You will be dearly missed Mama. हे लिहायला हिंमत होत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आमचे मामा श्री धनंजय उर्फ अनंत परशुराम जोशी यांना गेल्या आठवड्यात देवाज्ञा झाली. त्या दिवशी घरी सगळ्याच नातेवाईकांना जाणवत होतं "मामाचा आवाज" आला नाही. त्यांच्या घरी गेलं आणि मामाच्या भाषेत’ दंगा’ केला नाही असे क्षण विरळा. घरी आलेल्या माणसांना मनसोक्त खाऊ घालणं हा आवडता उद्योग आणि गप्पा मारून, चेष्टा करून हसवणं हा दुसरा. स्वतः च्या नावाची मजेदार फोड त्यानेच एकदा सांगितली होती AP जोशी म्हणजे ‘अप्पा पप्पा जोशी.’
वास्तविक आईच्या सांगलीला राहणाऱ्या मामाचा मुलगा. नोकरी शोधत मुंबईत येतो काय, आजीच्या घरी काही दिवस राहतो काय आणि बघता बघता आमचा लाडका मामा होऊन जातो काय खरेच वाटत नाही. आमच्या लहानपणाच्या प्रत्येक गोष्टीत हा मामा असेच. त्याच्या सायकलवर डबल सीट पण जात असू, टू व्हीलर वर तर इतकी फिरले आहे मामाबरोबर. कधीही घरी आला तरी शाळेत सोड, क्लासला सोड. गाडी आल्यावर तर एकदम हक्काने मागे लागत असू.
एक काळ असा होता की घरात काही खरेदी करायची की धनंजय मामाला घेऊन जा बरोबर खरेदीला. आमच्या आईचा एकदम confidant . आपण रिसर्च करून ठेवायचा , फायनल शॉपिंग मामाबरोबर . हॅण्डलूम एक्स्पोला जायचं आहे मामा मामी यायचे बरोबर. त्याचं पण आमच्या आईशिवाय पान हलत नसे. घर फायनल केलं, मुलं आजारी पडली, मुलांना कुठल्या क्लासला घालू , घरी पूजा आहे , काही तयार पदार्थ हवे आहेत प्रत्येक गोष्टीला आशाताई .
तो मुलुंडमध्ये ‘जोशी गुरुजी’ या नावाने प्रसिद्ध होता. सत्यनारायण , गणपती प्रतिष्ठापना, लग्न, मुंज , वास्तुशांत असो वा उत्तरकार्य. आमची सगळ्यांची लग्न काही या गुरुजींशिवाय लागली नसती . अगदी बेसिक पत्रिका बघणे इथपासून पुढे सगळे कार्यक्रम कुठे करायचे , खरेदी ते अगदी लग्न होईपर्यंत मामा हवाच ! खणखणीत आवाज, स्पष्ट शब्दोच्चार आणि तितकीच परखड मतं. एखादी गोष्ट करायची तर विशिष्ट पद्धतीने झाली पाहिजे हा आग्रह. याबरोबर HP मधली नोकरी, कधी डबल ड्युटी करून पुन्हा सकाळी पूजा सांगायला गुरुजी तयार. तितकेच फ्रेश आणि अँक्टिव्ह जसे नेहमी असतात. बुद्धिमान माणसांना सुसंगती मागची विसंगती फार चटकन कळते. असे अनेक विनोदी किस्से, लोकांनी विचारलेल्या शंका यांनी या मामाची पोतडी कायम भरलेली असे. कुणाचेही लग्नकार्य असो भरभर वेगवेगळे उखाणे घेणे, अतिशय विनोदी उखाणे घेणे यात एकदम पटाईत व्यक्तिमत्त्व. कदाचित लग्नात देखील मामीपेक्षा वेगाने यानेच उखाणे घेतले असतील. बोलायला विषय नाही असे कधी झाले नाही , आणि हाताने काम नेहमीच चालू.
माणसाने कष्टाळू असावं, मोठी स्वप्न पाहावी , ती प्रत्यक्षात उतरू शकतात त्याचं चालतं बोलतं उदाहरण कायम समोर राहिलं. कितीही मोठे झालो तरी पाय मात्र जमिनीवर असावे कधी कुठल्याच कामाला नाही म्हणू नये याचा वस्तुपाठ होता तो !
तसा विचार केला तर ब्राह्मणांच्या हाती स्वतःच्या बुद्धिमत्तेशिवाय आणि अंगभूत कौशल्यांशिवाय मधल्या काळात होतं तरी काय ? जमिनी कुळकायद्यात गेलेल्या. सगळीकडे आरक्षण सुरू झालेले. आणि महाराष्ट्रात तर काही भाष्य करूच नये अशी परिस्थिती.
त्यातूनही ही आधीची पिढी चांगली संपन्न झाली, उत्तमोत्तम नाटके बघणे,अभिरुचीसंपन्न चित्रपट बघणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, चविष्ट आणि सात्विक आहार.आयुष्यात पहिल्यांदा थिएटरमध्ये याच्याबरोबर गेल्याच आठवतं. नोकरी लागली म्हणून घरी छोटी पार्टी केली आणि सगळी मोठी माणसे मागे लागली आता पिक्चरला जाऊया. मग मुलुंडच्या मेहुल थिएटर मध्ये आम्ही अख्ख्या कुटुंबाने पिक्चर पाहिला. ७८/७९साली ही खरंच चैन होती.
ही पिढी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा स्वतः करून कुटुंबाला खाऊ घालणं यात आनंद मानत आली . आमचा मामा याला अपवाद नव्हता. मिसळ वगैरे असे काही खास पदार्थ तो स्वतः करीत असे. एकूणच आजच्या भाषेत *फूडी*. जेवताना खाताना काय कशाबरोबर खावं म्हणजे छान चव लागते याचं प्रशिक्षण आणि प्रयोग घडायचे त्याच्याबरोबर जेवताना. सांगलीकर म्हणजे गोरे भडंग हवेच . तिखट पण चविष्ट . चहात चिवडा घालून खाणे, शंकरपाळे घालून खाणे, भाजणीचे वडे कढीत बुडवून खाणे, कढी कायम उकळती खायला घेणे किंवा वाढणे अशा अनेक गोष्टी. आजही उंधिया पाहिला आणि मामाची आठवण झाली नाही असे होत नाही. आई भरपूर उंधिया करणार, मामा मामी भरपूर पोळ्या घेऊन येणार आणि आम्ही एकत्र मजा करणार हे कित्येक वर्ष ख्रिसमस व्हेकेशन मधले चित्र असायचे. आणि वटपौर्णिमेला मामा एक मोठा फणस आणणार, त्यातला अर्धा आम्हाला आणून देणार. मग विळी , सुरी सगळ्याला खोबरेल तेल लावून आजी फणस चिरणार, आम्ही गरे काढणारे आणि काढता काढता खाणारे कामगार आणि फणसाचा वास येतोय म्हणत या दिवशी बिल्डिंगमधली बरेच जण आमच्याकडे येऊन चार चार गरे खाणार हा दर जूनमधला कार्यक्रम. आंबे महत्त्वाचे पण फणस कौतुकाचा विषय. विशिष्ट मौसमात आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी या आठवणी येतातच.
मी TY ला संस्कृत विषय घेते आहे म्हटल्यावर माझ्या काही नातेवाईकांनी त्यांच्याकडची वैयक्तिक पुस्तकांची कपाटेच मला उघडून दिली. अनेक आध्यात्मिक पुस्तके यात होती . तुला काय हवं ते घेऊन जा. मला कल्पनाच नव्हती अंत्येष्टी सूक्त, विवाह सूक्त नुसते शब्द ऐकले होते. पण त्या संस्कारांवर लिहिलेली सातवळेकर शास्त्रींची पुस्तके मामाच्या खजिन्यात होती. एवढे सगळे उद्योग करताना हा याचा पण बारकाईने अभ्यास, वाचन कधी करीत असेल असा प्रश्न मला पडला.
आम्ही राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये, आमच्या मित्रमंडळीत, आमच्याच शाळेत त्यांची मुलं असल्याने शाळेत देखील सगळ्यांना हा तनुजाचा मामा आणि टु व्हीलर चालवणारी घाऱ्या डोळ्यांची, सुंदर अशी तनुजाची मामी सगळ्यांना माहीत आणि लक्षात पण होती. छोटं आणि आनंदी जग होतं ते !
ते हि नो दिवसा गताः |
© श्रेया श्रीधर महाजन .

No comments:
Post a Comment