"नम्मा बेंगलुरू” म्हणजे आपले बेंगलोर .
खरेच जाम आपले वाटले हे शहर. निमित्त होते ते मुलाच्या शिक्षणासाठी त्याला हॉस्टेलवर सोडण्याचे . त्या निमित्ताने आम्ही मात्र जीवाचे बंगलोर करून आलो . रेखाच्या स्टाईल मध्ये “लोणावळा , खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर , गोवा नि काश्मीरला” असं म्हणत विमान प्रवास सुरू केला. अर्थात विमानातून उडी मारावीशी वाटावी इतक्या वेळाचा हा प्रवास नाहीये. २४/२४ तासांचे विमान प्रवास म्हणजे अंगदुखी, झोपेचे तंत्र बिघडणे आणि डोळे बंद केले की हेलकावे घेत असल्याचा फील येणे असते. त्यामानाने हे म्हणजे अगदीच मुलुंड- ठाणा होतं.
मी अगदी १० वर्षाची असताना गेले होते बंगलोरला. तेव्हा मिरजेला गाडी बदलून जावे लागत असे आणि २४ तासांचा प्रवास . कसं नेलं असेल आईने? तीन मुलं आणि सामान भरपूर. उतरल्यावर सगळीकडे कडबोळी . काही वाचता येत नाही याने निराशा झाली होती. आता नवसाक्षर असल्यासारखे का होईना अक्षर लावून थोडे कानडी वाचता येत होते.
अजून ज्युनियर केजीत आहोत त्याबाबतीत. थोडे चिंटिंग करत मध्ये मध्ये इंग्रजी वाचून क्रॉस चेक करत होतो. कानडी भाषेत कसलाही गट म्हणायचे असेल तर ‘गळु ‘ म्हणतात. म्हणजे अनेक स्वर असतील तर ‘स्वरगळु,’ व्यंजने असतील तर ‘व्यंजनगळु’. थँक्स म्हणायचे असेल तर ‘धन्यवादगळु’. आमच्या मुलाला तरी गळू म्हणजे मराठीत अर्थ फोड हे अजून बोलले नाहीये मी. तो बिचारा गपचूप वाचत होता माझ्याबरोबर . मला मात्र हे ‘गळूच गळु’ म्हणून फार हसायला येत होते. प्रीपेड कॅब करावी का बघत होतो तर तिकडे cabs च कानडी भाषांतर ‘क्याबगळू’ केलं होतं हे वाचून हसून हसून फुटायची वेळ आली. पण जेव्हा त्यांनी पैसे सांगितले तेव्हा मात्र मी विचार करायला लागले, “आमचे अहो काय परदेशातून आताच उतरल्यासारखे दिसतायत का? एकदम तोंडाला येतील ते पैसे सांगतायत.” बंगलोरच्या टॅक्सी, रिक्षावाल्यांबद्दल बोलायचे तर तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो .
थोड्या वेळात झाली तजवीज. बॅग घेऊन बाहेर आलो. जीव सुखावला तो तिथल्या आल्हाददायक हवेने . अर्थात खरे बेंगलोरवासी म्हणतात पूर्वीसारखी नाही राहिली आता इथली हवा. एकूण आमच्या वेळच पुणे असं नव्हतंच्या चालीवर ! आणि अचानक आला एक चिरपरिचित सुवास. आमच्यासारख्या खादाड माणसांना येतातच असे वास पटकन. समोर सब_ वे होतं. साक्षात कर्नाटकात येऊन हे असं आंग्ल पद्धतीचं काय खायचं?
काहीही म्हणा! शाकाहारी मंडळींसाठी चैन आहे इकडे सहल करणे. माटुंग्याला शिकायला जायला लागल्यापासून इडली सांबारावर वाढलेला माझा जीव बंगलोरची फुलासारखी नाजूक इडली खाऊन इतका खुश झाला. पोट वाईच लहानच आहे असं वाटायला लागलं. दोन इडल्या एक वडा पोट तृप्त व्हायच. आणि स्पेशल वाटला इकडला चहा. खूपच छान दाट दुधाळ. अक्षरश : थोडासा असला तरी एकदम झोप उडते. कॉफी/ फिल्टर कॉफीपेक्षा चहा उत्तम . जागोजागी कोपऱ्या कोपऱ्यावर इडली डोसा सेंटर, काही ठिकाणी रविवारी टोमॅटो राईस, चित्रान्ना , पुलिओगरे विकायला असतो . काही ठिकाणी समीष बिर्याणी प्रकार. खायचं आणि लांब चक्कर मारून यायचं हे आमचं रूटीन झालं होतं. अधूनमधून नंदिनीचं आईसक्रीम, कुल्फी वगैरे.
ठिकठिकाणी इतकी ताजी फळं आणि आंबे विकणाऱ्या गाड्या. फुलं तर विचारायलाच नको. मला दहा वेळा वाटलं. उगाच ते लांसडक केस कापले. काय ते सुगंधी मद्रासी गजरे. मनापासून मैसूर मल्लिगे शोधत होते. ते मात्र कुठे दिसले नाही. एकूणच निसर्गाने भरभरून दिलं आहे या परिसराला! जाता येताना कायम डोळ्यात भरत होती ती दाट वृक्षराजी. अगदी सरकारी इमारती देखील आडव्या पसरलेल्या आणि भोवती भरपूर झाडी.
वसंत ऋतूत आलो तर खरंच कॅमेरा घेऊन फिरायला किती मजा येईल. असा विचार करत होते. तेव्हाच जाणवलं ताई भानावर या. इकडचा ट्रॅफिक तुम्हाला असले उद्योग करू देणार नाही. एकतर इतके जवळ जवळ सिग्नल आहेत. छोटी गल्ली असली तरी सिग्नल. प्रत्येक वेळी थांबायचं. मात्र पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करता यावा यासाठी खास वेळ पण आहे. तेवढ्या पाच दहा सेकंदात जायचे पुढे. चालत फिरायला जय नगर, जे पी नगर छान आहे .
एका गोष्टीच्या मात्र तुडूंब प्रेमात पडले ते म्हणजे साड्याच साड्या. कॉलेजात शिकवत
होते तेव्हा महालक्ष्मी इथल ‘नल्लिज’ आवडती जागा होती. खरेदी एका साडीची. पण उलथापालथ प्रचंड करून येणे. हे बघ, ते बघ. आता तर ठाण्यातच उघडली आहे ब्रांच. पण इकडे बेंगळुरू मधलं मात्र तीन मजली टोलेजंग दुकान. वेड लागतं की काय घेऊ. साड्या, ड्रेस मटेरियल आणि तागे. घरी शिवण शिवणारी व्यक्ती असेल तर तिला अक्षरश: काय घेऊ नि काय नको असं होईल. आणि बाई माणूस हौशी फॅशन डिझायनर वगैरे असेल तर विचारायला नको. खूपच क्रिएटिव व्हायला वाव आहे.
ज्या एखाद्या देवळात गेलो ते देखील अतिशय सुंदर. अगदी चालत जायच्या अंतरावर बनेश्वरी देवीच देऊळ होतं. पार्वतीच एक रूप म्हणून ते प्रसिद्ध आहे. पारंपरिक वाद्य वादन ऐकायला मिळालं. एकदम प्रसन्न आणि पवित्र वाटलं.
अजून बरीच स्थळं होती प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत ! पण आता ती पुढच्या वेळी !
©श्रेया श्रीधर महाजन.


No comments:
Post a Comment