Friday, 11 July 2025

गोदातरंग

 गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा ! आणि आयुष्यात भेटलेल्या सगळ्या मार्गदर्शकांना विनम्र अभिवादन!

महाराष्ट्रात आचार्य म्हटल्यावर ‘अत्रे’ हेच नाव पटकन डोळ्यासमोर येते. त्यांचा अफाट लेखन प्रपंच आपल्या पिढीने तर नक्कीच वाचला आहे. ब्रह्मचारी, तो मी नव्हेच आणि “मोरूची मावशी” सारखी नाटके अजूनही लोकप्रिय आहेत. आचार्य अत्रे मुळात एक उत्तम शिक्षक. अध्यापनाच्या पदवी आणि परदेशातील पदविका सुद्धा उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले शिक्षक. त्यांच्या पत्नी देखील अध्यापन क्षेत्रातील होत्या. नुकतेच एक छान पुस्तक वाचनात आले. पुस्तकाचे नाव ‘गोदातरंग’ . लेखिका सुधा अत्रे . याच आचार्य अत्रे यांच्या सुविद्य पत्नी.

आपल्या पिढीला तर्खडकर या आडनावाबरोबर केवळ भाषांतर पाठमाला याची आठवण येते. ही भाषांतर पाठमाला लिहिणारे द्वारकानाथ राघोबा तर्खडकर - यांची नात -गोदावरी मुंगे /सुधा अत्रे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य किती मोठे होते याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे . त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा उत्तम वारसा होता. लहानपणीच्या सेंट कोलंबा शाळेतील आठवणी वाचताना ही स्वातंत्र्यपूर्व काळातील मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती असावी यावर विश्वास बसत नाही . अगदी ८० /९० च्या दशकात मुली जशा झपाटून शिक्षणाकडे लक्ष देत तशाच स्वरूपाचे वर्णन वाटते .

त्या काळात घडलेल्या अनेक घटनांमुळे आणि वडिलांच्या भावंडांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आईच्या मनावर फार मोठा आघात झाला आणि तिचे संसारातून लक्ष म्हटले अशावेळी बाईंच्या वडि‍लांनी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केले आणि त्यांना विल्सन कॉलेज मधून पदवीधर झाल्यावर पुण्याला हुजूरपागेच्या शाळेत अध्यापन करायची परवानगी दिली. तिथे शिकवत असताना अध्यापन शास्त्राची पदवी देखील घेता आली. पुढील शिक्षणासाठी लंडन येथे जाऊन अध्यापनाची पदवी परीक्षा पास व्हावी असे मनात असताना अचानक आचार्य अत्रे यांच्याशी परिचय झाला. अत्रे त्या वेळी पुण्यातील कॅम्प एरियातील शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. परिचय थोडासा वाढला त्यानंतर अत्रे यांनी स्वतःच पुढाकार घेऊन विवाहाचा प्रस्ताव मांडला आणि अचानक विवाह झाला .

पुढच्या बऱ्याच घटना सर्वज्ञात आहेत . प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै आणि लेखिका मीना देशपांडे या त्यांच्या कन्या . मुली झाल्यावर एक मोठेच वादळ वैयक्तिक आयुष्यात आले . बाईनी बदली झाल्यामुळे नाशिकला जायचे ठरवले . आचार्यांचे नाट्यलेखन , चित्रपट लेखन , सामाजिक कार्य, राजकारण , झंजावाती दौरे आणि सोबत वनमाला बाई प्रकरण देखील चालू होते . बाईंचे एकला चालो रे म्हणत मार्गाक्रमण चालू होते. नाशिक येथील ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणून जबाबदारी आणि सोबतीने दोन मुलींची आई म्हणून त्यांच्या पालन पोषण शिक्षण या जबाबदाऱ्या . अशा वेळी स्त्रिया सगळयात दुर्लक्ष करतात ते स्वत:च्या प्रकृतीकडे . आणि कधी ना कधी तुमचे शरीर तुम्हाला जोरदार आवाज देते की आता आराम कर . पण अशी वेळ आली तरी पुन्हा पुन्हा बाई जिद्दीने काम करीत राहिल्या. काही वेळा शिक्षण विभागातले राजकारण , काही वेळा सहकाऱ्यांच्या कडून फसवणूक , त्यांची आजारपणे, मृत्यू अनेक गोष्टी घडत होत्या. असेच न थकता चिकाटीने काम करीत बाई एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झाल्या .


पुढे वैयक्तिक आयुष्य देखील पतीसमवेत समाधानाने व्यतीत केले . चहाच्या पेल्यातील वादळे तिथेच शमवावी आणि नवऱ्याला साथ द्यावी याबाबत त्यानी दाखवलेला समजूतदारपणा वाखणण्याजोगा आहे .

पुस्तक वाचताना येणारे संदर्भ आपण कधी ना कधी वाचलेले असले तरी यात विशेष विस्ताराने आले आहेत . नाशिकमधली पाऊस , थंडी , येणाऱ्या कॉलरा सारख्या साथी आणि मुलीना केले जाणारे लसीकरण , १९४२ ची चळवळ , देशाला मिळालेले स्वातंत्र्य , आणि झालेले बदल , प्लेगची साथ आणि त्यावेळी झालेले आप्तेष्टांचे मृत्यू , कोयना भूकंप, संयुक्त महाराष्ट्र चळवळ . निवडणुका आणि कितीतरी गोष्टी . 

सामाजिक आणि राजकारणी, आध्यात्मिक , चित्रपट , नाट्य क्षेत्रातील अनेक व्यक्ती ज्या आज आपण आदर्श मानतो त्यांच्याशी खूप जवळून परिचय आणि सहवासाचे अनुभव यात आहेत . जे मुळातून वाचण्यासारखे आहेत . बालगंधर्व घरी राहायला येणे हा एक छान अनुभव . पारडी येथे सातवळेकर शास्त्री यांची भेट हा तर धन्य प्रसंग . ९७ वर्षाचे शास्त्री आणि ८१ वर्षाच्या त्यांच्या पत्नी तेव्हा देखील हिंडते फिरते होते . आपली कामे करू शकत होते इतकेच नव्हे तर बाई आजारी असताना शास्त्रीजी त्यांना भेटायला आले होते . दिव्य अनुभव !

अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे त्यानी वर्णन केले आहेत.  कुणाचाही विनोद करत सहज टोपी उडवू शकणारे पण वैयक्तिक आयुष्यात अतिशय हळव्या मनाचे होते असे निरीक्षण नोंदवले आहे . अशा या दोन्ही आचार्यांनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे . एकाने पोटभर हसविले तर दुसऱ्याने अनेक शिक्षिका घडवल्या . महाराष्ट्र नेहमीच या गुरूंचा ऋणी राहील . ⓒ श्रेया श्रीधर महाजन . १० /७/२०२५ 




No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...