तुझा विचार करता करता 'हल्ली कोणकोणत्या गोष्टी करणं मी सोडून दिलंय' याची मला चांगलीच आठवण झाली. आता महिन्यातून एक चक्कर मॅजेस्टिकला….!
बाय,
……तनुजा
No comments:
Post a Comment