Monday, 14 July 2025

होय ! शिकले आहे मी मराठी माध्यमात

 


तुला शिकवीन चांगलाच धडा,

तुझ्या पापाचा भरलाय घडा!

अशा यमक जुळलेल्या ओळी असोत किंवा  ‘राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा’ अशी सुरुवात असलेले सुंदर गीत, त्यातला नळ दमयंती आख्यानाचा संदर्भ, हे इतक्या सहज कुठून आकलन झालं? यातलं सौंदर्य मनाला कसं स्पर्श करून गेलं ? या अशा अनेक प्रश्नांना एकच उत्तर -  'व्हय! आपण मराठी माध्यमात शिकलो' . त्याचा खरोखर अभिमान आहे. 


साहित्यसंगीतकलाविहीन:

साक्षात् पशु: पुच्छविषाणहीन: |


साहित्य , संगीत, कला यांचा गंध नसलेला मनुष्य म्हणजे शेपूट आणि शिंगे नसलेला , गवत खात नसलेला पशू होय असे भर्तृहरीने म्हटले आहे . आताच्या काळात असे पशू पुष्कळ सापडतील 🙂 यातला  विनोदाचा भाग सोडून द्या. पण खरोखर इंग्रजी माध्यमात शिकले असते तर माझी बरीचशी शक्ती भाषा शिकण्यात, त्यातली अनेकविध स्पेलिंग पाठ करण्यात गेली असती . विज्ञान- गणित देखील त्यातील संज्ञा , संकल्पना न समजल्याने अवघड वाटले असते . 


 भावनांच्या विविध छटा जाणवणे आणि त्यांचे व्यक्तीकरण, ह्या गोष्टी मातृभाषेतून उत्तम प्रकारे केल्या जाऊ शकतात . कोणतीही भाषा शिकताना त्यातला शब्दार्थ कळणे ही सुरुवातीची अवस्था असते तर वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ कळणे ही पुढची आणि त्यातून ध्वनित झालेला अर्थ जाणवणे किंवा काव्य असेल तर रसास्वाद ही उच्च अवस्था आहे . तो आनंद हा ब्रह्मानंद सहोदर (भाऊ ) मानला जातो . अशा आनंदाला मी मुकले असते . म्हणूनच मी मराठी माध्यमात शिकले ही गोष्ट सांगताना कधी अपराधी वाटत नाही . कसं शिकायचं आणि काय शिकायचं हे ज्याला कळलं त्याला वेळ अपुरा पडतो .


विद्येचा  कोश अपूर्व आहे . जो खर्च केल्याने संपत नाही आणि चोराला चोरता येत नाही. मनसोक्त कसा लुटावा हे तंत्र आहे ते मला माझ्या भाषेने उत्तम प्रकारे शिकवले ज्यामुळे इतर भाषा, विषय यांची मर्यादा उरली नाही. निखळ विनोदाचा आनंद घेता आला. नाहीतर भलतेच एकसुरी व्यक्तिमत्त्व घडले असते. दुर्दैवाने आता मराठी शाळा कमी होऊ लागल्यात. ज्या आहेत त्या काळाच्या ओघात टिकून राहू देत. 

© श्रेया महाजन. २५ ऑगस्ट २०२३.


No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...