Thursday, 7 March 2024

ऐसपैस गप्पा नीलमताईंशी


सध्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ हे ‘करुणा गोखले’ यांचं  पुस्तक वाचते आहे . 

डॉ. नीलम गोंऱ्हे हे नाव ‘स्त्री आधार केंद्र’ या संस्थेशी संबंधित म्हणून पटकन आठवतं . हल्ली हल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा झाली. अन्यथा फार वाच्यता न करता आपल्याला जे काम करायचे आहे ते करीत राहणे हा त्यांचा स्वभाव वाटतो . 


संपूर्ण पुस्तकात कुठेही आगाऊ वाटतील असे  फारसे प्रश्न नाहीत.  एखाद्या पत्रकाराने पार उलट तपासणी करावी हे  हल्ली मुलाखतीचे स्वरूप झाले आहे . किंवा  अगदी खोदकाम करून शोध पत्रकारिता करावी तसे या पुस्तकाचे स्वरूप नाही . एखाद्या माणसाने मनसोक्त काम केल्यावर आपल्याच आयुष्याचा लेखाजोखा  काहीशा तटस्थपणे मांडावा, त्यामागची कार्य- कारण मीमांसा, स्वतःची भूमिका स्पष्ट करावी तसे या पुस्तकाचे स्वरूप आहे. या मोकळ्या गप्पा आहेत . 


पुस्तक वाचताना अगदी डोळ्यात भरणारा गुण म्हणजे नीलमताईंचे   ‘बहुश्रुत व्यक्तिमत्व’. लहानपणी आजोळी पंढरपूरला कपाट भरून पुस्तके होती आणि सुटीत तिकडे गेल्यावर ते सगळे वाचायला मिळे या गोष्टीचा त्या पुन्हा पुन्हा उल्लेख करतात. वाचनाची आवड आणि त्याच्या जोडीला वाचलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता आणि अफाट स्मरणशक्ती जाणवून आपण स्तिमित  होतो . मला वाटतं, हा अनुभव खूप दिवसांनी आला की वाचताना बाजूला फोन, लॅपटॉप घेऊन बसावे लागते आणि काही पुस्तकांचे, काही  विचारवंतांचे संदर्भ आले की आपल्याला गुगल करून हे संदर्भ शोधावे लागतात . त्यावर वेळ मिळेल तेव्हा अधिक वाचू म्हणून आपण मनाशी नोंद करतो . 


पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता करता त्या  युक्रांद चळवळीमध्ये कार्यरत झाल्या . त्यानंतर दलित चळवळीचे काम करू लागल्या . मग शिवसेनेचे सभासदत्व घेतले . ही  सगळी कामे करीत असताना स्वतः मधले संवेदनशील मन त्यांनी नाहीसे होऊ दिले नाही याचे खरोखर आश्चर्य वाटते . वर लेबल कोणत्याही पक्षाचे   वा संघटनेचे असो स्त्रियांच्या प्रश्नांबाबत त्या नेहमीच संवेदनशील  आणि कृतीशील राहिल्या . अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांत सहभागी झाल्या . इतकेच नव्हे तर प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन करणे. लिखित स्वरूपात प्रसिद्ध करून लोकांना त्याबद्दल माहिती देणे याबाबत त्या आग्रही आहेत . त्यातून काही फलनिष्पत्ती व्हावी याकडे त्यांचा  कल आहे. किंबहुना दूरगामी बदल व्हावे असे वाटत असेल तर राजकारणाशी फटकून वागण्यापेक्षा त्यात सहभागी होऊन इच्छित गोष्टी साध्य करून घ्याव्या हा विचार फारच आवडला . 


 आपल्या देशात स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत . एखादी  बायकांसाठी मिटिंग ठेवायची असेल तर संध्याकाळी सहा ही  सोयीची वेळ नाही. एखाद्या मुद्द्यावर  तासचे तास चर्चा करून त्याचा कीस पाडणे हा प्रकार पुष्कळ पुरुष कार्यकर्ते असतात तिथे नेहेमी घडतो .  किंबहुना खूप वेळ चर्चा आणि फलित शून्य असे घडते . युक्रांद चे काम करीत असताना त्यांना ही गोष्ट खूपच जाणवली . त्यामुळे हळूहळू त्यानी ते काम सोडून दलित चळवळ , भारतीय रिपब्लिकन पार्टी चे काम सुरू केले. दलित स्त्रियांसाठी देखील खूप काम केले . कालांतराने बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षाचे काम सुरू केले .  आपले विचार आणि घर सांभाळून काम करणे दोन्ही करत असताना एखादी संघटना सोडून दुसरीकडे गेल्या तरी पूर्वीचे नातेसंबंध तोडून टाकले नाही आणि त्या संघटनेतील  व्यक्तींवर बोचरी टीका किंवा अनुदार उद्गार काढले नाहीत . हल्लीच्या महाराष्ट्रातील राजकारणात जे सतत शिवीगाळ करण्याचा प्रघात सुरू झाला आहे त्याला जे  काही सन्माननीय अपवाद आहेत त्यातील हे एक व्यक्तिमत्त्व आहे असे म्हणावे लागेल . एखाद्या पक्षात निर्णयप्रक्रियेत आपल्याला स्थान नाही,  अगदी आपला जिव्हाळ्याचा विषय असला तरी आपल्याला बैठकीचे आमंत्रण नसते, टाळले जाते आहे , हेटाळणी होते आहे  हे दिसल्यावर पक्ष सोडला. आपल्या मताचा आदर होत नाही, तेव्हा त्या पक्षाची विचारसरणी स्वीकारली  आणि आपले  काम सोडले असे केले नाही . आपल्या तत्त्वांशी खूप प्रामाणिक आहेत हे वारंवार जाणवते आणि मनस्वी स्वभावाचे दर्शन घडते . इतकेच नाही तर राम मंदिर , समान नागरी कायदा यासारखे मुद्दे उचलून धरणाऱ्या पक्षाकडे जायची हिम्मत त्यांनी दाखवली . त्यासाठी टीका देखील सहन केली . 


त्यांची काही निरीक्षणे देखील फार लक्षात घेण्यासारखी आहेत . एखादी चळवळ, दबाव गट यात अनेक मुलं मुली काम करीत असतात  , कालांतराने त्यांना लग्न करायची इच्छा होते . दोघे चळवळीतले असले की शेवटी त्यातला मुलगा पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो आणि मुलगी नोकरी पण करते आणि मुलं झाल्यावर घर पण सांभाळते . त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्री कार्यकर्त्या ते पण पूर्ण वेळ फार कमी दिसतात . एखाद्या प्रश्नावर बाईने विचार करणे आणि पुरुषाने यात खूप फरक असतो . ‘आपत्ती व्यवस्थापन’ यासारख्या ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यंची खूप आवश्यकता असते . अगदी सहज एक किस्सा त्या सांगून जातात की एक नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी कपडे पाठवले साड्या पाठवल्या . शासनाने देखील मदत पाठवली . त्यात पुरूषांचे कपडे बायकांसाठी साड्या आणि परकर ब्लाऊज होते . शंभर एक परकर आणि एकातही नाडी नाही . हसावं का रडावं ! लोकांना सुरक्षित जागी हलवलेलं असतं , तिथे नाडी बंडल मागावणे , ते कापायला कात्री, नाडी घालायला सेफ्टी पिन! म्हणजे एक नाडी घातलेली नाही तर किती गोष्टी हव्या ? हेच कोणी स्त्री अधिकारी असेल तर पटकन लक्षात येईल की असे परकर पाठवून फायदा नाही . हे वाचताना आता हसू आले तरी भूकंप झालेला असेल वा पूर आलेला असेल तर असे अनुभव आले की माणसे किती वैतागत असतील . या कामात तर संयमाची परीक्षाच लागत असेल . आपत्ती व्यवस्थापन यात मात्र सरकार फार चांगले काम करते याबद्दल सांगत असताना त्या सहजपणे शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचे खरोखर कौतुक करतात . पवार साहेबांकडून मिळणारे सहकार्य, त्यांचा कामाचा अनुभव आणि अफाट लोकसंपर्क याचा खूप फायदा होतो ही गोष्ट नमूद करायला त्या विसरत नाहीत .


त्यांचा एक नास्तिक ते सश्रद्ध असा  प्रामाणिक प्रवास देखील प्रत्यक्ष वाचणे फार रोचक आहे . स्त्री म्हणून येणाऱ्या अडचणींवर मात करत आज त्यांनी जो पल्ला गाठला तो खरोखर कौतुकास्पद आहे . मनस्वी, मृदू पण तरीही कामावर निष्ठा आणि आत्मविश्वास असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत उपसभापती पद भूषविते हे स्पृहणीय आहे .  


‘असुरक्षितता आणि आत्मकेंद्रीपणा’ हे दोन स्त्रीचे शत्रू आहेत . झीरो फिगर , रंग आणि आपले दृश्य रूप याबद्दल स्त्रिया प्रचंड जागरूक आहेत . काही वेळा गरजेपेक्षा जास्तच . सौंदर्याच्या या कल्पनांना स्वत:वर किती स्वार होऊ द्यायचं आणि आपण त्या कशा हाताळायच्या यावर स्त्रियांनी विचार करणे आवश्यक आहे हा मुद्दा मला त्यांच्या संपूर्ण विचारांचा केंद्रबिंदू वाटतो . © श्रेया श्रीधर महाजन .




No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...