आयुष्याचे माटुंगा करणे ही फ़्रेज ऐकली आहेत कधी..? आमच्यात होती बुवा...! १०वी झाल्यानंतर झक्कासपैकी रुईयात गेले. तिकडे आर्ट्सला पुष्कळ ठाणा मुलुंडची मुलं मुली आलेली दिसली. जिवात जीव आला. आपण काहीतरी आचरटपणा केलेला नाही. मित्रपरिवार वाढायला वेळ लागला नाही. मग जरा निवांत गप्पांसाठी ठिकाणे शोधणे सुरु झाले. पहिलं सापडलं ते ‘जयेश’ आणि दुसरं ‘मणिज’... आयुष्याची पाच वर्षं मणिजच्या अन्नावर वाढलेला माझा जीव अमेरिकेत जेव्हा सुरुवातीला इडल्या डोसे करता येत नव्हतं तेव्हा कसा तडफ़डला होता ते माझं मलाच माहित..!
जयेशच्या चहाची कीर्ती अगोदरच माझ्या कानावर आली होती. आई शिशुविहारमध्ये ट्रेनिंगला जात असल्याने आसपासच्या परिसराची तशी तोंडओळख तिनं करुन दिली होती. बाकी बटाटेपोहे, बटाटापुरी, साबुदाणा वडा..आमडेकरांचं कौतुक यासाठी की सकाळी सातच्या लेक्चरच्या आधी किंवा लेक्चरला येऊनही कैसरे मास्तर आलेले नसतील तर इथे सकाळच्या न्याहारीची उत्तम सोय असायची. जरा रिसेसमध्ये भूक लागली तर मणिज आहेच. यांच्या अनलिमिटेड चटणी आणि सांबाराची चटक जी अकरावीत असताना लागली ती आजवर सुटलेली नाहीये. पूर्वी माझी एक मैत्रिण म्हणायची , यात नक्की काय घालतात..? एकदा आवडायला लागले की दुसरे कुठलेच सांबारआवडत नाही..!
माटुंग्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे पणजोबा पार नाडणातून आले ते इथे महावीर बिल्डिंगमध्ये स्थिरावले. अगदी माटुंगा स्टेशनच्या समोर. आमच्या पणजीचं कडक सोवळं पण रामाश्रयची इडली तिला आवडायची. आजोळच्या सगळ्या मामा आजोबा, आज्या,आमचे मामा, मावश्या यांच्यासाठी रामाश्रयला भेट ही सांस्कृतिक जिव्हाळ्याची गोष्ट होती. रुईयातून कधी लवकर सुटलं तर मीदेखील तिकडच्या मामा आजोबांकडे आणि मध्येच रामाश्रयमधला रस्सम वडा खायला जात असे. अर्थात मैत्रिणींचा कुटुंबकबिला घेऊन..!
कधी वेगळे खावेसे वाटले तर रिलॅक्स मध्ये जाऊन कटलेट खायचे, किंवा मसाला डोसा. अगदी भलताच रिकामा वेळ असला तर पार कॅफ़े मैसूर, कॅफ़े मद्रासपर्यंत चक्कर व्हायची. मग मात्र पुढच्या लेक्चर्सना सुटी द्यावी लागे.
आमचं टाइमटेबलच असं होतं की आसपासचा परिसर, हॉटेल्स,फ़ाइव्ह गार्डन सगळीकडे जायला वेळ मिळावा, मनोरंजन आणि अधेमध्ये जमेल तसा अभ्यास. संस्कृतचे लेक्चर आणि इतर लेक्चर्स मध्ये एक तासा दोन तासाचा अवधी असायचा. मग कधी फ़ूल बाजारात जावे कधी श्रीकृष्णचा बटाटवडा खावा,कैलाश पर्वतावर जाऊन लस्सी प्यावी (खरे तर खावी इतकी घट्ट असायची.) अगदी कॉलेज संपता संपता श्रीसुंदर्स नावाचे रेस्टॉरंट उघडले. दाक्षिणात्य खाद्य पदार्थांचा इतका चॉइस..खाता किती खाशील एका तोंडाने असे झाले.
पुन्हा एकदा जायला हवं रिकाम्या पोटाने...तुडुंब भरुन जाईल येताना. सगळ्या आठवणी जाग्या होतील. खाण्यासाठी काही जागा उरेल की नाही कुणास ठाऊक? ©श्रेया महाजन. गुरुवार, ७ मार्च, २०१३


No comments:
Post a Comment