काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी एक फ़ोटो तयार केला. ब्रेकफ़ास्ट टाइम नावाचा! त्यावर ताजे केलेले ब्लु बेरी मफ़िन्स, बेरीज, इतर फ़ळं, दुधाचा ग्लास, सगळे फ़ोटो एखादे कोलाज करावे तसे लावले. आणि अर्थात शोभेला फ़ुलांचे फ़ोटो पण! सवयीने खरे तर! "हा फ़ोटो छान दिसतोय पण यावर गुलाब कशाला?" इति अहो. आता खवचट प्रश्नाला खवचट उत्तर. असा विंचू काय गप्प बसतो का? मी म्हटलं,"प्रेमाचा गुलकंद घालायचाय!"
उत्तर तर दिलं....! आणि माझ्या डोळ्यांसमोर खरंच गुलकंदाची बाटली तरळली. ’आला उन्हाळा तब्बेत सांभाळा’ म्हणणार्या वसुंधरा पेंडसे नाईक आठवल्या. अगदी प्रवाळयुक्त गुलकंद, घातलेल पाणी, कैलास जीवन मधले म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे तळवे चोळणार्या आजी...! पूर्वी आमचा एक मामा नेहमी सांगायचा ...झोपताना आयोडेक्स, कैलास जीवन आणि अमृतांजन या तीन बाटल्यांमध्ये तीन बोटं बुडव आणि डोक्याला लाव, भस्माचे पट्टॆ काढल्यासारखी....सगळे रोग दूर होतील. एकूण कफ़, पित्त आणि वात या तिघांचा समतोल राखणं म्हणजे स्वस्थ असणं असं आयुर्वेद सांगतो. त्या दृष्टीने वापरली जाणारी ही औषधे जवळ जवळ आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होऊन गेली आहेत.
परदेशात जेव्हा ही औषधे अगदी हाताशी नसतात तेव्हा तर आजीबाईंचा बटवा आणि घरगुती खाद्यपदार्थांचे औषधी गुणधर्म माहीत असणं खूप कामी येतं. याच उन्हाळ्यातली ही गोष्ट आहे. अचानक गरम व्हायला लागलं आणि आमच्या लेकाचे डोळे फ़ार लाल दिसायला लागले. मला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाटकातला संवाद आठवला, "डोळ्याला आली लाली, चष्म्याला औषधं लावली." :-) मुलगा आजारी आणि मातोश्रींना विनोद सुचतायत. पुष्कळ औषधं पोटात दिली, डोळ्यात घातली, फ़रक पडेना. मग टी. व्ही. बंद, संगणक बंद. तरीही फ़रक नाही. एकदा सहज विचार केला पूर्वी आमची आजी सावरीचं पान साजूक तूप लावून तिच्या टाळूवर ठेवायची. उष्णता कमी होते म्हणे अंगातली. काशाच्या वाटीनं तूप लावून पाय चोळून द्यायचे हा पण चांगला उपाय . हा उपाय सहज जमेल असं वाटलं. ते मात्र खरंच कामी आलं, योग्य गुण आला.
स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ, मसाले यांचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत. मला आठवतंय सर्दी झाली की धने उकळून त्याचे पाणी(काढा), पित्त झाले तर धने आणि खडीसाखर रात्रभर एक ग्लासभर पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी प्यायचे. आराम मिळत असे बुवा त्याने! लहानपणी एकदा आत्याकडे गेले होते पुण्याला तर ती म्हणाली शतधौती तूप करूया घरी! एका तांब्याच्या ताम्हनात तूप घ्यायचे आणि पळी पळीने शंभर वेळा पाणी घालायचे, प्रत्येक वेळी काशाच्या वाटीने थोडे घोटायचे. हवे तर थोडा कापूर घालायचा. हे तयार मिश्रण डब्यात भरून ठेवायचे. टाचा फ़ुटल्या असतील तर त्यासाठी, उन्हाळ्यात तळव्यांना लावण्यासाठी उत्तम! बाकी जेष्ठीमध, सितोपलादी चूर्ण असली आयुर्वेदिक औषधे तर साध्या साध्या आजाराना अगदी गुणकारी ठरतात.
मागे एकदा एक मैत्रीण सांगत होती. नवर्याबरोबर औषधाच्या दुकानात गेली, आणि अहो आग्रह करायला लागले त्रिफ़ळा चूर्णाची मोठी बाटली घे, तुला लागतंच ना! तिची हसून हसून पुरेवाट! बाहेर पडल्यावर झापलंच नवर्याला.....अरे त्या दुकानदाराला काय वाटेल, बाईंना त्रिफ़ळाशिवाय अगदीच चालत नाही वाटतं...! त्रिफ़ळा चूर्ण हे आयुर्वेदात सौम्य रेचक म्हणून वापरावे असे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त डोळ्याच्या विकारासाठी त्रिफ़ळा, तूप, मध 1:1:1 या प्रमाणात देतात. वजन कमी करण्यासाठी त्रिफ़ळाचा काढा सकाळी अंशपोटी घ्यावा असे सांगितले जाते. असेच आणखी एक औषध आमच्या लहानपणी प्रसिद्ध होते, कुटजारिष्ट. अत्यंत कडवट चवीचे हे औषध पोट बिघडले की प्यावे लागत असे, आणि बद्धकोष्ठ झाले तर गरम पाण्यात साजूक तूप घालून प्यावे लागत असे.
परंपरेने आजीबाईचा बटवा एका पिढीकडून. दुसऱ्या पिढीकडे आला. यातलं खरंच आयुर्वेदात काय आहे जाऊन कधी बघितल नाही पण पूर्ण विश्वासाने करत होतो तर लागू पडत असे.
आता आलाच आहे उन्हाळा, सगळ्या सोशल मीडियावर अशा रेसिपी दुथडी भरून वाहू लागतील आणि पुन्हा प्रयोग करायला उत्साह येईल. © श्रेया श्रीधर महाजन.
अशी अनेक घरगुती औषधे आठवली. सांबर शिंग, सुंठ असा लेप सर्दीसाठी असायचा. सुंठ तूप गूळ कालवून लहान लहान गोळ्या दिसेन्ट्री थांबवायच्या. लोण्याची विरघळ कोरडा खोकला कमी करायची.
ReplyDeleteत्रिभुवन कीर्तीच्या लहान गोळ्या मी अजूनही कायम घरी ठेवते. कणकण सर्दीताप असला तर त्यावरचा गुणकारी इलाज 👌